लाख समस्या येवू देत, कच खाणार नाही!

लाख समस्या येवू देत, कच खाणार नाही!
लाख समस्या येवू देत, कच खाणार नाही!

गावशिवारात मरनाचा दुस्काळ पल्डा आहे. १९७२ च्या दुस्काळात तीन रुपये रोजाने जायकवाडी धरनावर काम करून पोट भरलं. तव्हा दाना नव्हता पन पानी होतं. १५ वर्षापूर्वीच्या दुस्काळात घर इकून शेती सावरली. चालू दुस्काळात काही इकूबिकू नये म्हनून अॅग्रोवनच्या परदरशनाले आलोय. लाख समस्या येवू देत आम्ही कच खाणार नाही...कचरू सखाराम ढाकणे जिद्दीने आपली गाथा सांगत होते. आपल्या समस्यांग्रस्त शेतीच्या प्रवासात आशेचा किरण शोधण्यासाठी श्री. ढाकणे ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला आले होते. पैठणच्या ब्राह्मणगावला पाण्याची भीषण टंचाई आहे. शिवारातील दीडशेपेक्षा जादा विहिरी आटल्या आहेत. पावणेचार एकर शेती असलेल्या श्री. ढाकणे यांना अशाही स्थिती ‘अॅग्रोवन’ आपल्या उमेदीचे साधन वाटतो. दुष्काळाचे सर्वांत जास्त चटके कायम बसणाऱ्या मराठवाड्यात यंदादेखील लाखो शेतकरी शेती जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. श्री. ढाकणे यांनी कष्टाने चार परस विहीर खोदून ३०० झाडांची मोसंबीची बाग उभी केली होती. पाणी नसल्यामुळे २००३ च्या दुष्काळात बाग जळाली. त्यांनी घर विकून दोन परस विहीर खोदली, पण पाणी लागलेच नाही. त्यांची शेती तहानलेलीच राहीली. यंदा श्री. ढाकणे यांना तीन एकरातील कापूस ३५ क्विंटलऐवजी सहा क्विंटल निघाला आहे. अर्धा एकरात ६ क्विंटल ऐवजी ३ क्विंटल बाजरी निघाली आहे. तुरीचा बहरदेखील जळाला आहे. दुष्काळाचे चटके बसत असले तरी श्री. ढाकणे भल्या सकाळी ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनासाठी गावातून निघाले. प्रदर्शनातील टवटवीत मोसंबी पाहून त्यांना त्यांच्या १५ वर्षांपूर्वीच्या मोसंबी बागेची आठवण झाली. मी अजूनही जिद्द सोडलेली नाही. ‘अॅग्रोवन’ माझ्या पाठीशी आहे. प्रदर्शनातील तंत्र, माहिती गोळा करून पुढे जसे पाणी उपलब्ध होईल तसा मी या माहितीचा वापर करून शेती फुलविणार आहे, असा आशावाद श्री. ढाकणे यांनी व्यक्त करून प्रदर्शनाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com