शेणखताचे दिसतात मातीच्या आरोग्यावर उत्तम परिणाम

शेणखताचे दिसतात मातीच्या आरोग्यावर उत्तम परिणाम
शेणखताचे दिसतात मातीच्या आरोग्यावर उत्तम परिणाम

सेंद्रिय खते आणि असेंद्रिय खते यांच्या वापराचे मातीच्या विविध थरांमध्ये नेमके काय परिणाम होतात याचा दीर्घकालीन अभ्यास अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठामध्ये करण्यात आला. त्यात शेणखताच्या वापराचे मातीच्या आरोग्यावर उत्तम परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रासायनिक खतांच्या संतुलित वापरामुळे क्षाराचे प्रमाण मर्यादित ठेवण्यामध्ये फायदा होऊ शकताे. हे निष्कर्ष सॉईल सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीत शेणखत, गावखत किंवा हाडांचे खत अशा सेंद्रिय खतांचा प्रामुख्याने वापर होत आला आहे. सुमारे १९६० नंतरच्या काळामध्ये रासायनिक खतांची त्यात भर पडली. शेतकऱ्यांनी वापर करण्यास सुरवात केल्यानंतर सुरवातीला पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ मिळाली. मात्र, अधिक वाढ आणि हव्यासापोटी असेंद्रिय खतांचा असंतुलित वापरही वाढत गेला. त्याचे विपरीत परिणाम गेल्या काही दशकांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचे महत्त्व पटू लागल्याचे चित्र काही प्रमाणात दिसत आहे. विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील संशोधक इक्रेम ओझलू व त्यांच्या गटाने दक्षिण डाकोटा येथील दोन प्रक्षेत्रावर खतांच्या वापराचे जमिनीच्या दर्जावर होणारे परिणाम अभ्यासले आहेत. २००३ ते २०१५ या काळात केलेल्या या अभ्यासामध्ये सेंद्रय आणि रासायनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर मका आणि सोयाबीन पिकामध्ये करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी सेंद्रिय खतांचा कमी, मध्यम आणि अधिक पातळीमध्ये वापर केला, तर रासायनिक खतांमध्ये मध्यम ते अधिक प्रमाणात वापर केला. त्याचप्रमाणे एका प्रक्षेत्रामध्ये कोणत्याही खताचा वापर केला नाही. या सर्व पद्धतींच्या वापरातून मिळालेल्या उत्पादन, मातीचा दर्जा यांची तुलना करण्यात आली. २०१५ च्या उन्हाळ्यामध्ये विविध खोलीवरून मातीचे नमुने घेण्यात आले. त्याच्या विश्लेषणातून खालील बाबी पुढे आल्या.

  • शेणखताच्या वापरामुळे मातीचा सामू पिकांच्या आरोग्यदायी पातळीमध्ये राहिला. रासायनिक खतांमुळे माती अधिक आम्लधर्मी झाली.
  • शेणखताच्या वापरामुळे मातीच्या वेगवेगळ्या खोलीपर्यंत सेंद्रिय कर्बामध्ये वाढ झाली. रासायनिक खते किंवा नियंत्रित पद्धतीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अधिक होते. अधिक कार्बन म्हणजे उत्तम मातीची संरचना होय.
  • शेणखतामुळे एकूण नत्राच्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये लक्षणीय वाढ झाली. नत्र हे पिकाच्या वाढीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
  • शेणखतामुळे जलधारण क्षमता वाढली. मातीचे कण एकमेकांशी जोडलेले राहिल्यामुळे मातीचा ऱ्हास रोखला जातो. असेंद्रिय खतांमुळे मातीच्या कणातील जलधारणा कमी राहिली.
  • शेणखतामुळे मातीची सर्व थरातील विद्युत वाहकता ही रासायनिक आणि नियंत्रित प्रक्षेत्राच्या तुलनेमध्ये वाढली. विद्युत वाहकता वाढणे म्हणजे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढणे होय.
  • ओझलू आणि त्यांच्या गटाने काढलेला निष्कर्ष ः

  • दीर्घकालीन वार्षिक शेणखतांच्या वापरामुळे मातीच्या दर्जामध्ये असेंद्रिय खतांच्या तुलनेमध्ये सुधारणा होते. मात्र, क्षाराचे प्रमाण वाढणे एवढाच विपरीत परिणाम दिसून येत असल्याचे पुढे आले आहे.
  • अधिक आणि कमी प्रमाणातील खतांच्या वापरांचे मातीच्या विविध खोलीपर्यंत होणाऱ्या परिणामाचे मापन केले आहे. त्याचा उत्पादकांना फायदा होणार आहे.
  • घन स्वरुपातील सेंद्रिय खतांचा वापर शेती आणि मातीच्या दर्जासाठी चांगला असतो. त्यामुळे मातीच्या दर्जामध्ये वाढ होते. असेंद्रिय खते विद्युत वाहकतेच्या दृष्टिकोनातून उत्तम दिसत असली तरी मातीच्या गुणधर्मावर चांगला परिणाम दिसत नाही. असेंद्रिय खतांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये वाढ मिळत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com