पारंपरिक म्हैसपालनात काळानुरूप बदल करत साधला विकास

पारंपरिक म्हैसपालनात काळानुरूप बदल करत साधला विकास
पारंपरिक म्हैसपालनात काळानुरूप बदल करत साधला विकास

सरकोली (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सौ. प्रमोदिनी व सुधाकर भोसले या दांपत्याने पारंपरिक दूध व्यवसायात आवश्यक बदल करत तो नफ्यात आणला आहे. त्यासाठी पंढरपुरी म्हशी कमी करत अधिक उत्पादनक्षम मुऱ्हा म्हशींना पसंती दिली. उत्तम व्यवस्थापनातून दूध उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे . पंढरपूर शहरापासून वीस कि.मी. अंतरावर, भीमा व मान नदीच्या संगमावर सरकोली हे गाव वसलेले आहे. विस्तीर्ण नदीपात्र लाभल्यामुळे प्राधान्याने ऊस शेती हे याचे वैशिष्ट्य. येथील कृषी पदवीधर दत्तात्रय साहेबराव भोसले या तरुणाने ऊस शेतीला द्राक्ष व डाळिंबाचीही जोड दिली आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासह, घरच्या दूधदुभत्याची गरज भागवण्यासाठी वडील साहेबराव हे १९६७ पासून पंढरपुरी म्हशींचा सांभाळ करत होते. त्याला आता व्यावसायिक मुऱ्हा जातीच्या म्हैस पालनाची जोड दत्तात्रय यांनी दिली आहे. अशी आहे सुरवात साहेबराव यांना सन १९६७ मध्ये पंढरपुरातून केवळ साडेबारा रुपयात एक पंढरपुरी म्हैस विकत मिळाली. घरातील दुधाची गरज भागवून उर्वरित दुधाची विक्रीतून आई जनाबाई आपला प्रपंचाला हातभार लावी. त्यांनी या अस्सल जातिवंत पंढरपुरी म्हशीचा पुढे वंश वाढवत नेला. जोडीला काही म्हशी विकत घेत दूध व्यवसाय नेटाने वाढवला. दत्तात्रय आणि सुधाकर ही दोन्ही मुले शिक्षणात हुशार. दत्ताभाऊंना बीएएमएसला ॲडमिशनही मिळाली. मात्र, एवढी मोठी शेती कोण करणार, या चिंतेने ग्रासलेल्या वडिलांच्या आग्रहाखातर दत्ताभाऊंनी वनस्पती शास्त्रातील पदवी घेतली. नंतर एमएस्सी (अॅग्रोकेमिकल पेस्ट मॅनेजमेंट)चे शिक्षण अर्धवट सोडत शेतीमध्ये लक्ष घातले. पुढे आई-वडिलांच्या निधनानंतर पारंपरिक पंढरपुरी म्हशींचे पालन व शेतीची संपूर्ण जबाबदारी थाोरला मुलगा या नात्याने दत्ताभाऊंवरच आली. या काळात भोसले बंधूना मोठी बहीण छाया घाडगे यांची मदत झाली. त्यांच्या आधार आणि मायेमुळे यशस्वी होऊ शकल्याचे दोघे बंधू अभिमानाने सांगतात. सध्या सुधाकर हे हातकलंगले येथे तहसीलदार, तर त्यांच्या पत्नी मिनल या कराड येथे नायब तहसीलदार आहेत. दत्तात्रय आणि त्यांची पत्नी प्रमोदिनी यांनी शेतीसह पशुपालनात पंचक्रोशीत नाव कमावले आहे. दत्ताभाऊंकडे सुमारे ३१ एकर शेती असून, त्यात पाच एकर डाळिंब, आठ एकर द्राक्ष, दहा एकर ऊस व दोन ते अडीच एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड आहे. चाऱ्यासाठी हत्तीघास, कडवळ व मका यांची लागवड आहे. शेतीचे व्याप वाढल्याने वडिलोपार्जित २८ पंढरपुरी म्हशींच्या पालनाची जबाबदारी प्रमोदिनीताईंनी घेतली आहे. त्यांनी व्यवसायात लक्ष घातल्यानंतर पंढरपुरी म्हैसपालनातून नफा कमी होत असल्याचे लक्षात आले. मग काही तज्ज्ञांशी विशेषतः पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॅ. दिनकर बोर्डे व डॉ. अंकुष परिहार यांचे मार्गदर्शन घेत अधिक उत्पादनक्षम मुऱ्हा जातीच्या म्हशींची निवड केली. केवळ चार-पाच पंढरपुरी म्हशी ठेवून बाकीच्या विकून, त्याजागी मुऱ्हा म्हशी आणल्या. -त्यांनी घोडेगाव (जि. नगर), काष्टी (जि. पुणे) येथून प्रत्येकी पाच आणि हरियाना राज्यातून ९ म्हशी व एक रेडा खरेदी करत व्यवसाय वाढवत नेला. यात दुधामध्ये सातत्य राहण्यासाठी पहिल्या ते चौथ्या वेताच्या म्हशींची निवड केली. सरासरी एक म्हैस ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मिळाली.

