कापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास

कापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास
कापूस उत्पादनासह प्रक्रियेचाही घेतलाय ध्यास

१२५ एकरवरील कपाशीचे काटेकोर नियोजन करत उत्पादकता वाढीचा ध्यास आर्णी येथील बाळासाहेब निलावार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यासोबतच जिनिंग प्रेसिंग, सरकीपासून तेलासाठी ऑईल मिल अशा प्रक्रिया उद्योगही उभारला आहे. आपल्या भागात स्पिनिंग सुरू करण्याचे स्वप्न पाहत असले, तरी वास्तवाशी जोडलेले पाय, हीच त्यांची खरी ओळख ठरणार आहे. आर्णी येथील बाळासाहेब निलावार हे १९७६ सालचे कृषी पदवीधर. त्यांचे वडील विश्‍वनाथ निलावार यांच्यापासून शेती हाच मूळ व्यवसाय. निलावार कुटुंबीयांकडे २५० एकर शेती आहे. १९७२ पासून कपाशी लागवडीसोबतच कपाशीच्या बीजोत्पादनाचा कार्यक्रम १० ते १२ एकर क्षेत्रावर राबवत असत. त्या वेळी ‘एच-४’ हे कापसाचे वाण होते. बीजोत्पादनासाठी सुमारे २५० ते ३०० मजूर लागत. बीजोत्पादनातूनच कुटुबीयांची आर्थिक प्रगती झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मजुराची उपलब्धता अडचणीची ठरत असल्याने बीजोत्पादन पूर्णपणे थांबविल्याचे बाळासाहेब निलावार यांनी सांगितले. एकूण शेतीचे नियोजन आजही कपाशीखालील क्षेत्र सुमारे १२५ एकर असते. त्यासोबत आंतरपीक म्हणून तूर, तर ६० ते ७० एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड असते. रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा ही पिके प्राधान्याने असतात. कापसाचे व्यवस्थापन काटेकोरपणे

  • कापसाचे बियाणे १५०० रुपये प्रति किलो असल्याने, त्याची मजुरांद्वारे टोबणी करून घेतात. एकरी बियाणे खर्च १८०० रुपये. १५० रुपये प्रति मजूर याप्रमाणे एकरी तीन मजूर लागतात.
  • बैलाच्या माध्यमातून पेरणी करून खत दिले जाते. एकरी ३ ते ४ बॅग खताची गरज पडते. सुरवातीला मिश्र खत आणि त्यानंतर युरिया दिला जातो. त्यासाठी साडेतीन ते चार हजार रुपये लागतात.
  • मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तीन ते चार फवारण्यांची गरज पडते. पूर्वी तीन फवारण्यांत काम होई. मात्र आता गुलाबी बोंड अळीसाठी एक फवारणी लागतेच. प्रति फवारणी एकरी सरासरी ९०० रुपये खर्च होतो.
  • वेचणीसाठी पूर्वी पाच रुपये प्रति किलो असलेली मजुरी वाढून ८ ते १० रुपयांपर्यंत पोचली. एका वेचणीला दीड ते दोन क्‍विंटल कापूस प्रति एकर मिळतो. सरासरी चार वेचे होते.
  • पूर्वी खोडवा घेत असे. मात्र, गुलाबी बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी खोडवा (फरदड) घेणे बंद केल्याचे ते सांगतात.
  • पूर्वी एकरी १० ते १२ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळे. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर ही उत्पादकता ५ ते ६ क्‍विंटलवर स्थिरावली आहे.
  • २००२ मध्ये बीजी-१, त्यानंतर २००६ मध्ये बीजी-२ तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळाले. किडींची प्रतिकारशक्‍ती वाढत आहे. त्यानंतर मोठा कालखंड उलटल्यानंतरही नवा पर्याय, सरळ वाण, संकरीत जाती उपलब्ध झालेल्या नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.
  • कापसावर उभारला प्रक्रिया उद्योग

