शहरीकरणातून खाद्यसंस्कृतीवर होताहेत विविध परिणाम

शहरीकरणातून खाद्यसंस्कृतीवर होताहेत विविध परिणाम
शहरीकरणातून खाद्यसंस्कृतीवर होताहेत विविध परिणाम

जागतिक पातळीवर शहरीकरणाने प्रचंड वेग पकडलेला आहे. ग्राहकांमध्ये खाद्यपदार्थांविषयी जागरुकता निर्माण होत असून, खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि निर्मिती यामध्येही ते रस घेत आहेत. त्यामुळे सामाजिक आणि पर्यावरणाविषयीचे प्रश्न सातत्याने चर्चेत येत असतात. शाश्वत खाद्य साखळीच्या उभारणीसाठी शहरी लोकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकूण वाढत्या शहरीकरणातून ग्रामीण व पारंपरिक खाद्य पद्धतीमध्येही बदल होताना दिसत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयीबाबत ग्रामीण आणि शहरी यात अलीकडे फारसा भेद राहिल्याचे दिसत नाही. शहरीकरणाचे वारे ग्रामीण भागापर्यंत पोचले आहे. अगदी गाव पातळीवरही चायनीज किंवा कॉन्टिनेंटलच्या गाड्या भारतातही दिसून येत आहेत. अशा वेळी खाद्यपद्धती आणि संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांचा विविधांगाने विचार करण्यासाठी सप्टेंबरमध्ये ब्राझील येथील पोर्तो अलेग्रे येथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरी समुदायातील कृषी आणि अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध बाबींचा ऊहापोह करण्यात आला. त्यात जागतिक पातळीवर अन्नउद्योगातील विविध घटकांचा समावेश होता. शहरी भागातील शाळांतील कॅन्टीनसाठी सरळ उत्पादकांकडून खाद्यपदार्थाची खरेदी केली जाते. त्यासाठी खाद्य पदार्थांच्या दर्जाविषयी खात्री देणारी प्रणाली, अधिक एकात्मिक प्रमाणिकरण यंत्रणा, ऑनलाइन ऑर्डर घेण्याची व घरपोच पाठवण्याची सुविधा, तयार खाद्यपदार्थ, ज्या लोकांच्या गटांपर्यंत अद्याप खाद्यपदार्थ पोचत नाहीत, तिथे पोचवण्याची विशेष सुविधा अशा विविध बाबींसाठी शहरी लोकांची मदत होणार आहे. परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे... १) उत्पादनामध्येही शहरी ग्राहकांचा कार्यक्षम सहभाग ग्राहकांची इच्छा आणि उत्पादक यांच्यामध्ये नावीन्यपूर्णतेचा पूल असतो. उदा. लावोस येथील ग्राहकांचा कल अधिक सुरक्षित अन्नपदार्थांकडे असल्याने या भागामध्ये सेंद्रिय शेतीचे प्रमाण वेगाने वाढले असल्याची माहिती अन्न सुरक्षिततेविषयी कार्य करणाऱ्या गटांचे समन्वयक आणि लावोस विद्यापीठामध्ये कार्यरत चित्पसाॅँग कौनसोन्सावाथ यांनी दिली. -ब्राझील येथील युनिव्हर्सिटी ऑफ सावो ल्युईस डो मारान्हाओ येथील सामाजिक अर्थशास्त्रज्ञ स्टिफने ग्युनौड यांनी सांगितले, की आमच्या येथे नवा ट्रेंड रुजत असून, शहरी ग्राहकही उत्पादनामध्ये भाग घेऊ इच्छित आहेत. ते शेतकऱ्यांना मदतनीस ते सहशेतकरी ही भूमिका पार पाडत आहेत. गेल्या तीस वर्षांमध्ये खाद्य सवयीमध्ये मोठे बदल झाले आहेत. आहारातील बहुतांश पदार्थ हे स्थानिकरीत्या उपलब्ध असलेले होते. त्याविषयी माहिती देताना सीआयआरएडी, बेलेम येथील संशोधक मार्क पिरॅक्स यांनी सांगितले, की ब्राझिलियन अॅमेझॉन येथील लोकांच्या आहारामध्ये मासे, शाबुकंदाचे पीठ किंवा विविध बेरी फळे असायची. मात्र, अलीकडे कृषी प्रक्रिया उद्योगाचा उगम झाल्यापासून प्रदेशाबाहेरूनही गोठवलेले चिकन, पास्ता, भात, मांस, बिस्किट यांचा वापर वाढला आहे. अशा पदार्थामध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण अधिक असते. अशी उत्पादने आंतरराष्ट्रीय प्रमाणित निकषानुसार मोठ्या प्रमाणात निर्माण केली जात असल्याने त्याची किंमतही कमी असते. पर्यायाने स्थौल्यत्व वाढून अनेक नव्या रोगांचा शिरकावही या प्रदेशामध्ये झाल्याचे दिसत आहे. २) खाद्यपद्धतीतील बदल म्हणजेच ग्रामीण भागांचा पुनर्जन्म स्थानिक भागीदारांच्या साह्याने स्थानिक खाद्यपदार्थाच्या निर्मितीला चालना मिळाली आहे. सीआयआरएडीतील कृषी अर्थशास्त्रज्ञ सॅंड्रीन फ्रेग्युन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरी/ग्रामीण भागातील लोकांची आवकजावक, स्थलांतर, सार्वजनिक कार्य या सारख्या आणि शेती संबंधित आणि संबंध नसलेल्या लोकांच्या विश्लेषणाचा या तत्त्वाला आधार मिळाला आहे. यातून पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन मिळत आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात येत असलेल्या नव्या प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे विविधता येत आहे. खाद्यव्यवसायातील नवीन उद्योजकांमुळे उत्पादन आणि ग्राहक यांच्यामध्ये एक साखळी तयार होत आहे. पॅट्रिक कॅरॉन यांनी सांगितले, की या संबंधातून ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येमध्ये सामाजिक बंध निर्माण होत आहेत. त्यातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतील. ३) रस्त्यावरचे खाणे, नव्हे सामाजीकरणाची चाहूल! या परिषदेची यावर्षीची थीम होती रस्त्यावरील खाद्यपदार्थ. यातून विविध प्रदेशातील खाद्य संस्कृती, त्यातील नावीन्यता, खाद्य पद्धतीतील सामाजिक फरक, शहरातील सार्वजनिक आणि खासगी भागात सीमा याविषयी उद्बोधक माहिती पुढे आली. शहरी सामाजीकरणातील लोकप्रिय गैरसमजही ढवळून निघाले.

  • रस्त्यावर खाणे म्हणजे नेहमीच सार्वजनिक ठिकाणी खाणे असा त्याचा अर्थ होत नाही. जाकार्ता, रिओ, बोगोटो आणि मेक्सिको शहरातील अत्यंत गरीब भागामध्ये रस्त्यावर अशी खाद्याची ठिकाणे एखाद्या समुदायाप्रमाणे भासतात. जणू काही शेजाऱ्याच्या इथे जेवण्यासाठी जमले आहेत. हेही एक सामाजीकरणच आहे. त्याची शहरातील एकलकोंडेपणाशी तुलना करता येत नाही.
  • परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या अनेक संशोधनातून शहरी भागामध्ये नवी मिश्रखाद्ये किंवा पारंपरिक खाद्य पदार्थासाठी नव्या खाण्याच्या पद्धती पुढे आल्याचे मांडण्यात आले.
  • यातील अनेक संशोधने युनेस्कोच्या वर्ल्ड फूड सिस्टिम्सच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com