  • हरियानात गाभण म्हशी विकण्याची परंपरा नाही. सलग चार ते पाच दिवस दत्तात्रय तिथे राहून म्हशींच्या धारा स्वतः काढूनच खात्री झाल्यानंतरच खरेदी केली. साधारणपणे १४ ते १६ लिटर क्षमतेच्या व पूर्ण निरोगी म्हशी त्यांनी काळजी घेत घरी आणल्या. प्रवासात काळजी घेऊनही तीन चार दिवसांच्या ताणामुळे काही दिवस दूध कमी झाले.
  • म्हशींवरील ताण कमी करण्यासाठी गुळाची संजीवनी, वैद्यकीय औषधोपचार व पशुआहाराचे नियोजन केले. गोठ्यात थंडावा राहण्यासाठी पंखे बसवून घेतले. उन्हाळ्यात तापमान कमी राहण्यासाठी प्रत्येक म्हशींसाठी स्वतंत्र शॉवर केला आहे. अन्य वेळी त्याचा म्हशी धुण्यासाठी उपयोग होतो.
  • स्वच्छ धुतल्यावरच म्हशींच्या धारा काढल्या जातात. म्हशींचा थकवा घालवण्यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा मोहरीचे तेल लावून मालीश केले जाते.
  • पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी अॅटोमेटीक सिस्‍टिम बसवली आहे.
  • ओला-सुका चारा, पशुखाद्य व खनिजमिश्रण दिल्यामुळे या म्हशी आता चांगल्या दूध देतात.
  • म्हशींना व्यायाम मिळण्यासाठी संध्याकाळी मुक्त गोठ्यात दोन तास सोडल्या जातात.
  • उत्पादन व उत्पन्न

  • विल्यापासून सहा महिने पंधरा म्हशींचे त्यांना दररोज दोन्ही वेळचे एकत्रित १६० लिटर दूध मिळाले. म्हणजे प्रति म्हैस सुमारे १० लिटर दूध मिळाले. यातील काही म्हशी पहिल्या वेताच्या असल्याने दूध कमी असले तरी पंढरपुरी म्हशींच्या तुलनेत दुप्पट दूध मिळाले. पुढील वर्षी प्रति म्हैस सरासरी १२ ते १४ लिटरपर्यंत जाईल असा विश्वास आहे.
  • सध्या त्यांच्या सर्व म्हशी गाभ जाऊन आठ महिने झाले आहेत. दोन्ही वेळचे मिळून ८० ते ८५ लिटर दूध सुरू आहे.
  • त्यांच्याकडील पहिल्या वेताची म्हैस सुमारे १० ते १२ लिटर, तर त्यापुढील वेताची म्हैस सुमारे १२ ते १४ लिटरपर्यंत दूध देते.
  • म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ४३ रूपये दर मिळतो.
  • प्रमोदिनीताईंकडे म्हैस पालनातील गोठा व्यवस्थापन व हिशोब ठेवण्याची जबाबदारी आहे. यामध्ये त्या मजुरांकडून सर्व कामे करून घेतात.
  • पंढरपुरी म्हैसपालनाचा वारसा मला सासू-सासऱ्याकडून चालत आलेला आहे. मात्र, केवळ भावनेपोटी तो चालवत राहण्याऐवजी अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तज्ज्ञांच्या साह्याने आवश्यक ते बदल करत गेल्याने फायद्यात वाढ होताना दिसते. या व्यवसायातून शेतीची शेणखताची गरज भागते. - प्रमोदिनीताईं भोसले, ८६००४०९८११ उत्तम पैदासीसाठी भोसले दांपत्याने या व्यवसायासाठी साधारण साडेपंधरा लाख रूपयाची गुंतवणूक केली आहे. म्हशींच्या दूध वाढीसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. उत्तम वंश वाढवण्यासाठी हरियानातील प्रसिद्ध युवराज नावाच्या रेड्यापासून झालेला एक रेडा विकत आणला आहे. त्यापासून होणाऱ्या पैदाशीच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. पंढरपुरी म्हशींची ऐट भारी

  • मुर्हा म्हशींबरोबरच त्यांच्याकडे जातीवंत चार पंढरपुरी म्हशी आहेत. म्हशी दुधाला कमी असल्या दिसायला देखण्या आहेत. अलिकडे हौशी ग्राहकांकडून अडीच ते तीन लाख रूपयांची मागणी होत आहे. मात्र, पुर्वजांची आठवण व हौस म्हणून सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच या पंढरपूरी म्हशींनी त्यांच्या गोठ्याची शोभा वाढवली आहे.
  • यातील भूरी म्हैस नावाप्रमाणेच भुरकट व रूबाबदार आहे.
  • एका म्हशीचे नाव कॅटरीना असून, आवाज दिला की ती कान टवकारते.
  • किरणचा तोरा वेगळाच आहे. ती एेटीत उभी राहते.
  • मुऱ्हा जातीच्या रेड्याचे नाव माही ठेवले आहे. चालण्यातील डामडौल वेगळा आहे.
  • मुऱ्हा जातीच्या एका रेडीचे नाव कोयल असून, ती सर्वांचीच लाडकी आहे. खासकरून प्रमोदिनीताई तिचे फारच लाड करतात.
  • म्हशींची संख्या वाढवत दूध उत्पादन वाढवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांची निर्मितीचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक ते भारत सरकारच्या लघू प्रक्रीया उद्योगाचे प्रमाणपत्र मिळवले आहे. पुढील वर्षापासून असून, रितीका मिल्क प्रोडक्ट या नावाने बाजारात उतरवण्याचा मानस प्रमोदिनीताईंनी व्यक्त केला. पंढरपुरी म्हशींऐवजी मुऱ्हा जातींची निवड केल्यानंतर अभ्यास सुरू केला. तिची गाभ न जाण्याची समस्या अनेक शेतकरी बोलून दाखवतात. या म्हशी म्हशी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या काळात माजावर येतात. मात्र, तिच्या माजावर बारकाईने लक्ष ठेवत असल्याने गाभण न राहण्याची समस्या जाणवत नाही. तेच यशाचे गमक आहे. - दत्तात्रय भोसले, ९९२२८८४९५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com