भौगोलिक निर्देशांकाद्वारे २५ उत्पादनांना दिली ओळख

भौगोलिक निर्देशांकाद्वारे २५ उत्पादनांना दिली ओळख
भौगोलिक निर्देशांकाद्वारे २५ उत्पादनांना दिली ओळख

आपल्या भागातील वाण, उत्पादनांची वैशिष्ट्ये पिढ्यान्‌पिढ्या जपत आणणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी गणेश हिंगमिरे प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीने आजपर्यंत २५ उत्पादनांचे हक्क मिळवून दिले आहेत. यातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विशिष्ट ओळख निर्माण करणे शक्य झाले.

आजही विविध पिके किंवा उत्पादने ही गावांच्या किंवा प्रदेशाच्या नावावरून ओळखली जातात. त्या त्या ठिकाणचे भौगोलिक वातावरण, माती, पाणी व अन्य संरचना, उत्पादनाची पद्धती या साऱ्या घटकांचा परिपाक म्हणजे त्या उत्पादनाचे गुणधर्म. मात्र, बाजारपेठेमध्ये या उत्पादनाची नक्कल करत अन्य विभागातूनही उत्पादने त्याच नावाने विकली जाऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी पिढ्यान्‌पिढ्या हे वाण, पद्धती जपल्या, त्यांची मागणी वळते, फायदा कमी होतो. हे टाळण्यासाठी भौगोलिक निर्देशांक ही संकल्पना अस्तित्वात आली. या संकल्पनेद्वारे त्या त्या उत्पादनाचे हक्क राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही अबाधित राहण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होते. अशा उत्पादनांना जीआय किंवा पेटंट मिळवून देण्यासाठी एक सेनानी राज्यामध्ये कार्यरत आहे, त्याचे नाव गणेश हिंगमिरे. बी.एस्सी केमिस्ट्री नंतर कायद्याची पदवी, पदव्युत्तर पदवी इंग्लंड येथील कार्डिफ विद्यापीठातून. अर्थशास्त्रामध्ये एम. फिल. करून त्यांनी जपान पेटंट कार्यालयातून त्याविषयीची पदवी घेतली. २०१३ मध्ये त्यांनी ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी (जीएमजीसी) ची स्थापना केली. ही संस्था शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी युरोप आणि अन्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये संरक्षित भौगोलिकता निर्देशांक मिळवून देण्यासाठी कार्य करते. २०१६ मध्ये या संस्थेला भारत सरकारच्या वतीने नावीन्यपूर्ण स्टार्टअप म्हणून पुरस्कार व मान्यता मिळाली. आतापर्यंत त्यांनी २५ उत्पादनांना जीआय आणि त्यासोबत ५० पेटंट मिळवून दिले आहे. त्याच प्रमाणे २९ जीआय लोगो नोंदणीकृत केले आहेत. 

  • आपल्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या काकांकडून प्रेरणा घेणाऱ्या गणशे हिंगमिरे यांचा पहिला जीआय होता पुणेरी पगडीचा.
  •  महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीला जीआय मिळाल्यानंतर प्रचंड बदल घडला आहे. क्षेत्र २०० एकरने वाढून, उत्पादनाने प्रतिवर्ष २००० टनांची मजल मारली आहे. निर्यात ३५० टनापर्यंत पोचली आहे. शेतीतून शहराकडे विस्थापित झालेली सुमारे ५३ कुटुंबे परत आपल्या गावी आली.
  •  नंदूरबार जिल्ह्यातील नवापूरच्या तुरीला मिळालेल्या जीआयमुळे त्याचा पॅकिंग व ब्रॅंड करणे शक्य झाले. परिणामी अन्य तुरीला किमान हमीभावाप्रमाणे ३० रुपये दर मिळत असताना या तुरीला ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
  • आपल्याकडे नोंदी लिहून ठेवण्याची पद्धत नाही. त्यात जे शेतकरी पिढ्यान्‌पिढ्या आपले वाण, उत्पादन पद्धती जपून ठेवतात त्यांचे शिक्षणही कमी किंवा अशिक्षित, त्यामुळे जीआय मिळवणे तसे सोपे काम नाही. शेतीपद्धतीच्या नोंदी मिळवताना प्रचंड अडचणी येतात. तरीही २५ उत्पादनांना जीआय, ५० पेटंट मिळवून देण्यासोबतच २९ जीआय लोगो नोंदणीकृत करून  आम्ही शेतकरी बांधवाच्या उपयोगी पडू शकलो, यातच सारे आले. - गणेश हिंगमिरे, संस्थापक, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी, पुणे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com