AGROWON_AWARDS : तंत्रज्ञानातून शेती केली समृद्ध

तंत्रज्ञानातून शेती केली समृद्ध
तंत्रज्ञानातून शेती केली समृद्ध

ॲग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार - अविनाश बबनराव कहाते -  रोहणा, ता. आर्वी, जि. वर्धा अविनाश बबनराव कहाते हे रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील प्रयोगशील शेतकरी. परिसरातील बाजारपेठेची मागणी आणि शेतीतून नफा वाढविण्यासाठी कहाते यांनी हंगामानुसार भाजीपाला लागवडीवर भर दिला. कहाते यांनी रोहणा गावातील युवा शेतकऱ्यांच्या मदतीने कृषिमित्र स्वयंसहायता बचत गटाची उभारणी केली. गटाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील प्रयोगशील शेतकरी अविनाश कहाते यांनी पीक उत्पादनवाढीसाठी जमीन सुपीकता, लागवडीपासूनच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. पारंपरिक पिकांच्या बरोबरीने बाजारपेठांचा अंदाज घेत टोमॅटो, मिरची, हळद, काकडी, कोबी, केळी या पिकांच्या लागवडीवर त्यांनी भर दिला. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी विहीर आणि ठिबक सिंचनाचे त्यांनी नियोजन केले. विहिरीचे पुनर्भरण केल्यामुळे उन्हाळ्यातही पाणी पातळी टिकून असते. सुधारित शेतीकडे वाटचाल ः अविनाश कहाते यांचे शिक्षण कृषी डिप्लोमा पर्यंत झाले आहे. कहाते कुटुंबीयांची २१ एकर शेती. या शेतीमध्ये हंगामनिहाय पिकांच्या लागवडीचे नियोजन असते. वडिलांचे निधन झाल्यानंतर अविनाश यांनी शेतीची सूत्रे हाती घेतली. सुरवातीला सोयाबीन, कपाशी या पारंपरिक पिकांच्या व्यवस्थापनावर भर दिला. मात्र, वाढता खर्च आणि स्थिरावलेल्या उत्पादनामुळे जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी पीक बदलाचा निर्णय घेतला. अविनाश कहाते यांनी परिसरातील शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कृषी विभागाच्या वतीने आयोजित मेळावे, अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदविला. मोर्शी (जि. अमरावती) येथील गजानन बारबुद्धे आणि येरला (जि. अमरावती) येथील राजेंद्र जगाते यांच्याकडून टोमॅटो, मिरची व्यवस्थापनाचे तंत्र समजावून घेतले. त्यानंतर स्वतःच्या शेतीतील पीकपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा अंदाज घेत कहाते यांनी हंगामनिहाय टोमॅटो, कोबी, मिरची, कारली, काकडी, वांगी, खरबूज, हळद, केळी या पिकांच्या लागवडीचे नियोजन केले. खरिपात प्रामुख्याने काकडी, वांगी, मिरची, रब्बी हंगामात टोमॅटो, काकडी, कोबी आणि उन्हाळी हंगामात काकडी, टोमॅटो आणि खरबूज लागवड असते. वर्षभर पंधरा एकरामध्ये हंगामानुसार भाजीपाला आणि दीड एकरावर केळी, तीन एकरावर हळद लागवड असते. काकडीचे एकरी २५० क्विंटल, कारली १५० क्विंटल, मिरची २०० क्विंटल, वांगी ४० टन, टोमॅटो ५० टन, कोबी १५ टन असे उत्पादनाचे गणित आहे. उत्पादीत शेतमाल गटातील शेतकऱ्यांच्यासोबत अमरावती, वर्धा, आर्वी, पुलगाव, नागपूर बाजारपेठेत पाठविला जातो. गटशेतीतून प्रगती ः अविनाश कहाते यांनी रोहणा गावातील युवा शेतकऱ्यांच्या मदतीने कृषिमित्र स्वयंसहायता बचत गटाची उभारणी केली. आत्माअंतर्गत शेतकरी गटाची नोंदणी झाली आहे. गटातर्फे हंगामानुसार शिवार फेरी, पीकनिहाय गटचर्चेचे आयोजन केले जाते. या चर्चेनुसार गटातील शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करून पीक लागवडीचे नियोजन करतात. गटातील शेतकरी एकमेकांना पीक व्यवस्थापनात मदत करतात. याचबरोबरीने महत्त्वाचे म्हणजे एकत्रित भाजीपाला विक्रीचे त्यांचे नियोजन असते. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत आणि सर्व शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळण्यास मदत होते. गटातील माहितीच्या देवाणघेवाणीमुळे पीक उत्पादनात शेतकऱ्यांनी चांगली वाढ मिळविली आहे. येत्या काळात गावामध्ये गटाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी, भाजीपाला रोपवाटिका आणि रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादनाचे ध्येय सभासदांनी ठेवले आहे. २०११-१२ मध्ये समूहाद्वारे कृषी विभागाच्या सहकार्यातून थेट बांधावर खत पोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाचा गावातील शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. शेतीमधील प्रयोगशीलता आणि गटाच्या माध्यमातून गावशिवारातील शेतकऱ्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य लक्षात घेऊन अविनाश कहाते यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शेती नियोजनाची सूत्रे ः १) संपूर्ण २१ एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली. २) जमीन सुपीकतेवर भर. हिरवळची पिके, शेणखताच्या वापरावर भर. ३) भाजीपाला लागवडीकरिता गादीवाफा, सुधारित पद्धतीने लागवड. ४) पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा वापर, एकात्मिक कीड, रोग नियंत्रण. ५) क्रॉप कव्हर, आच्छादन तंत्राचा योग्य वापर. ६) बाजारपेठेचा अंदाज घेत गटाच्या माध्यमातून भाजीपाला लागवडीचे नियोजन. ७) शेतकरी समूहाच्या माध्यमातून एकत्रित भाजीपाला विक्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com