जैविक कीडनियंत्रण पद्धतीमुळे पश्चिम युरोपच्या बाजारपेठेत केला शिरकाव

जैविक कीडनियंत्रण पद्धतीमुळे पश्चिम युरोपच्या बाजारपेठेत केला शिरकाव
जैविक कीडनियंत्रण पद्धतीमुळे पश्चिम युरोपच्या बाजारपेठेत केला शिरकाव

इटली येथील फूल उत्पादकांनी प्रयत्नपूर्वक पश्चिम युरोपच्या बाजारपेठेमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. यामध्ये त्यांनी अवलंबलेल्या जैविक कीड संरक्षणाचा मोठा वाटा आहे. अर्थात, पारंपरिक कीडनाशकांच्या वापराची पद्धती सोडून या जैविक पद्धतीकडे वळणे तितकेच अवघड होते. मात्र, जैविक कीड संरक्षणे हेच भविष्य असून, त्या दिशेने काम केल्याचा फायदा दिसत असल्याचे मत येथील फूल उत्पादक व्यक्त करतात. इटली येथील कॅलाब्रिया प्रांतातील बिसिग्नॅनो शहराजवळील कॅव्हालियरी आणि पॅपाइन्नी एसआरएल ही फूल उत्पादक कंपनी पारंपरिक पीक संरक्षणाची पद्धत सोडून जैविक पीक संरक्षणाकडे वळली आहे. या कंपनीची २८ हेक्टर क्षेत्रावर शेवंती, एक हेक्टर क्षेत्रावर गुलाब, तर एक हेक्टरवर कॅलोन्चो लागवड आहे. ही सर्व पिके हरितगृहामध्ये घेतली जातात. यात मिथेन वायूवर चालणारी उष्णता वाढवणारी प्रणाली असून, कार्बन डायऑक्साईड पुरवठा यंत्राचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे १५ हेक्टर क्षेत्रावर कृत्रिम प्रकाशाचा वापर केला जातो. कंपनीचे कार्यकारी अधिकारी अॅन्टानियो आणि सिमोना पॅपाईन्नी हे असून, वर्षभरामध्ये सुमारे १०० मजुरांना रोजगार दिला जातो. येथील उत्पादन प्रामुख्याने जर्मनी, नेदरलॅंड आणि इटली येथे पाठवले जाते.

  • दहा वर्षांपूर्वी पॅपाईन्नी यांनी कोळी किडीच्या प्रादुर्भावासाठी कीडनाशकांचा पर्याय फारसा उपयुक्त ठरत नसल्याचे लक्षात आल्याने जैविक कीडनियंत्रणाकडे मोर्चा वळवला. यासोबतच फूलकिड्याची समस्या होतीच. या दोन्ही किडीच्या नियंत्रणासाठी भक्ष्यक कोळ्यांचा पर्याय निवडला. काही आठवड्यांमध्ये प्राथमिक निष्कर्षाने उत्साह वाढवला. एकात्मिक कीड व्यवस्थापनातील विविध बाबीही या काळात शिकत गेल्याचे अॅन्तोनियो सांगतात. पुढे दोन वर्षांनी कुंड्यातील गुलाबामध्ये एकात्मिक कीडनियंत्रणाचे उपाय सुरू केले.
  • या पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी अत्यंत जागरूक राहावे लागते. पिकाचे निरीक्षण, किडींची प्रादुर्भाव पातळी, उपयुक्त कीटक सोडण्याची योग्य वेळ, त्यासाठी योग्य सल्ला सेवा यासाठी गंभीर राहावे लागते. यात प्रचंड वेळ द्यावा लागतो, खर्चातही वाढ होते.
  • मात्र, यातून नव्या बाजारपेठेमध्ये शिरकाव करणे शक्य झाले.
  • शेवंतीच्या रोपांची निर्मिती स्वतः करत असून, पुढील वर्षापासून अन्य दोन जातींचा त्यात समावेश करण्यात येत आहे.
  • नवीन लागवडीमध्ये जैविक कीडनियंत्रणाच्या उपायांचे परिणाम त्वरित दिसून येतात. पूर्वीच्या कीडनाशकांच्या वापराचे परिणाम नवीन रोपांवर दिसत असत. तुलनेमध्ये जैविक कीडनियंत्रणाच्या उपायामुळे ही पिके अधिक ताकदवान राहत असल्याचे आढळले आहे. या रोपांची पाने व काड्या उत्तम दर्जाच्या मिळतात. दर्जा उत्तम मिळत असल्याने नव्या बाजारपेठांमध्ये शिरकाव करणे शक्य झाले आहे.
  • सध्या १५ हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा वापर करत असून, एप्रिल २०१९ पर्यंत संपूर्ण २८ हेक्टर क्षेत्रावर वापरण्याचे नियोजन केले आहे.
  • सध्या उत्पादक आणि ग्राहकांमध्ये कीडनाशकांचे अंश नसलेल्या उत्पादनाविषयी फारशी जागरूकता नाही. मात्र, भविष्यात बाजारपेठेतील स्पर्धा वाढत गेल्यानंतर व पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्यानंतर या बाबींना महत्त्व येणार आहे. त्याचा फायदा आमच्या कंपनीला होईल, असा विश्वास अॅन्तोनियो व्यक्त करतात.
  • या जैविक घटकांचा होतो वापर ः सध्या कंपनी लाल कोळी, फूलकिडे, नागअळी या किडींच्या विरुद्ध चार उपयुक्त कीटकांचा वापर करते. त्यात भक्ष्यक कोळी स्पायडेक्स (शा.नाव- Phytoseiulus persimilis), स्विर्स्की कोळी (शा.नाव - Amblyseius swirskii) यासोबत परोपजिवी वास्प मिग्लिफस (शा. नाव- Diglyphus isaea) आणि सूत्रकृमी (शा. नाव -Steinernema feltiae) पासून बनवलेले उत्पादन यांचा समावेश आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com