साखरेचा वाढला गोडवा

उत्पादक, प्रक्रिया उद्योजक आणि ग्राहक अशा सर्वांना फायदेशीर सेंद्रिय साखरेचे प्रयोग राज्यात वाढायला हवेत.
संपादकीय
संपादकीय

शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या वापराने शेतमालाचे उत्पादन थोडे अधिक मिळत असले तरी, अशा शेतीवर खर्चही जास्त होत असल्याने ती तोट्याचीच ठरतेय. रासायनिक शेतीमुळे माती, पाणी आणि हवा हे नैसर्गिक घटक प्रदूषित होत असून, त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे फळे-भाजीपाला असो की इतर शेतमाल, यामध्ये रसायनांचे अंश राहिल्याने त्याच्या सेवनाने मानवामध्ये पोट, किडनीचे विकार वाढत असून कर्करोगही बळावत आहे. त्यामुळेच देशभरातील नव्हे तर जगभरातील ग्राहकांचा कल सेंद्रिय अथवा रासायनिक अवशेषमुक्त अन्नाकडे वाढतोय. राज्यातील अनेक शेतकरी जागरूक ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन सेंद्रिय तसेच अवशेषमुक्त शेतमालाचे उत्पादन घेत आहेत. अशा शेतमालाचे चांगले ब्रॅंडिंग करून देश-विदेशातील बाजारातून चांगला दरही मिळवित आहेत. विशेष म्हणजे उत्पादनखर्च अत्यंत कमी होत असल्याने जेमतेम उत्पादन मिळाले तरी ते चढ्या दराने विकले जात असल्याने अशी शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरतेय. जमिनीचा पोतही कायम राहतोय. वैयक्तिक शेतकरी अथवा शेतकऱ्याचे गट-समूहाद्वारे सेंद्रिय शेतमाल उत्पादनाचे अनेक प्रयोग आपण पाहिलेत; परंत, लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याने सेंद्रिय साखर उत्पादनाचा देश पातळीवरील पहिला यशस्वी प्रयोग केला आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन!

ऊस म्हटलं की अधिक पाणी आणि रासायनिक निविष्ठांचा वापरही अधिक, असे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील उसाखालील जमिनीचे आरोग्य बिघडत असून त्या क्षारपड, नापीक होत आहेत. रासायनिक प्रक्रियेने तयार केलेली पांढरी शुभ्र, चवीला गोड असलेली साखर मानवी आरोग्याच्या दृष्टीने तेवढीच घातक आहे. अशा साखरेचे सेवन मधुमेहासह अनेक आजारांना कारणीभूत ठरते. त्यामुळे औषधे, शीतपेये आणि मिठाई निर्माण करणाऱ्या कंपन्यांबरोबर काही ग्राहकांकडून घरगुती वापरासाठीसुद्धा सेंद्रिय साखरेची मागणी वाढत आहे. हे सर्व हेरून विलास सहकारी साखर कारखान्याने सेंद्रिय साखरेच्या उत्पादनाचे नियोजन केले; परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे सोपे काम नव्हते. कारण, सेंद्रिय साखरेसाठी ऊससुद्धा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला लागणार होता. प्रथमतः शेतकऱ्यांना सेंद्रिय ऊस उत्पादन आणि त्यानंतर साखर निर्मितीचे फायदे पटवून देण्यात आले. त्यानंतर ६०० शेतकऱ्यांकडून तब्बल १५०० एकरांवर ऊस लागवड ते तोडणीपर्यंतची सर्व प्रक्रिया पार पडली. साखर निर्मितीतही कुठल्याही रसायनाचा वापर करण्यात आला नाही. सेंद्रिय उसाने अत्यंत कमी पाऊसमानात चांगली तग धरली. हा ऊस लवकरच काढणीसही आला असून उत्पादकांना प्रचलित दरापेक्षा थोडा अधिक दर मिळाल्याने त्यांचाही फायदा झाला. सेंद्रिय साखरेला बाजारात सर्वसाधारण साखरेपेक्षा अधिक दरही मिळणार आहे. त्यामुळे कारखान्यांचा पण त्यात फायदा आहे. ग्राहकांसाठी तर ही साखर फायदेशीर आहेच. अशा प्रकारे उत्पादक, प्रक्रिया उद्योजक आणि ग्राहक अशा सर्वांना फायदेशीर सेंद्रिय साखरेचे प्रयोग राज्यात वाढायला हवेत. सेंद्रिय साखरेचे ग्राहक देश-विदेशात कुठे आहेत, ते शोधून अशा साखरेचा पुरवठा त्यांना करायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com