शेतकऱ्यांनी उघडले पूरक व्यवसायातील अनुभवाचे गाठोडे

शेतकऱ्यांनी उघडले पूरक व्यवसायातील अनुभवाचे गाठोडे
शेतकऱ्यांनी उघडले पूरक व्यवसायातील अनुभवाचे गाठोडे

सकाळ ॲग्रोवनच्या वतीने औरंगाबाद शहरातील जबिंदा मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शनिवारी (ता. २९) मराठवाड्यातील तीन प्रगतिशील शेतकऱ्यांनी पूरक, प्रक्रिया उद्योगातील आपल्या अनुभवाचे गाठोडे उघडले. प्रक्रिया आणि पूरक उद्योगातून कशी प्रगती साधता येऊ शकते याची इत्यंभूत माहिती फुलंब्री तालुक्यातील पाल येथील रवी राजपूत, अब्दी मंडी येथील लक्ष्मी खंडागळे आणि परभणी जिल्ह्यातील बरबड येथील श्रीधर सोलव यांनी दिली. कृषी प्रदर्शनात दुपारी पूरक उद्योगातून प्रगती या चर्चासत्रात उपरोक्त तीन शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. श्रीधर सोलव म्हणाले, ‘‘शेतीला पूरक उद्योग म्हणून रेशीम शेती किफायशीर आहेच, मात्र त्या पुढे जात मी परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन चाॅकी रेअरिंग सेंटर सुरू केले. त्यातून उत्तम आर्थिक फायद्यासोबतच शेतकऱ्यांना बाल्यावस्थेतील दर्जेदार चाॅकी मिळाल्या. सर्वांसाठी कमी वेळात उत्तम उत्पन्नांचा स्रोत सुरू झाला. नांदेड, लातूर, परभणी आदी जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबरीने आपल्या गटाचे जाळे तयार केले. दर्जेदार चाॅकी उत्पादनामुळे शेतकऱ्याकडून मागणी वाढली. रेशीम शेती दुष्काळातही साथ देत असल्याचे अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते. इतर शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही सुरवातीला कोषाचे उत्पादन घेतले. मालकीच्या पंधरा एकर शेतीपैकी सुरवातीला दोन एकरावर तुतीची लागवड केली होती. ती लागवड आता चाॅकी सेंटरमुळे अकरा एकर जाऊन पोचली आहे. तीन जिल्ह्यातील जवळपास पाचशे शेतकरी आपल्याकडून चाॅकी घेऊन जातात. त्याचा थेट फायदा मला होतो. दुष्काळातही अनेक शेतकऱ्यांना रेशीम शेतीने साथ दिली आहे. रेशीम शेतीची कास धरल्यास प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी लक्ष्मी नांदेल असा विश्वास आहे.’’ श्री रवी राजपूत म्हणाले, ‘‘दीड एकर शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी एका शेळीपासून सुरवात केली. टप्प्याटप्प्याने शेळ्यांच्या संख्येत वाढ केली. शेळीपालन सुरू करण्याआधी त्यातील शास्त्रीय बाबी समजून घेतल्या. आज घडीला सुमारे ५० शेळ्या माझ्याकडे आहेत. शेळीपालनाकडे वळण्याआधी शेतकऱ्यांनी त्या उद्योगाचा संपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यातील नेमक्या अडचणी समजून घेतल्यास तो उद्योग यशस्वी करणे आपल्याला शक्य होते. शेळ्यांचे आजार, त्यांचा खर्च याविषयीही संपूर्ण माहिती जाणून घेतल्याने आपण शेळीपालनात सातत्य राखू शकलो. तीच पद्धत इतर शेतकऱ्यांनी अवलंबल्यास शेळीपालनातून शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य आहे.’’ बंदिस्त शेळीपालन आणि संचार शेळी पालन याचीही माहिती श्री. राजपूत यांनी दिली. चारा व्यवस्थापनात नेमक्या कोणत्या चाऱ्याचा अंतर्भाव असावा, तो खाऊ घालण्याच्या वेळा नेमक्या कोणत्या याविषयीचा ही लेखाजोखा त्यांनी मांडला. पारंपरिक तेल घाना उद्योगाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या लक्ष्मी खंडागळे म्हणाल्या, ‘‘सासऱ्यांनी परंपरेने चालवलेला उद्योग बंद पडला होता. तो सुरू करण्याची संधी बचत गट स्थापन केल्याने मला मिळाली. कुटुंबातील लोकांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं तेल घाणा उद्योग सुरू केला. त्यात कुटुंबातील प्रत्येकाची साथ मिळाली. अनंत अडचणी आल्या, परंतु धैर्याने व कुटुंबाच्या साथीने प्रत्येक अडचणीवर मात करीत गेले. सुरवातीला साध्या पॅकिंगमधून विकल्या जाणारे तेल आता ब्रँडमध्ये रुपांतरीत झाले. अलीकडच्या तीन-चार वर्षांचा प्रवास तर मलाही चकित करणारा आहे. सकाळ ॲग्रोवनमध्ये माझ्या कार्याची यशोगाथा आल्यानंतर राज्यभरातून मला अभिनंदनाचे फोन आले. सोबतच शेकडो ग्राहक विविध जिल्ह्यांमधून माझ्याशी तेल खरेदी करण्याच्या अनुषंगाने जोडले गेले. आजघडीला केवळ आम्ही करडईच नव्हे, तर शेंगदाणा, तीळ, जवस, खोबरे उत्पादन करायला लागलो. तेलाचा ब्रॅंड देवगिरी ठेवण्यामागे गावातील देवगिरी किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणे एवढाच आहे. आपल्याकडील ज्ञान आपल्या पुरते मर्यादित न ठेवता मी इतरांनाही उद्योगाविषयी सातत्याने माहिती देत असते. जवळपास १८ ते २० लोकांनी माझ्याकडून आजवर माहिती घेऊन उद्योगाला सुरवात केली आहे. तेही स्थिरस्थावर होऊ पाहत आहेत. प्रामाणिकपणे उद्योग करताना पहिल्या दिवशी तेलाचा जो दर्जा होता, तोच दर्जा होता कायम ठेवला आहे. शुद्धता जपत असल्याने तेलाची मागणी सातत्याने वाढते आहे. आरोग्याविषयी जागरूक असलेले लोक विशेषत्वाने घाण्याच्या तेलाकडे वळत आहेत. काहीही खा, पण ते गावरान असेल याची काळजी घ्या, हाच आपला अनुभव आहे. शेतीला पूरक उद्योगाची जोड देताना निवडलेला तेल घाणा उद्योग आज आमच्या २० लोकांच्या कुटुंबाचा आधार बनला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com