प्राचीन काळापासूनच कीटक वापरतात विविध क्लृप्त्या

प्राचीन काळापासूनच कीटक वापरतात विविध क्लृप्त्या
प्राचीन काळापासूनच कीटक वापरतात विविध क्लृप्त्या

कीटकांनी सहजीवी संबंधामध्ये जगण्याच्या पद्धतींचा विकास सुमारे १०० दशलक्ष वर्षापूर्वीच केला असल्याचे नुकत्याच सापडलेल्या एका जीवाष्म्यावरून दिसून आले आहे. मुंग्यासह जगण्यासाठी आवश्यक तरी सर्व क्लृत्या त्या काळापासूनच वापरात असल्याचे स्पष्ट होते. आग्नेय आशियाच्या परिसरामध्ये सुमारे १०० दशलक्ष वर्षापूर्वी एका झाडाच्या खोडातून स्रवणाऱ्या डिंकाच्या रसामध्ये चिकटून एक लहान कीटक मृत झाला. त्याचे जीवाष्म झाले. या जीवाष्म्याचा अभ्यास कॅलटेक विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ सहायक प्रो. जोई पार्कर यांनी केला आहे. या कीटकाच्या चांगल्या प्रकारे संवर्धित झालेल्या सर्वात जुन्या जीवाष्म्याद्वारे कीटकांच्या वर्तनासोबतच सहजिवी संबंधाचे उत्तम उदाहरण पुढे आणले आहे. त्याचे निष्कर्ष जर्नल इलाइफमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. प्राण्यांच्या उत्क्रांतीदरम्यान दोन प्रजातीतील सहजीवी संबंध सातत्याने पुढे येत राहतात. या संबंधाचा आवाका दोघांच्या फायद्यावर अवलंबून असतो. उदा. माणूस आणि त्याचा पाळीव कुत्रा, पट्टकृमी आणि त्याचा यजमान. असा गुंतागुंतीच्या सहसंबंधांचा नमुना मुंग्या आणि अन्य लहान कीटकांमध्ये आढळून येताे. (या लहान कीटकांना मायर्मेकोफिलेस म्हणजेच मुंग्याप्रेमी या नावाने ओळखले जाते.) यामध्ये मुंग्यांच्या गुंतागुंतीची सामाजिक वसाहती स्थापन करण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. या मुंग्या भक्षकांना दूर ठेवतात, त्याच्या वसाहतीमध्ये अन्नाचा मोठा साठा असतो, यामुळे मुंग्यांच्या वसाहती कीटकांसाठी उत्तम रहिवास ठरतात. मुंग्यांमध्ये राहण्यायोग्य सामाजिक बदल, रासायनिक जुळवणूक या कीटकांमध्ये दिसून येते. मुंग्यांच्या सामाजिक वर्तनाची बाब ९९ दशलक्ष वर्षापूर्वीच्या पहिल्या जीवाष्म्यातून दिसून येते. हा मेसोझॉईक कालखंडातील क्रेटासियस काळातील जीवाष्म आहे. नुकत्याच सापडलेल्या या काळातील कीटकांच्या जीवाष्म्यामुळे कीटकांनी मुंग्यांच्या वसाहतींचा फायदा घेण्यात तेव्हापासून सुरुवात केल्याचे दिसून येते. सामाजिक परजीवी जीवनशैली ही उत्क्रांतीच्या या काळातही दिसून येते. त्याविषयी माहिती देताना पार्कर यांनी सांगितले, की भुंगेरे आणि मुंग्या यांचे संबंध आजवरच्या ज्ञान प्राणी विश्वातील सर्वात प्राचीन वर्तन सहसंबंध आहेत. यशस्वीरीत्या दीर्घकाळ तग धरण्यासाठी सहजीवी संबंध अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या जीवाष्म्यामुळे दिसून येते. जीवाष्म्याविषयी...

  • जीवाष्म झालेला भुंगेरा प्रोमायर्मिस्टर किस्तनेरी असून, तो क्लॉन किंवा हायेटेरीनिई उपकुळातील आहे. त्यातच मुंग्याप्रेमी कीटकांच्या पुढील आधुनिक प्रजाती येतात. या आधुनिक भुंगेऱ्यांनी आपले जीवन मुंग्यांच्या जीवनाभोवतीच विकसित केले आहे.
  • जर मुंग्या नसतील, ते जिवंत राहू शकणार नाहीत. या कीटकांनी मुंग्यांच्या वसाहतीमध्ये शिरकाव करण्यासाठी स्वतःमध्ये तीव्र बदल केले आहेत. कीटकांच्या शरीराभोवती चिलखताप्रमाणे कठीण आवरण असून, त्यांनी वसाहतींतील गंधाचीही नक्कल केली आहे. ते त्यांच्या शरीरातील विशिष्ठ संयुगे स्रवतात, त्याकडे मुंग्या आकर्षित होतात किंवा दुर्लक्ष करतात. या साऱ्या क्लृप्त्यांमुळे आक्रमक यजमान मुंग्यांमध्ये स्वीकारार्ह ठरतात.
  • हा जीवाष्म झालेला कीटकही असा काटक असून, जाड पायांचा, आवरण असलेल्या मुखाचा आहे. विविध ग्रंथींची छिद्रे ही रसायने बाहेर सोडण्यासाठी दिसून येतात.
  • जीवाष्म झालेल्या आणि सध्याच्या आधुनिक कीटकांतील साम्य पाहता, त्यांनी या कीटकांनी तग धरण्याच्या क्लृत्या कितीतरी आधी विकसित केल्याचे दिसून येते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com