वणव्याद्वारे पसरणाऱ्या प्रदूषक घटकांचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम

वणव्याद्वारे पसरणाऱ्या प्रदूषक घटकांचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम
वणव्याद्वारे पसरणाऱ्या प्रदूषक घटकांचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम

सध्या कॅलिफोर्नियासह विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वणवे लागत आहेत. या वणव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका केवळ जंगलांनाच बसतो असे नव्हे, तर शेकडो किलोमीटर अंतरापर्यंतच्या पिके आणि वनस्पतींना बसत असल्याचा निष्कर्ष एक्सटर विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या विस्तृत पट्ट्यामध्ये सातत्याने लागणाऱ्या आगी आणि वणवे यांचा जंगलावर विपरीत परिणाम होतो. या आगीच्या तडाख्याबाहेर असणाऱ्या शेकडो कि.मी.पर्यंतच्या जंगले आणि पिकांवरही त्याचे विपरीत परिणाम दिसत असल्याचे एक्स्टर विद्यापीठातील प्रो. नॅडीन उंगर आणि बिजिंग येथील अवकाश भौतिकी संस्थेतील प्रो. क्षू यू यांच्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. या अभ्यासात वणव्यामुळे निर्माण होणाऱ्या ओझोन आणि एअरोसोल्स (वातावरणातील सूक्ष्म कण) या दोन उपपदार्थांचे आरोग्यपूर्ण वनस्पतींच्या वाढीवर होणारे परिणाम तपासण्यात आले.

  • वणव्यांच्या सीमांपासून दूरपर्यंत असलेल्या वनस्पतींच्या पुनरुत्पादनामध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे आगीद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे फटके प्रादेशिक पातळीबरोबर जागतिक पातळीवरील उत्पादकतेला बसणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना एक्स्टर विद्यापीठातील गणित विभागाचे प्रो. ऊंगर यांनी सांगितले, की वणव्यांचे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा पुरेसा अभ्यास झाला आहे. मात्र, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी अत्यल्प माहिती आहे. आमच्या अभ्यासातून वणव्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषक घटकांचा परिणाम त्याच्या सीमा ओलांडून दूरपर्यंत होत असल्याचे पुढे आले आहे. वणव्यातून निर्माण होणाऱ्या ओझोन प्रदूषणामुळे वनस्पतींची उत्पादकता लक्षणीयरीत्या कमी होते. हे प्रमाण दुष्काळामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षाही जास्त असू शकते.
  • अशा वणव्यांमुळे पृथ्वीच्या कार्बन प्रमाणावरील परिणामांचाही पुरेसा अभ्यास झाला आहे. आगीमुळे प्रतिवर्ष जागतिक पातळीवर कार्बन सरळ उत्सर्जित होतो. या कार्बनच्या ऱ्हासाची भरपाई पर्यावरणामध्ये झाडांवरील पानांची संख्या वेगाने वाढून काही प्रमाणात होते. तसेच मातीच्या श्वसनांमध्ये बदल होतात.
  • संशोधकांनी संगणकीय प्रारूपांच्या साह्याने प्रचंड माहितीसाठ्याचे विश्लेषण केले. २००२ ते २०११ या काळातील आगीतील प्रदूषकांचे अलग आणि एकत्रित परिणाम मोजण्यात आले.
  • पानांच्या पृष्ठभागावर जमा होणाऱ्या ओझोनच्या थरांमुळे - विशेषतः प्रकाश संश्लेषणामध्ये घट होऊन सकल प्राथमिक उत्पादकता (जीपीपी) लक्षणीयरीत्या घटते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे वणव्याच्या जवळच्या प्रदेशापेक्षा अधिक उत्पादकता घटही शेकडो किलोमीटर दूर वाऱ्याच्या दिशेनुसार दिसून येते.
  • सब सहारण आफ्रिकेतील पिके आणि हिरव्या पट्टे अशा उष्णतेसाठी आणि आगीपासूनच्या ओझोन प्रदूषणाच्या नुकसानीसाठी अधिक संवेदनशील असल्याचे दिसून आले. हवेतून प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम आधी समजल्या जाणाऱ्या परिणामांपेक्षा कितीतरी अधिक आहेत. विशेषतः पिकाच्या उत्पादनातील घट ही ग्रामीण आणि आदीवासी समुदायांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com