दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ, मोसंबीतून उत्तर

दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ, मोसंबीतून उत्तर
दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ, मोसंबीतून उत्तर

अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके एकेकाळी कपाशी व भाजीपाला पिकांच्या उत्पादनातील पट्टीचे शेतकरी होते. सततचा दुष्काळ आणि मजूरटंचाईमुळे या पिकांना पूर्णविराम देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण संकटांशी धैर्याने सामना करताना त्यांनी फळबाग लागवडीतून पीकपद्धती बदलली. सिंचनसुविधा बळकट केली. आज सीताफळ व मोसंबी पिकांतून समस्या कमी करून जीवनाला आर्थिक स्थैय त्यांनी मिळवून दिले आहे. अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ (ता. अौरंगाबाद) परिसर सातत्याने दुष्काळ सोसतो आहे. याच तालुक्यातील कुंभेफळचे श्रीराम दादाराव शेळकेदेखील सध्या त्याच संकटातून मार्गक्रमण करीत आहेत. एकेकाळी कापूस व भाजीपाला पिकातील ते पट्टीचे शेतकरी होते. एकत्र कुटूंबात सुमारे तीस एकर शेती असलेल्या श्रीराम व रामराव या शेळके बंधूंचे एकत्र कुटूंब आहे. आई-वडिलांसह जवळपास अकरा सदस्य कुटूंबात आहेत. सन २००५ पर्यंत तीन विहिरींच्या आधारे पारंपरिक पिकं उदा. देशी कापूस, तूर, ज्वारी घेतली जायची. धैर्याने नवा रस्ता शोधला पाणीटंचाई व मजूरबळ या मुख्य व जोडीला दरासारख्या समस्या असल्याने शेळके यांना ही पीकपद्धती थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. ते अत्यंत धैर्याचे. त्यांनी चिकाटी सोडली नाही. तसं कुंभेफळच्या शिवारात जवळपास छप्पन शेततळी निर्माण झाली आहेत. त्या भरवशावरच शेळके यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करण्याचे ठरवले. ज्या पिकांना तुलनेने पाणी कमी लागते, मजुरांची गरज कमी भासते अशा सीताफळाची लागवड केली. मोसंबीचे पीक चांगले उत्पादन व जागेवर दर देते हे उमजून या पिकावरही भर दिला. फळबाग केंद्रित शेतीची रचना केली. पीकपद्धतीतील बदल

  • सन २००५-०६ पासून शेळके यांनी कुटुंबातील सर्वांच्या विश्वासातून मोसंबीच्या दहा एकर फळबाग लागवडीपासून नवी सुरवात केली. सन २००६ मध्ये ७००, २००७ मध्ये ५००, २००८ मध्ये ४६५ अशी झाडांची संख्या वाढवत नेली.
  • सन २००९ मध्ये डाळिंब असलेल्या शेतापैकी जवळपास दोन एकरांत सीताफळाची १४ बाय ९ फूट अंतरावर लागवड केली. पूर्वी डाळिंबाची सुमारे १३०० झाडे होती. प्रत्येक वर्षी खर्च वजा जाता किमान तीन लाख रुपयांचे उत्पन्न ही झाडे द्यायची. परंतु, अन्य समस्यांबरोबर मरचा प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात झाल्याने बाग काढून टाकावी लागली.
  • यंदाच्या जुलै मध्ये पेरूची 760 झाडे लावली आहेत. काही डाळिंबक्षेत्रही आहे.
  • फळबागांव्यतिरीक्‍त चारापिकांचे व्यवस्थापनही ते करतात.
  • सध्याची मुख्य पिके सीताफळ

  • सात एकर. सुमारे २४०० जुनी झाडे. नवीही लागवड
  • उत्पादन- प्रति झाड- सुमारे २० किलो
  • दर - किलोला ३५ रुपये
  • मोसंबी

  • मृगबहाराचे व्यवस्थापन
  • एकूण १६०० झाडे
  • उत्पादन एकरी ८ ते १० टन
  • व्यापाऱ्याला जागेवर बाग दिली जाते.
  • सात विहिरींना शेततळ्यांची साथ तीस एकरांत जवळपास सात विहिरी. पैकी तीन पूर्वीच्या तर चार विहिरी अलीकडे बांधल्या. जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील शेतातील शेततळ्यात मोटरपंपद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था केली. पावसाळा संपला की फेब्रुवारीपर्यंत या विहिरींना पाणी राहतं. त्यानंतर मात्र संकट उभं ठाकतं. या त्यावर मात करण्यासाठी २००६ ते २०१७ या काळात तीन शेततळी घेतली. यंदा मात्र दोनच पाऊस झाले आहे. दोन महिन्यांपासून पाऊसच नाही. मात्र शेततळ्यात ७० टक्के पाणी असल्यानं सध्या त्यावर पिकांचं निभावणं सुरू आहे. परिस्थितीनुसार बदल शेळके सांगतात की, दररोज चार तासच पंप चालतो. यंदाच्या संकटामुळे दरदिवशी आठ तासांऐवजी आता मोजकेच तास पंप चालवणे व त्यातही शेततळ्याच्या पाण्याचा वापर डिसेंबरपासूनच करावा लागण्याची वेळ आली आहे. शिवाय मोसंबीचा मृगबहार फार न लांबविता फेब्रुवारीमध्येच आटोपता घेऊन पुढील काळात पाण्याचा वापर केवळ झाडं जगविण्यासाठीच करण्याचे नियोजन आहे. शेळके यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • फळबागांमध्ये उत्पादन सुरू होण्यापूर्वी व नंतरही आंतरपीक घेण्याची पद्धत
  • मोसंबीमत फ्लाॅवर व कांदा लागवडीला प्राधान्य
  • दोन एकर कांदा आंतरपिकातून शंभर क्‍विंटल उत्पादन
  • दरकरार पद्धतीमुळे खर्च वजा जाता कांद्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव
  • मोसंबीला दरवर्षी एकरी दहा ट्रॉली तर सीताफळाला एकरी पाच ट्रॉली शेणखतचा वापर
  • संपूर्ण फळबागा व पिकं ठिबकवर
  • काही हनुमानफळांचीही झाडं.
  • आशादायक फळबाग शेळके सांगतात, की दहा वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सीताफळाने आता पदरात फळ टाकण्यास सुरवात केली आहे. हातविक्रीचाही त्यांनी प्रयत्न केला. पन्नास रुपये प्रति किलोने फळ मोठ्या प्रमाणात विकलेही जात होते. परंतु, त्या विक्रीत शेतीकामांकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनाच फळे देण्याचे धोरण अवलंबिले. दरवर्षी एकरी उत्पादनाच वाढ दिसू लागली आहे. या पिकाचा एकरी खर्च कमी आहे. मजूर व पाणी या बाबींची गरजदेखील कमी लागते असे ते म्हणतात. मोसंबीची एक बाग व्यापाऱ्याला बारा लाख रुपयांमध्ये तर २०१६- १७ मध्ये जवळपास २४ लाख रुपयांत उक्‍ती दिली होती. एकरी ८ ते १० टन उत्पादन व किलोला २० ते २५ रुपये दराने हे पीक परवडत असल्याचे ते सांगतात. या पिकाचा उत्पादन खर्चही ५० हजार ते ६० हजारांपर्यंतच असतो. श्रीराम शेळके - ९६५७१५४५६३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com