सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून मिळाले भरघोस उत्पन्न

सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून मिळाले भरघोस उत्पन्न
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून मिळाले भरघोस उत्पन्न

सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी उत्पादक शेतकऱ्याने कृषी शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीच्या आग्रहाखातर सुधारित जोडओळ पद्धतीचा अवलंब २.२५ एकर क्षेत्रांमध्ये प्रयोगादाखल केला. त्यातून पारंपरिक लागवडीच्या तुलनेमध्ये एकरी सुमारे ४४ हजार रुपये अधिक उत्पन्न मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे. पुढील वर्षी संपूर्ण ४५ एकर क्षेत्रांमध्ये सुधारित लागवड पद्धतीचे नियोजन सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोगोडा (ता. संग्रामपूर) येथील विजय पातळे यांची एकत्रित कुटुंबांची एकूण ४५ एकर शेती आहे. त्यातील सुमारे ४० एकर क्षेत्रांमध्ये दर वर्षी कपाशीचे पीक घेतात. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये बीटी कपाशीमध्येही उद्भवलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. विजय यांची मुलगी नितीका ही अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात बी. एस्सी (कृषी) चे शिक्षण घेत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या आपल्या वडिलांना सुधारित शेतीपद्धती अवलंबण्याचा आग्रह नितीका सातत्याने करीत होती. शेवटी तिच्या आग्रहाखातर एकूण कपाशी क्षेत्रापैकी केवळ २.२५ एकर क्षेत्रांमध्ये सुधारित जोडओळ पद्धतीने कपाशीची लागवड केली. त्याआधी महाविद्यालयातील प्रा. जितेंद्र दुर्गे यांच्याशी फोनवर बोलून पद्धत समजून घेतली. अशी आहे जोडओळ पद्धत ः

  • जोडओळ पेरणी पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर ४ फूटऐवजी ३ फूट ठेवले. त्यासाठी ३ फूट काकरीने एका दिशेने हलक्या सऱ्या पाडण्यात आल्या. गत वर्षी २९ मे २-१८ ला मजुरांच्या साह्याने दोन झाडांतील अंतर सव्वा फूट ते दीड फूट ठेवत कपाशी बियाण्याची डोबणी केली.
  • बिटी कपाशीची टोकण करताना प्रत्येक तिसरी ओळ मोकळी ठेवण्यात आली. त्यामुळे तीन फुट x सव्वा ते दीड फूट ः सहा फूट ः तीन फूट x सव्वा - दीड फूट अशी लागवड झाली. म्हणजेच प्रत्येक जोडओळीनंतर मध्ये सहा फुटांची जागा मोकळी राहिली.
  • गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन, कपाशीचे पीक साधारणत: ३५-४० दिवसांचे असताना पिकात ट्रायकोकार्डस लावली.
  • कपाशीचे पीक साधारणत: ७०-८० दिवसांचे असताना मजुरांद्वारे झाडाचे शेंडे खुडण्यात आले.
  • खत व्यवस्थापन, निंदणी, डवऱ्याचे फेर, फवारण्या, दोन वेळा ओलीत अशी सर्व बाबी संपूर्ण कपाशी क्षेत्रात (जोडओळ आणि पारंपरिक) सारख्याच राबवल्या. त्यामुळे दोन्ही पद्धतींची तुलना करणे शक्य झाले.
  • जोमदार वाढीने भरघोस उत्पादन वाढीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतामध्ये खूपच मोकळी जागा राहिल्याचे दिसत होते. मात्र, पीक फळफांद्या येण्याच्या अवस्थेपर्यंत येताना जोडीओळीची आतील तीन फुटांची जागा झाकण्यास सुरुवात झाली. शेंडे खुडणी केल्यानंतर दोन जोडओळीनंतरची मधील सहा फुटांची मोकळी जागा झाकण्यास सुरू झाली. शेंडे खुडल्यामुळे व सहा फुटांचा मोकळा पट्टा मिळाल्यामुळे फळफांद्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ शक्य झाल्याचे विजय पातळे यांनी सांगितले. कपाशीच्या सव्वा दोन एकर क्षेत्रांमधून डिसेंबर मध्यापर्यंत ३८.६९ क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले. गुलाबी बोंड अळीचे चक्र विस्कळीत करण्यासाठी फरदड न घेता पीक अवशेषांची विल्हेवाट लावली. त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये गहू लागवड केली. येथील गहूही सध्या अन्य क्षेत्रापेक्षा जोमदार वाढल्याचे दिसून येते. अर्थशास्त्र...

    तपशील पारंपरिक कपाशी लागवड सुधारित जोडओळ पद्धत
    उत्पादन खर्च २५ हजार रुपये (३ निंदणी व मजुरी खर्चात वाढ) २१ हजार रुपये.
    एकरी उत्पादन १० क्विंटल १७.१९ क्विंटल
    दर रुपये प्रतिक्विंटल ५७०० ५७००
    उत्पन्न (रुपये) ५७००० ९७९८३
    खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न (रुपये) ३२००० ७६९८३
         

    टीप ः अन्य सर्व व्यवस्थापन पद्धती समान असताना केवळ जोडओळ पद्धतीच्या अवलंबामुळे एकरी तब्बल ७.१९ क्विंटल उत्पादन वाढले. निंदणीच्या खर्चात बचत झाल्याने उत्पन्नातही ४४९८३ रुपये वाढ झाली. पिकाची सोय ती आपली सोय...

  • नव्या जोडओळ पद्धतीने कपाशीची लागवड केल्यामुळे खालील फायदे झाले.
  • दोन जोडओळींमधील सहा फूट खाली जागा असल्यामुळे पिकाची दाटी होत नाही.
  • शेतात हवा खेळती राहण्यास मदत झाली.
  • सूर्यप्रकाशाचे एकसमान वितरण शक्य झाले.
  • शेंडे खुडल्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढ टाळता आली.
  • कपाशी पिकाची अळी, किडी व रोगांचे वेळोवेळी निरीक्षण शेवटपर्यंत करता येते.
  • फवारणीचे व्यवस्थापन सुलभरीत्या करणे शक्य झाले.
  • उभ्या पिकात ओलीत करताना कुठलीही अडचण आली नाही.
  • सहा फुटाच्या पट्टयातील शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागेच्या माध्यमातून कपाशीची वेचणी सुलभरीत्या करता येते.
  • कमी वेळेत जास्त वेचणी शक्य झाल्यामुळे वेचणी करणाऱ्या महिला मजुरांनाही जास्त मजुरी मिळाली. काम सोपे असल्याने मजुरांची उपलब्धता सहज झाली.
  • थोडक्यात, पिकाच्या समस्या कमी केल्यास त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येक झाडापासून अधिक उत्पादन हाती येते. कपाशीच्या लागवडीमध्ये राबवलेल्या जोड ओळ तंत्रामुळे कोणत्याही महागड्या घटकांच्या वापराशिवाय एकरी ७ क्विंटल उत्पादन अधिक मिळाल्याचे पातळे यांनी सांगितले.
  • मुलगी नितीकाच्या आग्रहामुळे कपाशीच्या लागवडीमध्ये पहिल्यांदाच बदल केला. तिच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तो तडीस नेला. सुधारित पद्धतीचे फायदे लक्षात आले आहेत. पुढील वर्षी संपूर्ण क्षेत्रामध्ये जोड ओळ पद्धतीचेच नियोजन करीत आहे. - विजय पातळे, ९९७५०४९३३८/९६७३२०९२००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com