गहूजातींची विविधता हीच हवामान लवचिकतेची गुरुकिल्ली

गहूजातींची विविधता हीच हवामान लवचिकतेची गुरुकिल्ली
गहूजातींची विविधता हीच हवामान लवचिकतेची गुरुकिल्ली

वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता पिकामध्ये येण्यासाठी सध्याचे पैदास कार्यक्रम आणि जातींच्या निवडीच्या पद्धती फारशा उपयुक्त नसल्याचे मत आर्हास विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. युरोपातील गहू जातीमध्ये हवामानाप्रती लवचिकता अत्यंत कमी असल्याचे त्यांच्या अभ्यासात दिसून आले आहे. ही लवचिकता वाढविण्यासाठी पिकांच्या जातींची विविधता अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. वातावरणातील बदल म्हणजे केवळ तापमानातील वाढ नाही. वातावरण अनियमित होत असून, या बदलांची तीव्रता वाढत आहे. परिणामी अंदाज व्यक्त करण्यातील अडचणी वाढत आहे. हवामानाचे योग्य अंदाज न मिळाल्यास जागतिक अन्न सुरक्षिततेलाही धोका पोचणार आहे. वातावरणावर अवलंबून असलेल्या गहू पिकांच्या बाबतीत ही स्थिती अत्यंत धोक्याची ठरणार आहे. आर्हास विद्यापीठातील कृषी पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. जॉर्गन इ. ओलेसेन व संशोधकांच्या गटाला सध्याचे पैदास कार्यक्रम आणि जातींच्या निवडींच्या पद्धती त्या अनुषंगाने कार्यक्षम नसल्याचे आढळले आहे. त्यातही युरोपातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पिकांच्या विविधता गेल्या पाच ते पंधरा वर्षांमध्ये देशनिहाय कमी झाली असल्याचेही निरीक्षण नोंदवले आहे. याबाबतचे संशोधन ‘प्रोसिंडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. जॉर्गन ओलेसन यांच्या मते,

  • स्थानिक पातळीवर हवामानातील अनियमितता आणि तीव्रता यामुळे गहू उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे.
  • आलेल्या घटीमुळे अन्न सुरक्षिततेची समस्या उद्भवेल असे म्हणण्याऐवजी उत्पादनांचे प्रमाण अनियमित व अंदाज वर्तविण्याबाहेर जाऊ शकेल. यातून बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण राहणार आहे.
  • या घटनांचा फटका गरिबांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यातून स्थलांतर आणि राजकीय अस्थिरतेलाही चालना मिळेल.
  • विविधतेच्या पर्यायातून अनियमितता कमी करणे शक्य

  • युरोपातील नऊ देशातील गहू जाती आणि त्यांच्या उत्पादनांच्या आकडेवाडीचा आढावा घेण्यात आला. विविध जाती हवामानाला कशा प्रकारे प्रतिसाद देतात, त्यांच्या उत्पादनामध्ये किती बदल होतात याविषयी हजारो नोंदी घेण्यात आल्या. त्यातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणवत असलेल्या नेमक्या बदलांचा अंदाज मिळविण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला.
  • उत्तर आणि मध्य युरोप मध्ये विविध जातींच्या वेगवेगळ्या हवामानाच्या बाबतीतील प्रतिक्रिया या तुलनेने समान होत्या. दक्षिण युरोपियन देशामध्ये प्रामुख्याने ड्युरम गव्हाचे क्षेत्र आहे. त्यामुळे सर्व युरोपमध्ये गहू पिकाच्या हवामानाशी जुळवून घेण्याबद्दल प्रचंड दरी आहे. विशेषतः अनपेक्षित पावसामध्ये उत्पादनाचे बदलते प्रमाण.
  • गहू जातींची कमी असलेली विविधता ही भविष्यामध्ये अन्न सुरक्षिततेसाठी महत्त्वाची समस्या ठरू शकते. त्यामुळे शेतकरी, पैदासकार, बियाणांचे उत्पादक आणि वितरक यांनी आपल्या प्रदेशामध्ये पिकांच्या अनेक जातींची लागवड होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता प्रो. जॉर्गन ओलेसन व्यक्त करतात.
  • हवामानविषयक लवचिकता अत्यावश्यक ः

  • गहू हे युरोपातील महत्त्वाचे खाद्य पीक आहे. जागतिक पातळीवरील आहारातील वनस्पतीजन्य प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे या पिकाची हवामान लवचिकता जपणे अत्यावश्यक आहे.
  • गहू पिकाच्या वाढीच्या अवस्थे पाऊस, दुष्काळ, उष्णता किंवा थंडी यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसतो.
  • पिकामध्ये काही दिवस पाणी साचून राहण्याविषयी गहू पीक संवेदनशील आहे.
  • या पिकामध्ये आर्द्रतायुक्त वातावरण अधिक काळ राहिल्यास रोगांचे प्रमाण वाढते.
  • दुष्काळाच्या संवेदनशीलतेपेक्षा उष्णतेच्या ताणाशी जुळवून घेण्यामध्ये युरोपातील गहू पिकाला मर्यादा येत असल्याचे दिसते.
  • केवळ जनुकीय बदलाद्वारे पिकांमध्ये लवचिकता आणण्याचे प्रयत्न दीर्घकालीन विचार करता फारसे फायद्याचे दिसत नाहीत.
  • एकाच पीक जातीची विशिष्ट हवामानामध्ये उत्पादन देण्याची क्षमता ही तुलनेने मर्यादित असते. त्याऐवजी पिकांच्या जातींची विविधता हीच लवचिकतेची गुरुकिल्ली ठरू शकते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com