agricultural stories in Marathi, agrowon, bambu harvesting at right stage is important | Agrowon

योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणी

डॉ. हेमंत बेडेकर
रविवार, 17 मार्च 2019

परिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला भरपूर नवीन कोंब येतात. कोणत्याही परिस्थितीत सर्व बांबू तोडून बेट साफ करू नये. अशा बेटांपैकी सुमारे ४० टक्के बेटे मरतात. हे आपलेच नुकसान आहे.

बांबू हे बहुवार्षिक गवत आहे. त्यामुळे त्याची कापणी दरवर्षी केली तरच तो सातत्याने उत्पादन देतो. बांबू जून झाल्यानंतर जे लाकडाचे गुणधर्म असतात त्याचा वापर आपण करत असतो. म्हणून बांबू कापताना तो जून अथवा परिपक्व अवस्थेत असेल तरच त्याचा उपयोग होतो. कोवळा बांबू कोणत्याच कामाचा नसतो. सध्याच्या काळात तोडले जाणारे बांबू हे ४० ते ५० टक्के कोवळे बांबू असतात. हे आपले नुकसान आहे.

परिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला भरपूर नवीन कोंब येतात. कोणत्याही परिस्थितीत सर्व बांबू तोडून बेट साफ करू नये. अशा बेटांपैकी सुमारे ४० टक्के बेटे मरतात. हे आपलेच नुकसान आहे.

बांबू हे बहुवार्षिक गवत आहे. त्यामुळे त्याची कापणी दरवर्षी केली तरच तो सातत्याने उत्पादन देतो. बांबू जून झाल्यानंतर जे लाकडाचे गुणधर्म असतात त्याचा वापर आपण करत असतो. म्हणून बांबू कापताना तो जून अथवा परिपक्व अवस्थेत असेल तरच त्याचा उपयोग होतो. कोवळा बांबू कोणत्याच कामाचा नसतो. सध्याच्या काळात तोडले जाणारे बांबू हे ४० ते ५० टक्के कोवळे बांबू असतात. हे आपले नुकसान आहे.

तोडणीस तयार बांबू ः

तोडणीस तयार बांबू ओळखायचा कसा? हा एक प्रश्न सर्वांना आहे. जर आपण बांबूजवळ वारंवार गेलो तर आपल्याला हे ओळखणे शक्य असते. त्याआधी बांबूची वाढ कशी होते ते समजून घेऊ.
१) लागवडीनंतरच्या पहिल्या पावसात बांबू जमिनीत स्थिरावतो. त्याला थोडी पाने येण्याव्यतिरिक्त काहीही वाढ होत नाही.
२) दुसऱ्या वर्षी पाऊस पडू लागल्यावर साधारणपणे १५ दिवसांनी अगर बागायती लागवडीत जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लावलेल्या बांबूच्या बाजूला जमिनीतून एक किंवा दोन कोंब वर येऊ लागतात. हे कोंब भराभर वाढू लागतात. बांबू जातीच्या वैशिष्ट्यानुसार त्याची उंची ठरते. ही उंची या ६० ते ७० दिवसात पूर्ण केली जाते. त्यामुळेच बांबूला सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती म्हणतात.
३) बांबू परिपक्व होण्यासाठी पुढील दोन ते अडीच वर्षे लागतात. या काळात त्याची जाडी, रंग व त्यातील अन्नपदार्थांची वाढ होते. तिसऱ्या पावसानंतर त्याला फांद्या येण्यासाठी सर्व पेरांवर कळ्या येऊ लागतात. या कळ्यांच्या संरक्षणासाठी पाने येतात. ही पाने त्या फांद्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत तेथेच राहतात. त्यामुळे पेरांवर पाने असणारे बांबू हे दोन वर्षांचेच असतात.
४) चौथ्या पावसाळ्यात म्हणजेच कोंब उगवल्यानंतर तीन वर्षांनी फांद्यांवरची पाने पूर्ण झडून जातात. बांबूचा रंग बदलून तो थोडासा गर्द व काळपट हिरवा दिसतो. काही बांबूंवर (माणगा) पांढरी लव किंवा पांढरट आवरण दिसते. काही बांबूत थोडा लाकडासारखा रंग दिसू लागतो. हा बांबू परिपक्व असतो. पाऊस संपताच दिवाळीनंतर तोडण्यास व वापरण्यास योग्य होतो.

कोवळ्या बांबूची तोडणी टाळा...

