दीर्घ दुष्काळी स्थितीत झाडांतील बदलांचा झाला अभ्यास

दीर्घ दुष्काळी स्थितीत झाडांतील बदलांचा झाला अभ्यास
दीर्घ दुष्काळी स्थितीत झाडांतील बदलांचा झाला अभ्यास

दुष्काळाची स्थिती दीर्घकाळ राहिल्यास त्याला प्रतिक्रिया देताना झाडे आपल्या शरीररचनेमध्ये काही बदल करत असल्याचे जेम्स कूक विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. जंगलातील झाडे पाणी उचलण्याचे प्रमाण विविध पद्धतीद्वारे कमी करत असल्याचे दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल इकॉलॉजी अॅंड इव्हॅल्यूएशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचे प्रमाण व तीव्रता वाढत जाण्याचा धोका विविध हवामानशास्त्रज्ञ सातत्याने वर्तवत आहेत. या दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयोग सुरू असले तरी प्राधान्याने हरितगृहामध्ये आणि रोपांवर किंवा छोट्या झुडपांवर होत आहेत. मोठ्या आकाराच्या झाडांवर दीर्घकालीन दुष्काळाचे परिणाम तपासण्यामध्ये निसर्गनियमानुसार येणाऱ्या पावसाचाच अडथळा येतो. जंगलामध्ये दीर्घकालीन दुष्काळी स्थिती प्रयोगासाठी तयार करणे आव्हानात्मक ठरते. या आव्हानावर मात करून इंग्लंड येथील जेम्स कूक विद्यापीठातील सहयोगी प्रा. सुझान लॉरेन्स या आपल्या एडिंनबर्ग विद्यापीठ आणि इंग्लंड येथील इंम्पिरिअल महाविद्यालयातील संशोधकांच्या सहकार्याने २०१५ पासून प्रयोग करत आहेत. या प्रकल्पासाठी त्यांनी खास दुष्काळी वातावरणाच्या निर्मितीसाठी अर्धा हेक्टर क्षेत्रावर प्लॅस्टिक पेपर पसरले होते. यातून झाडांना मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले होते. त्याशेजारील अर्धा हेक्टर क्षेत्र हे सामान्य ठेवून, या दोन्ही क्षेत्रामध्ये वाढणाऱ्या झाडांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. आपल्या प्रयोगाविषयी माहिती देताना डॉ. लॉरेन्स म्हणाल्या, की झाडांच्या वाढीवर दीर्घकाळाच्या दुष्काळाचे नेमके परिणाम तपासण्यासाठी हे प्रयोग करण्यात आले. यात झाडे मारण्याचा अजिबात विचार नव्हता. आजवर दुष्काळी स्थितीचे प्रयोग हे प्रामुख्याने हरितगृहामध्ये नियंत्रित वातावरणामध्ये केले गेले आहेत. या दृष्टिकोनातून केवळ छोट्या रोपांच्या किंवा झुडूपांवर काम झाले आहे. मोठ्या आकाराच्या परिपक्व झाडांच्या वर्षावनातील स्थितीमध्ये होणारे परिणाम तपासण्याचा उद्देश होता. दुष्काळाचे झाडांवरील दीर्घकालीन परिणाम तपासण्याचे हे प्रयोग डॉ. लॉरेन्स आणि सहकारी सुरू ठेवणार आहेत. संशोधकांची मते व निष्कर्ष ः प्रो. डेव्हिड टीन्ज यांनी सांगितले, की सातत्याने पाण्याची कमतरता झाल्यास झाडांच्या लाकडांच्या शरीररचनेमध्ये बदल घडून येतात. दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी, जुळवून घेण्यासाठी परिपक्व झाडेही आपल्या शरीररचनेमध्ये बदल घडतात. उष्ण कटिबंधीय वर्षावनातील झाडे हे पृथ्वीवरील पाण्याच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. प्रत्येक झाड हे एखाद्या कारंज्याप्रमाणे आहे, ते जमिनीतून पाणी उचलून आपल्या पानांद्वारे पुन्हा हवेत सोडत राहते. एक पक्व झाड प्रतिवर्ष जमिनीतील समुारे १ लाख लिटर पाणी उचलते. एकूणच स्थानिक पर्यावरणाचा समतोल ठेवण्यामध्ये ही झाडे महत्त्वाची ठरतात. सहलेखक डॉ. डेबोराह अॅगौआ यांनी सांगितले, की काही प्रजातींनी पाणी नेण्याच्या लहान नलिका विकसित केल्या. काही झाडांचे स्नायू पाण्याच्या साठवणीसाठी आखडून गेले. एक प्रजातीने पाणी वाहून नेणाऱ्या नलिकेमध्ये अडथळा तयार करण्यास सुरवात केल्याचे आढळले. काही झाडांची पाने पातळ झाली. डॉ. लॉरेन्स म्हणाल्या, की गेल्या काही दशकांमध्ये जगभरातील वर्षावनांनाही सातत्याने आणि अधिक तीव्र अशा दुष्काळांचा सामना करावा लागत आहे. वातावरणाशी जुळवून घेण्याच्या या झाडांच्या क्षमता मानवाला अद्याप फारशा ज्ञात नाहीत. मात्र, आम्ही डेनट्री येथील झाडांच्या जलविषयक गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. आत्यंतिक दुष्काळाच्या स्थितीमध्ये पाणी वहनाच्या त्यांच्या क्षमतेमध्ये घट होत असल्याचे आमच्या प्रयोगातून दिसून आले आहे. पुन्हा पर्यावरणामध्ये पाणी बाष्पोत्सर्जनाच्या स्वरूपात सोडण्याची क्षमता कमी होते. याचा स्थानिक पर्यावरणाला नक्कीच फटका बसू शकतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com