थंडीच्या काळात केळी बागांची काळजी

थंडीच्या काळात केळी बागांची काळजी
थंडीच्या काळात केळी बागांची काळजी

केळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४ दिवसांनी जाणवू लागतात. पानाचा पृष्ठभाग फिक्कट पिवळा पडतो. थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. बागांना संध्याकाळी किंवा रात्रीचे वेळेस पाणी द्यावे. शिफारशीनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा. सध्याच्या काळातील थंडीचा विपरित परिणाम केळीच्या वाढीवर होत आहे. कमी तापमानामुळे फळांच्या सालीमधील रस गोठतो. रस वाहून नेणाऱ्या शिरा रंगहीन होतात. त्यामुळे फळाला फिक्कट पिवळा रंग येतो. कधी कधी फळे करड्या विटकरी रंगाची होतात. १) कमी तापमानामुळे केळफूल बाहेर पडण्यास विलंब होतो. तसेच काही वेळेस बाहेर पडलेला घड अविकसित स्वरूपाचा असतो. २) कमी तापमानामुळे फळाच्या सालीच्या आतील भागावर, पाणीदार ठिपके तयार होतात, त्यामुळे फळ पिकण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो. अशी फळे पिकत असताना साल काळी पडते. ३) केळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४ दिवसांनी जाणवू लागतात. पानाचा पृष्ठभाग फिक्कट पिवळा पडतो. नवीन येणाऱ्या पानाची मध्यशीर तांबूस तपकिरी होते. त्यावर पाणीदार ठिपके येतात. पूर्ण वाढलेल्या पानांचा देठ मोडून, खोडाभोवती लोंबत राहतात. अशी पाने नंतर पिवळी पडून, वाळून जातात. ४) कमी तापमानामुळे खोडावरील दोन पानांमधील अंतर कमी असल्याचे आढळते. त्यामुळे संपूर्ण झाड खुरटल्यासारखे बुटके वाढते. ५) घड बाहेर पडण्याच्या वेळेस कमी तापमान असल्यास, घड लवकर बाहेर पडत नाही. घड खोडामध्येच अडकून बसतो. अशाप्रकारचे घड कालांतराने बाहेर पडल्यानंतर त्यावर उन्हामुळे करपटल्यासारखी लक्षणे दिसू शकतात. अशा घडावरील फळे व्यवस्थित विकसित होत नाहीत. ६) तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी गेल्यावर झाडांची वाढ थांबते. नवीन पानांची निर्मिती होत नाही. मुळांचा विकास थांबतो. कमी तापमानामुळे अन्नघटकांची उपलब्धता घटते. तापमानामुळे पोटॅश, मॅग्नेशियम, लोह व जस्ताची कमतरता जाणवते. बागांमध्ये करपासुद्धा वाढतो. ७) दोन ते चार महिने वयाच्या बागांचे पांढरे पोंगे येतात. पानांचा आकार अतिशय छोटा येतो. ८) चुनखडीयुक्त जमिनीत लोह घटकांची कमतरता जाणवते. लहान झाडांचे पोंगे करपतात. ९) कमी तापमानामुळे नवीन आलेला पोंगा आकाराने वेडावाकडा निघतो. १०) कमी तापमानामुळे झाडाची पाने एकाकी पिवळी होऊन करपतात यालाच आपण चरका म्हणतो. ११) कमी तापमानामुळे घडांचा विकास थांबतो. कांदेबाग व पिलबागाची केळी कापणीस लवकर तयार होत नाहीत. १२) केळी फळाच्या सालीवर कमी तापमानामुळे चिलिंग इफेक्‍ट होतो, अशी केळी पिकताना रंग व चकाकी येत नाही. उपाययोजना ः १) थंडीच्या काळात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. बागांना संध्याकाळी किंवा रात्रीचे वेळेस पाणी द्यावे. ओलसर माती उष्णता बराच काळ राखून ठेवते. २) बागेमध्ये जागोजागी शेकोटी पेटवून धूर करावा. त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा भुसा, वाळलेला पालापाचोळा किंवा उसाचे पाचट वापरावे.पहाटे शेकोट्या पेटवल्यास तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्यास मदत होते. धुराचा थर केळीच्या बागेवर असल्यामुळे शीतलहरी बागेमध्ये घुसत नाहीत. ३) बागेमध्ये येणाऱ्या शीतलहरींना बागेमध्ये शिरण्यापासून अटकाव करणेकरिता बागेभोवती शेडनेट लावावे. ४) लहान बागांवर सूक्ष्म अन्नद्रव्य ३० मिलि, फेरस सल्फेट ३० ग्रॅम प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५) बागेतील प्रत्येक झाडाला झिंक सल्फेट दहा ग्रॅम व फेरस सल्फेट दहा ग्रॅम द्यावे. ६) पाच महिन्यांपेक्षा मोठ्या बागेला १० ते १२ लिटर प्रती झाड पाणी द्यावे. दोन ते तीन महिन्यांच्या बागांना ६ ते ८ लिटर पाणी दररोज द्यावे. ७) मुळाच्या कक्षेत कायम वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी. ९) निसवलेल्या बागेतील घडावर स्कर्टिंग बॅग घालावी. जेणेकरून फळांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम जाणवणार नाहीत. १०) केळीच्या घडावर ०ः५२ः३४ विद्राव्य २० ग्रॅम प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली असता फळांचे पोषण होण्यासाठी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

संपर्क ः बी. जी. टेमकर, ९४२२५१९१४३ (उद्यानविद्या विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com