सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१ हजारांपर्यंत उत्पन्न

सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१ हजारांपर्यंत उत्पन्न
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१ हजारांपर्यंत उत्पन्न

पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक शेतकरी घेतात. मात्र, त्याऐवजी सोयाबीन आणि तूर पिकांमध्ये पट्टा पेर पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळते. वाकी (रायपूर), ता. भातकुली, जि. अमरावती येथील अंकुश संजय खोडस्कार यांनी पाच एकर क्षेत्रामध्ये सलग दोन वर्षे सुधारित पट्टा पेर पद्धतीने सोयाबीन आणि तूर या आंतरपिकाची लागवड केली होती. केवळ लागवड तंत्रातील बदलामुळे एकरी ३१ हजार रुपये अधिक उत्पन्न हाती आले आहे. अमरावती जिल्ह्यातील वाकी (रायपूर) (ता. भातकुली) हे गाव तसे खारपानपट्ट्यातील. या भागामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी ही खरिपातील पिके. येथील अंकुश खोडस्कार (वय ३०) यांच्याकडे एकूण २६ एकर शेती असली तरी संरक्षित सिंचनाची सोय असलेले क्षेत्र केवळ पाच एकर आहे. वडिलांपासून पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांची लागवड केली जाते. दोन वर्षांपासून पूर्ण वेळी शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली. ओलिताची सोय असून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. २०१७ च्या खरिप हंगामापूर्वी कृषी विभागामार्फत कृषी सहायक रूपाली ठाकरे यांनी वाकी गावामध्ये शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात खरिप सोयाबीन आणि तूर पिकांच्या आंतरपीक पद्धतीच्या नावीन्यपूर्ण पट्टा पेर तंत्राची माहिती मिळाली. परंपरागत लागवडीपेक्षा या तंत्राचे फायदे अधिक असून उत्पादनात वाढ मिळत असल्याचे समजले. यातून प्रेरणा घेत अंकुश यांनी २०१७ मध्ये पाच एकर क्षेत्रावर सोयाबीन तूर आंतरपिकामध्ये पट्टापेर पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले. उर्वरीत १५ एकर क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धतीने सोयाबीन आणि तूर यांची आंतरपीक लागवड केली. अशी केली सुधारित लागवड अंकुश खोडस्कार यांनी पट्टापेर पद्धतीमध्ये ७ फूट अंतरावर एका ओळीमध्ये तूरीचे टोकणी केली. तुरीच्या दोन झाडातील अंतर १५ इंच (सव्वा फूट) ठेवले. मधील दोन्ही बाजूला एक ओळ रिकामी ठेवत तीन ओळीमध्ये सोयाबीनची बैलजोडीने पेरणी केली. अशा प्रकारे सोयाबीनच्या तीन ओळी, मध्ये एक ओळ रिकामी आणि त्यानंतर तुरीची एक ओळ अशी रचना झाली. तुरीचे ठिबक सिंचनाची सोय केली, तर सोयाबीन पूर्णपणे पावसावर ठेवले. ठिबकद्वारे गरजेच्या वेळी केवळ २-३ वेळा गरज असतांना (उगवणीसाठी, जुलै- ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड असतांना, सोयाबिनची कापणी झाल्यानंतर) सिंचन केले. याचे फायदे असे झाले

  • तूर गादीवाफ्यावर आली व दोन्ही बाजूने वाढण्यासाठी मोकळी भरपूर जागा उपलब्ध झाली. तुरीच्या झाडावर खोडायवर खालपासूनच फांद्या चांगल्या पोसल्या. खोड जाड व बळकट झाले.
  • सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकाच्या मधून फिरण्यासाठी मोकळी जागा राहिली. त्याचा फायदा पिकाच्या निरीक्षण, निगराणी व फवारणी साठी झाला.
  • सुरवातीला जरी खूप मोकळी जागा राहिल्याचे वाटले तरी पुढे पिकांची वाढ झाल्यानंतर ती सर्व जागा भरून गेली.
  • दरवर्षी पारंपरिक पद्धतीमध्ये तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असे. मात्र, यावर्षी गादीवाफ्यावर तूर पीक असल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प झाला असल्याचा अनुभवही अंकुश यांनी सांगितला.
  • उत्पादनातील फरक लक्षणीय ः १) २०१७-१८ खरिप -

