भाततणांची मुळे पिकाला फसवून मिळवतात अधिक अन्नद्रव्ये

भाततणांची मुळे पिकाला फसवून मिळवतात अधिक अन्नद्रव्ये
भाततणांची मुळे पिकाला फसवून मिळवतात अधिक अन्नद्रव्ये

अलीकडे भात उत्पादक प्रदेशामध्ये भाताच्याच प्रकारचे तण वाढत असून, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ते तण असल्याचेही कळून येत नाही. वेगवान, आक्रमक अशा या भाततणाच्या मुळांनी स्वतंत्ररीत्या वाढण्यासाठी एकटेपणाचे किंवा अप्पलपोटेपणाचे एक धोरण उत्क्रांत केले आहे. शेजारच्या भात पिकाच्या मुळांना अंदाजही न येऊ देता अधिक मूलद्रव्ये खेचण्यात ते यशस्वी होत आहे.   भात पिकामध्ये उगवणारे भाततण हे काही जंगली भाताचा प्रकार नाही. मात्र, वेगाने वाढत असल्यामुळे मूळ भात पिकांसाठी मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरते. हे एक आक्रमक तण असून, भात उत्पादक प्रदेशामध्ये त्याचा प्रसार होत आहे. भात पिकाच्या उत्पादनामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान या तणांमुळे होऊ शकते. सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठ आणि डोनाल्ड डॅनफोर्थ वनस्पती विज्ञान केंद्रातील संशोधकांनी नवीन प्रतिमांकन तंत्राने या तणांच्या मुळांच्या वाढीचा आणि जमिनीमध्ये राबवत असलेल्या एकूण धोरणांचा अभ्यास केला आहे. या तणांची मुळे जमिनीमध्ये अन्य वनस्पतींशी आपला संपर्क अत्यंत कमी ठेवत असल्याचे दिसून आले आहे. अभ्यासाचे निष्कर्ष ‘न्यू फायटोलॉजिस्ट’मध्ये प्रकाशित केले आहेत. त्याविषयी माहिती देताना प्रो. केनेथ एम. ओल्सेन यांनी सांगितले, की आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या जमिनीवरील भागातील पीक आणि तणांची स्पर्धा त्वरीत लक्षात येत असली तरी जमिनीखालील मुळांची अन्नद्रव्ये आणि पाणी घेण्याची स्पर्धाही तितकीच महत्त्वाची असते. वनस्पतीची वाढ आणि तग धरण्यासाठी ती उपयुक्त ठरते. भाततणांच्या मुळांनी वाढीदरम्यान एकटेपणाने वाढण्यासाठी नवे धोरण विकसित केले आहे. अन्य वनस्पतींच्या मुळांशी होणारा संपर्क कमी ठेवल्यामुळे त्याला मातीतील अधिक पोषक घटक वेगाने उचलून घेता येतात.

जमिनीखाली पाहण्यासाठी...

  • पूर्वी मुळांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी मुळे जमिनीतून काढण्याशिवाय पर्याय नसायचा. या प्रक्रियेमध्ये मुळांना व वनस्पतीला इजा पोचण्याचाच धोका अधिक राहायचा किंवा या वनस्पती कृत्रिम वातावरणामध्ये (उदा. दोन काचेदरम्यान) वाढवण्यासारखे प्रयोग करावे लागत.
  • या अभ्यासासाठी संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील एकाच भातशेतातील दोन स्वतंत्ररीत्या विकसित झालेल्या भाततणांच्या मुळांची तुलना केली. त्यासाठी ‘सेमी ऑटोमेटेड ऑप्टिकल टोमोग्राफी’ हे नावीन्यपूर्ण प्रतिमांकन तंत्र वापरले. हे तंत्र डोनाल्ड डॅनफोर्थ प्लॅन्ट सायन्स सेंटर येथील ख्रिस्तोफर टॉप यांनी विकसित केले आहे. या तंत्रामध्ये संशोधकांनी ६७१ वेगवेगळ्या भाततणांच्या मुळांची प्रत्येकी ७० पेक्षा अधिक फोटो घेतले. त्यानंतर या फोटोवरून मुळांची ३६० अंशातील नकाशा त्रिमितीय स्वरूपामध्ये तयार केला.  
  • मुळांची खोली, पसारा, जाडी यासह मातीतील मुळांचे वेगवेगळे कोन अशा सुमारे ९८ भौतिक गुणधर्मांचे विश्लेषण केले.
  • तणाने स्वतःच्या वाढीसाठी निवडलेल्या नव्या धोरणांचा मागोवा घेण्यासाठी जनुकीय विश्लेषणही करण्यात आले. अगदी भात पिकामध्ये तणांचे स्थानिकीकरण झाल्यानंतरच्या विविध टप्प्यातील माहितीचा त्यात समावेश करण्यात आला.
  • एकाच गुणधर्मासाठी भिन्न जनुकीय यंत्रणा

  • ओल्सेन यांच्या प्रयोगशाळेतील पीएच.डी.चे संशोधक मार्शल जे. वेड्गर यांनी सांगितले की नैसर्गिक निवडीप्रमाणे दोन प्रकारच्या भाततणांनी पर्यावरणानुसार एकसारख्या गुणधर्मांनी प्रतिक्रिया दिली आहे. पर्यावरणातील समान ताणांसाठी त्यांनी समान गुणधर्म उत्क्रांत केले असले तरी त्यामागील वापरली गेलेली जनुकीय यंत्रणा वेगवेगळी आहे. अन्य वनस्पतींच्या मुळापेक्षा एकटेपणाने वाढण्याच्या या गुणधर्मामुळे ही तणे मातीतून मूलद्रव्ये उचलण्याच्या स्पर्धेमध्ये भातपिकावर वाढीमध्ये मात करू शकतात.
  • तणांद्वारे एकच गुणधर्म विकसित करण्याचे जनुकीय पातळीवरील विविध मार्ग यातून लक्षात आले आहेत. आजवर जमिनीवरील गुणधर्मांचा प्रामुख्याने विचार होत असला तरी आता नव्या तंत्रामुळे मातीखालील मुळांच्या वाढीचे पॅटर्नही तपासता येणार आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com