एकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी बोंडअळीला

एकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी बोंडअळीला
एकात्मीक उपायाद्वारे रोखले गुलाबी बोंडअळीला

राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. काही शेतकरी कामगंध सापळे, रेफ्यूजी बियाण्याचा वापर आदी उपायांद्वारे बोंड अळीला पिकापासून दूर ठेवण्याचे नेटके व्यवस्थापन करीत आहेत. कठोरा (ता. जि. जळगाव) येथील प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ गोकुळ पाटील यांनीही सतर्कता बाळगत आपल्या १० एकरांत त्याच प्रकारचे आदर्श नियोजन करीत बोंड अळीला रोखण्याचे प्रयत्न केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील कठोरा गाव तापी नदीकाठी आहे. येथील जगन्नाथ व बंधू सत्वशील या पाटील बंधूंची संयुक्त ४० एकर शेती आहे. केळी हे त्यांचे प्रमुख कापूस दुय्यम पीक आहे. सर्वच पिकांंत उत्तम व्यवस्थापन ठेवून नुकसान कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सिंचनासाठी कूपनलिका आहे. पाणी पुरेसे असतानाही ठिबकचा कार्यक्षम वापर ते करतात. जगन्नाथ यांचे कला शाखेतील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सत्वशील हे डॉक्‍टर अाहेत. तेही सवडीनुसार बंधूला मदत करतात. कपाशी शेतीतील नियोजन

  • जगन्नाथ कापसाची दर वर्षी पूर्वहंगामी लागवड करतात. शेती काळी-कसदार असल्याने पाण्याचे नियोजन काटेकोर करावे लागते.
  • सहा बाय दोन फूट अंतरात लवकर येणाऱ्या वाणांची निवड ते करतात.
  • तापमान कमी झाल्यावर शक्यतो लागवडीला प्राधान्य असते.
  • लागवडीपूर्वी खोल नांगरणी करून घेतात.
  • कपाशीखालील क्षेत्र नेहमी बदलतात. फेरपालट चुकू देत नाहीत.
  • खतांचे व्यवस्थापन ‘ड्रीप’द्वारेच करतात. बेसल डोस असतोच.
  • पाटील यांचे पिकाकडे बारकाईने लक्ष असते. तज्ज्ञांच्या संपर्कात ते कायम असतात. अशातूनच त्यांना गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळाली. मागील वर्षीच्या हंगामात त्यांनाही
  • या अळीच्या प्रादुर्भावास सामोरे जावे लागले. मग प्रतिबंधात्मक उपाय करण्यास त्वरित सुरुवात केली. -खासगी प्रयोगशाळेतून माती तपासणी करून घेतात. अहवालाचा वापर करून त्यानुसार अन्नद्रव्ये देतात. प्रतिताशी चार लिटर प्रतिड्रीपर याप्रमाणे पाणी दिले जाते.
  • रोखले गुलाबी बोंड अळीला

  • मागील वर्षी बोंड अळीने केलेले नुकसान पाहता यंदा पाटील पहिल्या दिवसांपासून सतर्क राहिले.
  • अळीवर देखरेख ठेवण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर कृषी विभागाच्या सल्ल्याने सुरू केला.
  • यंदा कपाशीच्या शेतात चारही कोपऱ्यांना रेफ्यूजी अर्थात नॉन बीटी कपाशीच्या प्रत्येकी दोन अोळी घेतल्या.
  • प्रत्येक एकरात १० या प्रमाणे १० एकरांत सुमारे ९० ते १०० गंध सापळे शेतात वापरले आहेत.
  • दर १५ दिवसांनी सापळ्यातील ल्यूर बदलण्यास सांगितल्याचे पाटील म्हणाले.
  • मागील वर्षी असेच सापळे सुरुवातीला लावल्यानंतर त्यात २४ पतंग आढळले होते. ऑगस्टमध्ये नुकसानीचे प्रमाण त्या वेळेस जवळपास १८ टक्के राहिले होते.
  • गंध सापळ्यांच्या बरोबरीने कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाची फवारणीदेखील २५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात केली.
  • त्याचबरोबर प्रोफेनोफॉस (५० इसी), फेनप्रोपॅथ्रीन (१० इसी) १० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला. मागील वर्षी क्‍लोरअॅंट्रानिलीप्रोल व लॅंबडा सायहॅलोथ्रीन यांचाही वापर करण्यात आला होता. यंदा आत्तापर्यंत तीन फवारण्या झाल्या आहेत.
  • यंदा प्रादुर्भाव नाही

  • जूनमध्ये लागवड केल्याने कमी होणाऱ्या तापमानात सिंचनासाठीची धावपळ कमी होते व १०० टक्के उगवण साध्य करता आली. यंदा लागवडीला दोन महिने झाले आहेत. प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिल्याने बोंड अळीचा प्रकोप अद्याप तरी नाही. पीक जोमात असून, कैऱ्या लागत आहेत.
  • मागील वर्षी दिवाळीलाच वेचणी वेगात सुरू झाली. बोंडे चांगली आली. डिसेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बोंड अळीमुळे कापूस नुकसानग्रस्त निघत होता. पाटील फरदड ठेवत नाहीत.
  • काढणी वेळच्या वेळी करतात. दर वर्षी कपाशीचे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मागील वर्षी ते १५ क्विंटल मिळाले.
  • कापूस दर्जेदार मिळाला मागील वर्षीही त्यांनी वेळीच कापूस काढला. कीडग्रस्त कापसाचे प्रमाण त्यामुळे १७ टक्क्यांपर्यंतच राहिले. व्यापाऱ्याने गावातच येऊन खरेदी केली. सुरुवातीला जो आर्द्रतायुक्त कापूस आला तो वाळवून विकण्यात आला. त्याला ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर सुरवातीला मिळाले. नोव्हेंबरच्या अखेरीस जी वेचणी झाली त्यात कापसाचा दर्जा अधिक चांगला होता. तो साठविला. साठवणुकीची सोय गावातच एका खोलीत केली जाते. या कापसाला ४८०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. फेब्रुवारीअखेरपर्यंत कापूस विक्री करायची. अधिक दिवस दरांची प्रतीक्षा करायची नाही, असे सूत्र पाटील यांनी ठेवले आहे. पऱ्हाट्यांचे व्यवस्थापन जानेवारीच्या मध्यापर्यंत क्षेत्र रिकामे करण्याचा प्रयत्न असतो. बोंड अळीसाठी पऱ्हाट्या हा आसऱ्याचा मुख्य स्त्रोत असतो. मागील वर्षीची स्थिती पाहता त्याचेच काटेकोर व्यवस्थापन केले. थेट पऱ्हाटीवर रोटाव्हेटर न फिरविता ती मजुरांकरवी उपटून घेतली जाते. गोळा करून मग जाळण्यात आली. यानंतर शेत भुसभुशीत करून मका किंवा हरभऱ्याची (काबुली) पेरणी केली.

    आजार झाल्यानंतर उपचार घेण्याचा प्रकार अनेक जण करतात. परंतु, आजार होऊच नये, यासाठी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. हे सूत्र लक्षात घेऊन, मी कापूस पिकासाठी प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. पूर्वहंगामी किंवा संरक्षित जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी संयुक्त कृती करून, तसेच एकात्मीक उपायांमधून बोंड अळी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - जगन्नाथ पाटील, ८३२९७५११३२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com