१) तोडणी करणारे छातीठोकपणे सांगतात की आम्ही फक्त तयार बांबू तोडू, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. शेतकरी तोडणाऱ्यावर विश्वास ठेवतात. तोडीच्या जागी उभे राहण्याची तसदी घेत नाहीत. तोडणाऱ्याला तोडलेल्या बांबूच्या संख्येत पैसे मिळत असल्याने कच्चे बांबूही तो तोडतो. शेतकऱ्याला संख्येनुसार पैसे मिळतात. कोवळे बांबू तोडण्याचा फटका शेतकऱ्याला व विकत घेणाऱ्याला बसतो. कोवळे बांबू काही कामाचे नसतात. हे टाळावयाचे कसे? यासाठी एक सोपी पद्धत राष्ट्रीय बांबू अभियानाने सुचवली होती. कच्चे बांबू तुटून नुकसान होऊ नये म्हणून अमलात आणली पाहिजे.

रंग पट्टा पद्धत :

दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत नवीन बांबूची वाढ (उंची) पूर्ण होते. बांबूची तोडणी दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये करावयाची असते. म्हणून ऑक्टोबरमध्ये नवीन आलेल्या बांबूच्या खालून दुसऱ्या पेराला जर एक ठराविक रंगाचा पट्टा ओढला तर बरोबर त्यावर्षीचा बांबू ओळखता येतो. असे दरवर्षी पट्टे काढले तर बरोबर कोणता बांबू तोडायचा हे सांगता येते. बांबू सोसायटीने हे रंग ठरवले आहेत. तोडणीच्या वर्षामध्ये असे गृहीत धरले आहे, की तोड ऑक्टोबर ते एप्रिल या काळात होणार आहे.

बांबूची तोड किती वर्षांनी करावी?

१) आपल्याकडे एक वर्षाआड किंवा दोन वर्षानंतर तोड करायची प्रथा आली. हे चुकीचे आहे. परिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला भरपूर नवीन कोंब येतात.
२) एक बांबू तोडला की त्याच्या जमिनीतील कंदातून दोन कोंब येऊ शकतात. जर आपण पाणी देत असू किंवा जर पाऊस व्यवस्थित असेल तर हे दोन कोंब येतातच. असे दोन कोंब जुन्या तोडलेल्या बांबूच्या बगलेतून येत असतात.
३) जर आपण यापूर्वी चार बांबू तोडले असतील तर त्यातून आठ बांबू येण्याची क्षमता आहे. पुरेशी अन्नद्रव्ये,संरक्षण आणि पाणी मिळाल्यास यातील बहुतांश कोंबाचे बांबूत रुपांतर होते, उत्पादन जास्त मिळते. एक वर्षाआड बांबू तोडून आपण आपले नुकसान करून घेतो.
४) कोणत्याही परिस्थितीत सर्व बांबू तोडून बेट साफ करू नये. अशा बेटांपैकी सुमारे ४० टक्के बेटे मरतात. हे आपलेच नुकसान आहे.
५) बांबू तोडताना शेतकऱ्याने प्रत्यक्ष उभे राहण्याची तसदी घ्यावी. तरच योग्य बांबू तुटतात.

तोडताना घ्यावयाची काळजी :

१) शक्यतो बांबू करवत किंवा यांत्रिक करवतीने तोडावा. कोयत्याने बांबू तोडताना तळाला पिचकतात. त्यातून कीड, वाळवी लागण्याची भीती असते. करवतीने बेटाच्या आतपर्यंत बांबू तोडता येतो. करवतीने तोडणे व कोयत्याने तोडणे यामध्ये सारख्याच संख्येने बांबू एका दिवसात तोडता येतात.
२) काटेरी बांबू तोडण्यापूर्वी आधीपासून त्याच्या कोवळ्या फांद्या काढाव्यात. तोडताना त्रास कमी होतो. काटेरी बांबुचू वेगळी बाजारपेठ आहे. कोल्हापूरला जुन्या लाकूड बाजारात दर आठवड्याला ठराविक दिवशी लिलाव होतो. शेतकऱ्यांनी ही बाजारपेठ पाहून यावी.
३) बांबू तोडल्यानंतर हिरवा असतानाच तो बाजारात न्यावा. जेवढा बांबू हिरवा तेवढा त्याचा वापर चांगला करता येतो.

मूल्यवर्धन :

१) शक्यतो बांबूचे २० फुटांचे तुकडे करावेत. वरच्या निमुळत्या तुकड्यांचे स्वतंत्र पैसे होतात. हे तुकडे फळबागांसाठी खूप उपयोगी पडतात.
२) विदर्भ, मराठवाड्यात तसेच इतरही ठिकाणी बांबूच्या वरच्या तुकड्यांना मागणी असते. बांबूचे असे तुकडे करून विकले तर शेतकऱ्याला फायदा होतो. कंत्राटदार असे तुकडे करूनच विकतो. आपण आळस न करता हे श्रम घेऊन आपल्या उत्पन्नात भर घालावी.

संपर्क ः डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५
(लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)


इतर वन शेती
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
पारंपरिक बांबू लागवडीचे व्यवस्थापनसहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १०...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
बांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
बांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
बांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...
वाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...
बांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
अशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
जमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...