  • पूर्वीपासूनच कपाशीची मोठ्या क्षेत्रावर लागवड असे. त्यात बीटी कपाशीच्या आगमनानंतर उत्पादनामध्ये वाढ झाली. घरचा १६०० ते १७०० क्विंटल कापूस असल्याने त्यांनी जिनिंग प्रेसिंग व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
  • गावातील सहकारी दिलीप चिंतावार यांच्या भागीदारीमध्ये सुमारे २५ लाख रुपयांचा गुंतवणूक केली. बारा रेचे (यंत्र) पासून सुरवात केली. आज रेच्यांची संख्या ४२ वर पोचली आहे. सुमारे ९ एकर क्षेत्रामध्ये यंत्रे, गोदाम व अन्य व्यवस्था उभारल्या आहेत. दहा ते साडेदहा क्‍विंटल कापसाला एक खंडी (३५६ किलो रुई) असे म्हणतात. एक खंडी कापसाच्या प्रक्रियेसाठी अडीच हजार रुपये खर्च होतो. त्यातून १६०-१७० किलोच्या दोन कापूस गाठी मिळतात, असा ताळेबंद त्यांनी मांडला.
  • यात शिल्लक राहणाऱ्या सरकीवरही प्रक्रिया करण्याचा विचार सुरू केला. २००५-०६ मध्ये २० लाख रुपये गुंतवत ऑईल मिल उभारली. यामध्ये एक क्‍विंटल सरकीपासून दहा ते बारा किलो तेल मिळतो. यावर २५० रुपये क्‍विंटल प्रक्रिया खर्च होतो. तीन किलो वेस्ट तर ८५ किलो ढेप मिळते. यात निर्माण होणारे वॉश (तेल) रिफायनरीला ६० ते ७० रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जाते. सरकी पेंड पशुखाद्य म्हणून १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाते.
  • सध्या कापसाच्या गाठी गुजरात किंवा चेन्नईला पुढील प्रक्रियेसाठी पाठवल्या जातात. त्याऐवजी आपल्या भागातच स्पिनिंग सुरू करण्याचा विचार केला. त्यासाठी आणखी दहा एकर क्षेत्रही खरेदी केले. स्पिनिंग प्रक्रिया आणि त्यातील विविध अडचणींचा अभ्यास सुरू केला. सहकारी तत्त्वावरील स्पिनिंग मिल का बंद पडल्या, त्यातील नेमक्या अडचणी जाणून घेतल्या. गुजरातच्या तुलनेमध्ये आपल्याकडे विद्युत पुरवठा अधिक महागडा असल्याचे लक्षात आले. आपल्या भागातील ८० ते ९० हजार क्विंटल कापूस स्पिनिंगसाठी सुमारे २५ हजार स्पिंडल्सचा प्रकल्प आवश्यक होतो. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार होती. एकंदरीत सर्व बाबींचा सारासार विचार करता हा प्रकल्प सध्या स्थगित ठेवला असल्याचे बाळासाहेब निलावार यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकल्पातून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५० ते २०० रुपये अधिक देणे शक्य होऊ शकते, याचा विश्वास त्यांच्या मनात आहे.
  • नव्या तंत्रज्ञानाकडे वळलेच पाहिजे...

  • कपाशी उत्पादनामध्ये आघाडीवर असलेल्या अमेरिका, चीन अशा देशांना व तेथील कपाशी उत्पादकांना बाळासाहेब निलावार यांनी मुद्दाम भेटी दिल्या. पिकाचे व्यवस्थापन, पद्धती जाणून घेतल्या. राज्यामध्ये लागवडीखालील क्षेत्र अधिक असले तरी हेक्टरी उत्पादकता खूप कमी असल्याचे ते सांगतात. चीन, ऑस्ट्रेलियामध्ये हेक्टरी १७ क्विंटल, ब्राझीलमध्ये १६ क्विंटल, तर अमेरिकेमध्ये १२ ते १५ क्विंटर उत्पादन आहेत. परदेशामध्ये संकरीत सरळ वाण मोठ्या प्रमाणात असून, त्यांची सघन लागवड केली जाते. हे सर्व वाण एकाच वेळी वेचणीला येतात. परिणामी वेचणीसाठी यंत्राचा वापर शक्य होतो. आपल्याकडे चार ते पाच वेळा तोडे होतात.
  • बीटी तंत्रज्ञान येण्यापूर्वी केवळ हेक्टरी केवळ पाच क्विंटल असलेली उत्पादकता १० ते १२ क्‍विंटलवर पोचली. सामान्य शेतकऱ्यांलाही चांगले दिवस आल्याचे ते आत्मविश्‍वासाने सांगतात. जागतिक स्तरावर उपलब्ध असलेले नवे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध होण्याची गरज ते व्यक्‍त करतात.
  • संपर्क - बाळासाहेब निलावार, ९४२२८०५००१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com