  • अंकुश यांच्या पारंपरिक पद्धतीच्या शेतामध्ये सोयाबीन ३ क्विंटल प्रति एकर, तर तूर ४.५ क्विंटल प्रति एकर इतके उत्पादन मिळाले. वाकी गावातील बहुतांश शेतकऱ्यांनाही पारंपरिक पद्धतीत असेच उत्पादन मिळावे. मात्र, सुधारित पट्टापेर पद्धतीने सोयाबीन ४ क्विंटल प्रति एकर, तर तुरीचे ८ क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळावे.
  • त्या वेळी सोयाबीनला २२०० रुपये प्रति क्विंटल, तर तूरीला ५३०० रु. प्रति क्विंटल असा दर मिळाला. सुधारित पद्धतीने सोयाबीनपासून एकरी २२०० रुपये, तर तुरीपासून १८५५० रुपये अधिक उत्पन्न मिळाले.
  • २) २०१८-१९ खरिप -

  • खरिपामध्ये पारंपरिक पद्धतीने सोयाबीन आणि तुरीची ७ एकर क्षेत्रावर लागवड केली. उर्वरीत ८ एकर क्षेत्रावर कपाशी लागवडीची निर्णय घेतला.
  • या वर्षीही सुधारित पट्टा पेर पद्धतीने पाच एकर क्षेत्राचे नियोजन केले. या क्षेत्रातून सोयाबीन ६.४ क्विंटल प्रति एकर आणि तूर ९ क्विंटल प्रति एकर असे उत्पादन मिळाले. त्यावेळी पारंपरिक पद्धतीने एकरी सोयाबीन ४ क्विंटल, तर तूर ४.५ क्विंटल इतकेच उत्पादन मिळाले.
  • या वेळी सोयाबीनला ३,१५० रु. प्रति क्विंटल असा दर मिळाला. तूरीची अद्याप विक्री केली नसली तरी सध्या ५३५० रुपये प्रति क्विंटल असा दर आहे.
  • या प्रमाणे सुधारीत पद्धतीतून सोयाबीनचे एकरी २.४ क्विंटल, तर तुरीचे ४.५ क्विंटल उत्पादन अधिक मिळाले.
  • सध्याच्या दराप्रमाणे सोयाबीनमधून ७५६० रुपये, तर तुरीमधून २४०७५ रुपये अधिक उत्पन्न मिळाले. एकूण एकरी ३१,६३५ रुपये अधिक उत्पन्न हाती आले. म्हणजेच सुधारीत पट्टा पेर पद्धती अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले.
  • हे उत्पादन खारपान पट्ट्यातील आहे हे लक्षात घ्यावे.
  • केवळ लागवड तंत्रातील बदलामुळे एकरी ३१ हजार रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे.
  • ५ एकर क्षेत्रावरील पिकांच्या लागवडीचा खर्च सुमारे ५० हजार रुपये झाला.
  • या क्षेत्रातून दोन्ही पिकांचे मिळून ३,४१,५५० रुपये इतके उत्पन्न हाती येईल.
  • माझ्याकडे पारंपरिक आणि सुधारित अशी दोन्ही पद्धतीने लागवड केली होती. शेतामध्ये अधिक रोपे म्हणजे अधिक उत्पादन हे आम्हा शेतकऱ्यांचे मत असते. मात्र, शेतामध्ये सोयाबीनच्या दोन ओळी मोकळ्या असतानाही पिकांच्या वाढीला मोकळीक मिळाल्याने उत्तम उत्पादन मिळाले. नेहमीचेच बियाणे असून, महागडे तंत्रज्ञानाशिवाय केवळ लागवडीतील बदलांद्वारे पारंपरिक पद्धतीपेक्षा एकरी ३१ हजार रुपये उत्पन्न अधिक मिळाले आहे. प्रा. दुर्गे यांनी शिकवलेल्या पद्धतीमुळे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी सर्व शेतकऱ्यांना उताराही चांगला मिळाला आहे. आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हुरूप मिळाला आहे. - अंकुश खोडस्कार, ९५४५४९६०३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com