लक्षणे दिसण्यापूर्वीच वराहाद्वारे लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार

लक्षणे दिसण्यापूर्वीच वराहाद्वारे लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार
लक्षणे दिसण्यापूर्वीच वराहाद्वारे लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार

लाळ्या खुरकूत रोगाचा विषाणू वराहांमध्ये अधिक आक्रमकतेने पसरत असल्याचे अमेरिकी कृषी संशोधन सेवेच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. पूर्वी वराहामुळे लाळ्या खुरकूत रोगांचा प्रसार होत असल्याचे ज्ञात असले तरी त्यांच्या प्रसाराचा वेग अपेक्षेपेक्षा अधिक आहे. वराहामध्ये पूर्ववैद्यकीय लक्षणांपूर्वी अंदाजे २४ तास संसर्गजन्यता येत असल्याचे नव्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन ‘सायन्टिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील पशुपालनासाठी लाळ्या खुरकूत रोग हा त्याच्या संसर्गजन्यतेमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. १९२९ पर्यंत अमेरिकेमध्ये या विषाणूजन्य रोगाचा उद्रेक कधीही आढळला नव्हता. हा संसर्गजन्य रोग असून काही वेळा प्राण्यांच्या जिवावर बेतू शकतो. त्याच प्रमाणे प्राणीज उत्पादनामध्ये प्रचंड घट होते. त्यामुळे अमेरिकेतील पशुपालनासाठी मोठा धोका ठरू शकते. आजवर लाळ्या खुरकूतमुक्त मानल्या जाणाऱ्या अमेरिका आणि युरोपमधील देशामध्ये या रोगाचा शिरकाव झाल्यास व्यापारावरील बंदी आणि रोगग्रस्त प्राण्यांच्या कत्तली यामुळे अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसू शकतो. त्यामुळे रोग येणारच नाही, प्रसार रोखता येईल, या अनुषंगाने अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता अमेरिकी कृषी संशोधन सेवेचे पशुवैद्यकीय अधिकारी जोनाथन अर्झ्ट यांनी व्यक्त केली. मात्र, वराहासारख्या प्राण्यांमध्ये लसीकरण हे आव्हानात्मक मानले जाते. लसीकरण झालेल्या वराहांनाही विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचा आणि रोगाच्या संभाव्य प्रसाराचा धोका असतो. या पूर्वी झालेल्या संशोधनामध्ये लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार पूर्ववैद्यकीय स्थितीमध्ये म्हणजेच आजारपणांची लक्षणे दिसण्यापूर्वी होत नसल्याचे मानले जात होते.

  • रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर केवळ २४ तासांमध्ये प्रादुर्भावग्रस्त वराह हे अत्यंत संसर्गजन्य होत असल्याचे या संशोधनात आढळले आहे. कोणतीही वैद्यकीय लक्षणे, उदा. ताप, फोड दिसण्याच्या कितीतरी आधी ही संसर्गजन्यता येत असल्याने अन्य प्राण्यांसाठी धोक्याचे प्रमाण प्रचंड वाढू शकते.
  • परदेशी प्राणीज रोगांच्या विरुद्ध संरक्षणासाठी आणि त्यांचे मोठे उद्रेक टाळण्यासाठी योग्य ती माहिती आणि मार्गदर्शक सूचना तयार करण्याची आवश्यकता आहे.
  • रोगांच्या वर्तनाची अनेक प्रारुपे गेल्या काही वर्षामध्ये विकसित झाली आहेत. त्यातून नियंत्रणाचे उपाय करताना त्यातील संवेदनशील लक्ष्य ओळखणे, परिणामांचा अंदाज मिळवणे आणि विशिष्ट उद्रेकाच्या स्थितीमध्ये उपलब्ध स्रोतांच्या पुरेपूर वापर करणे अशा घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, यातील एकाही मॉडेलमध्ये पूर्ववैद्यकीय रोग प्रसाराविषयीची माहिती उपलब्ध नसल्याची बाब अर्झ्ट यांनी उघड केली.
  • असा झाला अभ्यास

  • अर्झ्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वराहांमध्ये पूर्ववैद्यकीय स्थितीमध्ये लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज मिळवण्यासाठी गणितीय प्रारुप वापरले. त्यातून रोगाची कोणतीही दृश्य लक्षणे शरीरावर दिसण्यापूर्वी अंदाजे एक दिवस रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे त्यांना आढळले.
  • रोगाबद्दलची ही माहिती त्यांनी रोगाच्या प्रसाराच्या अन्य एका मॉडेलमध्ये अंतर्भूत केली. त्यामुळे अमेरिकेतील वराह उत्पादन उद्योगातील लाळ्या खुरकूत रोगाच्या उद्रेकाचा विचार केला तर रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच एक दिवस हा निकष धरला तरी रोगग्रस्त फार्मचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेमध्ये १६६ अधिक फार्म आणि ६.६४ लाखापेक्षा अधिक वराह या नव्या प्रारुपामध्ये रोगग्रस्त या सदरामध्ये मोडू शकतात. हे प्रमाण अधिक दिसत असून, त्यातून दोन महिन्यांमध्ये अमेरिकेला ३० लाख डॉलरचा फटका बसण्याची शक्यता पुढे येते. मात्र, त्यातून देशभरामध्ये रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव झाल्यास त्यातून एक वर्षामध्ये सुमारे २० अब्ज डॉलरइतका फटका अमेरिकेला बसू शकतो, अशी माहिती अर्झ्ट यांनी दिली.
  • अमेरिकेमध्ये लाळ्या खुरकूत रोग येण्यापासून रोखण्याची तयारी करतानाच सध्या असलेल्या संभाव्य रोगाची शक्यता कमी करण्याचे ध्येय ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कारण हा रोग केवळ वराहामध्येच नव्हे, तर गायी, मेंढ्यांसह बहुतांश प्राण्यांमध्ये येतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com