मच्छरदाण्यांवरील कीटकनाशकांचे प्रमाण, कार्यक्षमता मोजणे झाले शक्य

मच्छरदाण्यांवरील कीटकनाशकांचे प्रमाण, कार्यक्षमता मोजणे झाले शक्य
मच्छरदाण्यांवरील कीटकनाशकांचे प्रमाण, कार्यक्षमता मोजणे झाले शक्य

डासांद्वारे प्रसार होणाऱ्या रोगांपासून बचावासाठी कीटकनाशकांचा वापर केलेल्या जाळ्या किंवा मच्छरदाणी उपयुक्त मानल्या जातात. मात्र, या मच्छरदाणींवर असलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण व त्याची कार्यक्षमता किती आहे, याचा अंदाज घेता येत नाही. या कीटकनाशकांचे मापन करण्याची नेमकी पद्धती उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठ व अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रातील संशोधकांनी एकत्रितरीत्या तयार केली आहे. डासांच्या चाव्यांनी झोप खराब होतेच, पण त्यामुळे मलेरियासारख्या प्राणघातक रोगांचा प्रसार होत असल्याने त्यांचे गांभीर्य आणखी वाढते. अनेक विकसनशील देशांमध्ये ग्रामीण भागामध्ये विजेची अनुलब्धता किंवा अनियमित वितरणामुळे विजेवरील डास पळवणारी उपकरणे फारशी फायदेशीर ठरत नाही. अशावेळी जगभरामध्ये मच्छरदाणी किंवा कीटकनाशकयुक्त मच्छरदाण्याचा वापर केला जातो. मात्र, या मच्छरदाण्यांवरील कीटकनाशकांचे नेमके प्रमाण आणि त्याची कार्यक्षमता किती काळ टिकणार आहे, याचा अंदाज येत नाही. परिणामी कार्यक्षमता संपलेल्या मच्छरदाण्यांचा वापर होत राहून धोक्यामध्ये वाढ होते. त्याविषयी माहिती देताना संशोधक चाऊंन्झेन झोऊ यांनी सांगितले, की जाळ्यावरील कीटकनाशकांचे प्रमाण व सर्व भागांपर्यंत वितरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्यावर त्याची कार्यक्षमता ठरते. सध्या मच्छरदाण्यांवर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या दोन कीटकनाशकांचे मापन करण्याची पद्धत आम्ही विकसित केली आहे. थोड्याच काळात अन्य कीटकनाशकांचेही मापन करणे शक्य होईल.

  • मच्छरदाण्यांची जाळी बनवतानाच त्यांच्या धाग्यांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. प्रामुख्याने लष्करी वापराच्या किंवा उच्च दर्जाच्या गिर्यारोहकांच्या किटमध्ये त्यांचा नक्कीच समावेश असतो.
  • पहिल्या टप्प्यामध्ये संशोधकांनी पर्मेथ्रिन या जाळ्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या जाळ्यावरील नमुन्याचे विश्लेषण मास स्पेक्ट्रोमीटरद्वारे करण्यात आले. या तंत्राद्वारे जाळ्यातील घटकांमध्ये राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अंशांचेही मोजमाप केले. त्यातून संशोधकांना पायाभूत माहिती मिळाली.
  • त्यानंतर जाळ्याच्या धाग्यामध्ये अंतर्भूत असलेल्या पर्मेथ्रिनचे विश्लेषण करण्यासाठी टाईम ऑफ फ्लाईट सेकंडरी आयन मास स्पेक्ट्रोमेट्री (ToF-SIMS) तंत्रांचा वापर केला. या तंत्रामध्ये बायस्मथ आयनचा मारा केला जातो. त्यामुळे नमुन्यातून बाहेर फेकले जाणारे आयन आणि त्यासाठी लागणारा वेळ यांचे मापन केले जाते. जड आयन्स ही हलक्या आयन्सच्या तुलनेमध्ये सावकाश पोचतात. या सर्व घटकांच्या एकत्रित माहिती साठ्यातून नमुन्यांच्या पृष्ठभागांवरील नेमके प्रमाण व त्यांची कार्यक्षमता काढणे शक्य होते.  
  • या दुहेरी तंत्राचा वापर करून संशोधकांनी मच्छरदाण्यांचे अनेकांगी विश्लेषण केले. त्यात अगदी नव्या मच्छरदाणींपासून काही वर्षे वापरलेल्या मच्छरदाणीपर्यंत अनेक नमुन्यांचा समावेश होता. त्यातून डासांना मारणारे आणि अजिबात काम करत नसलेले नमुने वेगळे केले. त्याच्या तुलनेतून पर्मेथ्रिन कोणत्या टप्प्यावर अकार्यक्षम होते, हे ओळखण्यात आले आहे.
  • पुढील टप्प्यामध्ये वातावरणातील विविध स्थितीमध्ये या मच्छरदाण्यांची कार्यक्षमता तपासण्यात येणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.
  • हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com