पिकातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाश्वत पद्धती विकसित

पिकातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाश्वत पद्धती विकसित
पिकातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी शाश्वत पद्धती विकसित

तेलबिया पिकातील तेलाचे प्रमाण शाश्वत पद्धतीने वाढविण्यासाठी जनुकीय सुधारणांचा मार्ग उपयुक्त ठरू शकतो. सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी प्रयोगशाळेतील स्थितीमध्ये बियातील तेलाचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीचा उपयोग कॅनोला, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांमध्ये करणे शक्य आहे. प्रत्येक तेलबिया पिकाच्या जनुकीय पातळीवर त्यातील तेलाचे प्रमाण किती असणार हे ठरलेले असते. बियातील तेलापैकी अधिक भाग हा बियांच्या अंकुरणाच्या प्रक्रियेमध्ये ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरला जातो. जागतिक पातळीवर तेलांची मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीनसह विविध तेलबिया पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग अब्जावधी डॉलर्सचा झाला आहे. बियांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील जैवशास्त्र विद्यालयातील सहायक प्रा. वेई मा यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. त्यांनी वनस्पतीतील तेलाच्या उत्पादनासाठी आवश्यक प्रथिन ओळखण्यात आले आहे. या प्रथिनांमध्ये सुधारणा करण्याची पद्धतही तयार केली आहे. या सुधारणांमुळे बियांवर सुरकुत्या दिसत असल्या तरी त्यातील तेलांचे प्रमाण नैसर्गिक प्रमाणापेक्षा १५ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले आहे. या गुणधर्मामुळेच या प्रथिनांना रिंकल्ड १ किंवा WRI१ असे नाव दिले आले. हे संशोधन जर्नल प्लॅंट सिग्नलिंग अॅँड बिहेव्हियरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनासाठी पेटंट घेण्यात येणार असून, त्यासाठी अर्ज केला आहे. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना प्रो. मा यांनी सांगितले, की तेलबिया पिके ही आपल्या शेती आणि आहारपद्धतीतील महत्त्वाचा घटक आहे. जमिनीची मर्यादा आणि पर्यावरणातील बदलांमुळे उत्पादनामध्ये होत असलेल्या घटीच्या पार्श्वभूमीवर तेलाचे उत्पादन वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आमच्या संशोधनातून तेलबियातील तेलांचे प्रमाण वाढविण्याची शाश्वत आणि अत्यंत कार्यक्षम पद्धत पुढे आलेली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा या उद्योगाला होणार आहे. या आधीच्या एका संशोधनामुळे सोयाबीन तेलाच्या उत्पादनामध्ये १.५ टक्क्याने वाढ (त्यांच्या कोरड्या वजनाच्या) झाली असता अमेरिकेतील बाजारपेठेमध्ये १.२६ अब्ज इतकी उसळ घेतली होती. त्या तुलनेमध्ये या संशोधनामध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ मिळण्याची अपेक्षा आहे. संशोधन आणि त्याचा फायदा ः

  • पूर्वीच्या संशोधनामध्ये बियातील तेलांचे प्रमाण वाढविण्यासाठी WRI१ प्रथिनांचे ओव्हर एक्स्प्रेशन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामधून तेलाचे प्रमाण स्थिर आणि शाश्वत वाढत नसल्याचे आढळले होते.
  • प्रो. मा यांनी कोबी आणि मोहरीच्या कुळातील अर्बिडॉप्सिस वनस्पतींवर संशोधन केले असून, WRI१ प्रथिनांपासून स्थिर स्वरूपाचे उत्पादन मिळविणारी पद्धत विकसित केली आहे. पुढील टप्प्यामध्ये नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक पिकाच्या बियांशिवाय फांद्या सारख्या अन्य भागांतून तेलांच्या उत्पादनाचे पर्याय तपासत आहेत.
  • वनस्पती तेलाच्या जागतिक मागणीमध्ये सातत्याने वाढ होत असून, २०३० पर्यंत ती दुप्पट होण्याचा अंदाज आहे. त्याच्या जोडीला खनिज इंधनाऐवजी जैवइंधनाकडे शाश्वत पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या संशोधनामुळे वनस्पतीजन्य तेलांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होणार आहे. त्याचा जैवइंधनाच्या निर्मितीलाही फायदा होणार आहे.
  • प्रतिक्रिया ः २०१७ मध्ये जागतिक तेलाचे उत्पादन १८५ दशलक्ष टनापर्यंत पोचले आहे. WRI१ या तेलनियंत्रण प्रथिनांमुळे मका, सोयाबीन, कॅनोला आणि नारळासारख्या पिकांमध्ये तेलाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते. प्रो. वेई मा यांच्या संशोधनामुळे जागतिक तेल उत्पादन व्यवसायाच्या फायद्यामध्ये वाढ होणार असल्याची माहिती कॅलिफोर्निया येथील सिंथेटिक जिनोमिक्स या कंपनीतील वरिष्ठ संशोधन डॉ. एरीक मोईलरींग यांनी सांगितले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com