AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक उत्पादनवाढीचे ‘डॉ. वने मॉडेल'

AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक उत्पादनवाढीचे ‘डॉ. वने मॉडेल'
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक उत्पादनवाढीचे ‘डॉ. वने मॉडेल'

ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ. दत्तात्रय सहदेव वने मानोरी, ता. राहुरी, जि. नगर डॉ. दत्तात्रय सहदेव वने हे १९९१ पासून तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करत सोयाबीन, हरभरा, गहू, कांदा या पिकांची लागवड करतात. डॉ. वने यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पाण्याचा योग्य वापर करत पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे ‘डॉ. वने मॉडेल' विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे मजुरी आणि पाण्यात बचत झाली. या तंत्रज्ञानामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढ मिळत आहे. डॉ. दत्तात्रय सहदेव वने हे नगर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी. त्यांची मानोरी शिवारात ७.०९ हेक्टर शेती आहे. उपलब्ध पाणी आणि बाजारपेठेचा विचार करून डॉ. वने यांनी पीक लागवडीचे नियोजन केले आहे. पाणी व्यवस्थापन, पीक नियोजन आणि कृषी अर्थशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे विषय. डॉ. वने हे १९९१ पासून तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करत सोयाबीन, हरभरा, गहू, कांदा या पिकांची लागवड करतात. सन २००७ मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पाण्याचा योग्य वापर करत पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे डॉ. वने मॉडेल विकसित केले. या तंत्रज्ञानामुळे मजुरी आणि पाण्यात बचत झाली. संवेदनशील अवस्थेत पिकाला पाणी देणे शक्य झाले. उपलब्ध पाण्यात दीडपट क्षेत्र लागवडीखाली आले. हे तंत्रज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता राज्यातील बागायती तसेच जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. या तंत्रज्ञानामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढ मिळाली. डॉ. वने यांनी स्वतःच्या लागवड क्षेत्राची शास्त्रीय पद्धतीने आखणी केली. तुषार सिंचन पद्धतीच्या नियोजनासाठी शेतीचा आराखडा करून पीव्हीसी पाइपलाइनचे जमिनीखालून जाळे तयार केले. उपलब्ध पाणी, लागवड क्षेत्र आणि बाजारपेठेतील दरांचा अंदाज घेत त्यांनी हंगामनिहाय पीक लागवडीचे नियोजन बसविले. पीक फेरपालटावर डॉ. वने यांनी भर दिला आहे. ते स्वतः सोयाबीन, हरभरा, गहू आणि कांदा बीजोत्पादन घेतात. टोकण पद्धतीने लागवडीवर भर देत योग्य प्रमाणात रोपांची संख्या ठेवतात. तुषार सिंचनातून पाणी व्यवस्थापन करतात. एकात्मिक कीड, रोग नियंत्रणावर त्यांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे पीक उत्पादनाचा हिशेब ठेवत नफा वाढवत नेला. जमिनीची सुपीकता, पाणी, विजेचा काटेकोर वापर, पीक फेरपालट, शाश्वत उत्पादनाची हमी आणि शेतमाल विक्रीचे नियोजन हे डॉ. वने यांच्या शेती व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. डॉ. वने यांना पूर्वी सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल उत्पादन मिळायचे, हे उत्पादन आता १२ क्विंटलवर पोचले आहे. हरभऱ्याचे एकरी उत्पादन सहा क्विंटलवरून ११ क्विंटल, गव्हाचे १२ क्विंटलवरून १८ ते २२ क्विंटल, कांद्याचे उत्पादन १२ टनांवरून २० टनांपर्यंत नेले आहे. शेतकरी बचत गटातून तंत्रज्ञान प्रसार ः

  • डॉ. वने यांनी कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी मानोरी गावामध्ये दीपस्तंभ फार्मर्स क्लब आणि एकता महिला स्वयंसहाय्यता शेतकरी बचत गटाची स्थापना केली. या उपक्रमामुळे गावशिवारातील शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने झाला. केवळ पीक उत्पादन, पाणी व्यवस्थापन, शेतकरी गटापुरते न थांबता उत्पादित शेतमालाला चांगला दर मिळावा, शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री होण्यासाठी डॉ. वने यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून दीपस्तंभ ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची सुरवात केली. यंदाच्या वर्षी कंपनीने हरभऱ्याच्या विक्रम जातीचे वीस हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेतले आहे. त्याचबरोबरीने कंपनीतर्फे गटातील शेतकऱ्यांच्या गव्हाची प्रतवारी करून थेट ग्राहकांना विक्रीचे नियोजन केले आहे. कंपनीने मानोरी गावात ३४० टन क्षमतेचे गोदामदेखील उभारले आहे.
  • शेती विकासाच्या बरोबरीने डॉ. वने यांनी राज्यातील कृषी विद्यापीठ तसेच शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शेती विकास आणि तंत्रज्ञान प्रसारातील महत्त्वाच्या कार्याबद्दल डॉ. वने यांना महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक कृषिभूषण आणि भारतीय कृषी संशोधन परिषेदने प्रयोगशील शेतकरी म्हणून गौरव केला आहे.
  • शेतीची वैशिष्ट्ये ः १) उपलब्ध लागवड क्षेत्राची आखणी करून हंगामनिहाय पीक लागवडीचे नियोजन. २) काटकसरीने पाण्याचा वापर, जमीन सुपीकतेवर भर. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. ३) तुषार सिंचनामुळे संवेदनशील अवस्थेमध्ये पिकाला पाणी. मजूर, वेळ आणि पाण्यामध्ये बचत. ४) बीजोत्पादनातून खात्रीशीर बियाण्यांची उपलब्धता. ५) एकात्मिक पद्धतीने खतांचा वापर. रासायनिक खतांची लागवडीपूर्वी पेरणी. सेंद्रिय खते, जिवाणू खतांच्या वापरावर जास्तीत जास्त भर. ६) टोकण पद्धतीने लागवड करून शेतात रोपांचे योग्य प्रमाण. ७) एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण. ८) स्वतःच्या शेतीवर तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन. ९) प्रत्येक पिकाचा लागवड ते विक्रीपर्यंतचा हिशेब. नफ्यातील २५ टक्के हिस्सा बचतीकडे वर्ग. १०) राहणीमानावरील खर्चाचा हिशेब ठेवून शेती नफ्याशी त्याची दरवर्षी तुलना. त्यानुसार वर्षभराच्या आर्थिक गणिताचे नियोजन.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com