जैविक कीड रोग नियंत्रणासाठी भू सूक्ष्मजीवशास्त्र

जैविक कीड रोग नियंत्रणासाठी भू सूक्ष्मजीवशास्त्र
जैविक कीड रोग नियंत्रणासाठी भू सूक्ष्मजीवशास्त्र

एकात्मिक कीड नियंत्रणाच्या अनेक पद्धती असल्या तरी त्यातील विषारी रसायनांच्या साह्याने रोग किडी नियंत्रण करण्याची पद्धत प्रचलित आहे. नियंत्रणाच्या अनेक पद्धतींमध्ये जैविक म्हणजेच या किडींच्या शत्रू कीटक, बुरशींच्या साह्याने शाश्वत व पर्यावरणपूरक नियंत्रण शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर देश परदेशातील कृषी विद्यापीठे, खासगी संस्थांमध्ये संशोधनाला वेग आला. निसर्गामध्ये एकमेकांवर जगणाऱ्या सजीवांचे अस्तित्त्व पुरातन आहे. पिकांवरील किडींवर प्रादुर्भाव करणाऱ्या बुरश्या आणि त्यावर जगणारे भक्षक किंवा परजिवी यांचे जसेजसे ज्ञान होत गेले, तसतसे त्याचा वापर शेतीमध्ये वाढू लागला. अर्थात, या अभ्यासासाठी आणि व्यापारी उत्पादनांची निर्मितीमध्ये मोठे आव्हान होते. किडींवर जगणाऱ्या कीटकांची ओळख, त्यांचे जीवनचक्र अभ्यासणे, प्रयोगशाळेमध्ये वाढीयोग्य वातावरणाची निर्मिती करणे, जोपासना करणे आणि पुन्हा ते प्रत्यक्ष शेतामध्ये कितपत व किती काळ कार्यरत राहतात, अशा अनेक घटकांवर अभ्यास सुरू असतो. त्यानुसार वेळापत्रक तयार केले जाते. त्यातही प्रतिएकर किती कीटक सोडायचे, याचे गणित बसवावे लागते. परजीवी बुरशीबाबतही हीच प्रक्रिया असते. अशी बुरशी अन्य बुरशीपासून वेगळी करून, त्यांचे प्रयोगशाळेत शुद्ध कल्चर वाढविणे, त्या वाढीसाठी आवश्यक कृत्रिम माध्यम तयार करणे, व्यापारी उपयोगी कल्चर तयार करणे, विक्रीयोग्य अवस्थेत साठवणूक व प्रत्यक्ष शेतापर्यंत पोचेपर्यंत योग्य वातावरण टिकवणारे पॅकिंगनिर्मिती अशा स्वरूपाची अनेक कामे असतात. ही शास्त्रज्ञ किंवा प्रयोगशाळेच्या पातळीवरील कामे. शेतकऱ्यांच्या पातळीवर जैविक कीडरोग नियंत्रणासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण करणे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ जैविक कीडनाशकांच्या वापरांच्या शिफारशी करून हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचणार? जैविक कीटकनाशकांच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अन्यथा योग्य परिणामकता न दिसल्यास हे चांगले तंत्रही बदनाम होऊ शकते. पुन्हा शेतकऱ्यांना त्याकडे वळवणे अवघड होऊन बसते. यासाठी उत्पादकाकडून प्रथम वितरकांचे, वितरकाकडून ग्राहकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष शेतात योग्य वापर या पायऱ्यांवर काम झाल्यास त्यांचा प्रसार उत्तम होऊ शकतो. आज बाजारात उपलब्ध जैविक नियंत्रक घटक - कीटक वर्गीय ः- १. ट्रायकोग्रामा चिलोनिस -खोडकिडे व फळ पोखरणाऱ्या अळ्या, बोंड अळ्यासाठी २. लेडी बर्ड बिटल - मावा सारख्या किडीसाठी. ३. क्राय सोपा, सिरफिड माशी - लोकरी मावा बुरशी वर्गीय परजीवी १. व्हर्टिसिलियम्‌ लेकॅनी - मावा, रसशोषक किडी २. मेटारायझिम अॅनासोप्ली - फुलकिडे, हुमणी ३. बिव्हेरिया बॅसियाना - पांढरी माशी, हुमणी ४. हिरसुर्टेल्ला थाम्प सोनी - कोळी वर्गीय किडी ५. पॅसिलोमायसिर लिनेसिनस - सूत्रकृमी ६. नोमूरिया रिठाई - सोयाबीनवरील अळी बुरशी वर्गीय रोगनाशके ः- १. ट्रायकोडर्मा व्हिरीडी - मररोग २. सुडोमोनस - पानावरील रोग ३. बॅसिलस सबटिलीस - पानावरील रोग विषाणू ः- एन. पी. व्ही आणि एच. एन पी. व्ही. - विविध अळ्यांना रोगग्रस्त करून मारण्यासाठी. बाजारात जैविक कीटकनाशके, बुरशीनाशकांची उपलब्धताही अल्प आहे. रासायनिक कीडनाशकांच्या विक्रीची अनेक दुकाने असली तरी जैविक घटकांची उपलब्धता एखाद्याच दुकानातून होते. एखाद्याच साखर कारखान्यावर त्याची सातत्यपूर्ण उपलब्धता होते. या साऱ्यांकडे चौकशी केली असता फारसा खप नसल्याचे उत्तर मिळते. एका साखर कारखान्यांच्या ऊस विकास अधिकाऱ्यानेही जैविक घटक फारसे कार्यक्षम नसल्याचा दावा केला. माझा स्वतःचा अनुभव मात्र उत्साहवर्धक आहे. माझ्या एका रानातील उसाची वाढच खुंटल्याचे लक्षात आले. विविध रसायनांचा वापर करूनही परिणाम दिसत नव्हता. अखेर भरणी करीत असता हुमणीच्या प्रादुर्भावाची नोंद झाली. हुमणी पाचवेळा कात टाकते. दुसऱ्या कातीनंतरच्या अवस्थांवर रासायनिक कीटकनाशकांच्या आळवणीचाही फारसा उपयोग होत नसल्याचे मला माहीत होते. त्यामुळे परिस्थितीनुसार नाहक खर्च टाळण्याच्या उद्देशाने रसायनांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. जैविक नाशकांची माहिती असली तरी परिणामकारकतेविषयी खात्री नव्हती. माफक अपेक्षेने जैविक उपाययोजना सुरू केल्या आणि १०-१२ दिवसांतच फरक दिसू लागला. हिरवीगार नवीन पाने येऊ लागली. १.५-२ महिन्यांत पीक चांगलेच सुधारले. तोडणीच्या वेळी ५० टन/ एकर उत्पादन मिळाले. या अनुभवावर अॅग्रोवनमधून लेख लिहिला. पुढे ८ दिवस सतत फोन खणखणत होता. तेव्हा मला हुमणी या समस्येची तीव्रता लक्षात आली. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याचा अनुभव व माझा परस्पर विरोधी कसे? याचा शोध सुरू झाला. जैविक कीटकनाशकापैकी अनेक बुरशीवर्गीय असून, त्या बुरशी पिकांवर कोणताही रोग आणत नाहीत. त्या मृत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून सेंद्रिय खत करणाऱ्या गटातील आहेत. याला वैज्ञानिक भाषेत सॅप्रोफाईट गट असे म्हणतात. या गटात अगणिक बुरशींचा समावेश असून, त्यापैकी काही बुरशीच्या प्रजाती या हुमणी अगर इतर काही किडींच्या संपर्कात आल्यास त्या किडींच्या शरीरावर वेगाने वाढतात. किडी रोगग्रस्त होऊन मरतात. या बुरशी जमिनीत वाढत असल्या तरी त्यांच्या बिजाणूंचा प्रसार हवेतूनही इतरत्र होऊ शकतो. त्यांचे मुख्य काम सेंद्रिय पदार्थांचे विघटन हेच आहे. त्यामुळे रानात सतत किडी उपलब्ध असतीलच असे नाही. किडी उपलब्ध असल्यास त्यावर त्या वाढतात. याचाच अर्थ या बुरशी कायमस्वरूपी आपल्या जमिनीत वाढत राहायच्या असतील, तर त्यांचे मुख्य खाद्य म्हणजे कुजण्यास जड पदार्थ रानात असणे गरजेचे आहे. ते नसल्यास त्यांचे कामकाज चालू शकणार नाही. मी बिना नांगरता उसाचे जमिनीखालील अवशेष तसेच ठेवून मारून टाकून पुढील पीक घेतो. यामुळे माझ्या जमिनीत उत्तम हुमणी नियंत्रण झाल्याचे लक्षात आले. अन्य शेतकऱ्यांकडे रानात बाहेरून बुरशीचे कल्चर टाकले तर त्यांची वाढ होण्याची शक्‍यता कमी राहते. म्हणजे ऊस विकास अधिकाऱ्यांने सांगितलेलेही चुकीचे नव्हते. मात्र, त्याचे कारण बुरशींच्या कार्यक्षमतेमध्ये नसून, त्यांच्या वाढीसाठी योग्य परिस्थितिकीच शेतात उपलब्ध नाही, हे आहे. निसर्गात कोणताच सूक्ष्मजीव एकटा कार्यक्षम अशू शकत नाही, हा भू-सूक्ष्म जीवशास्त्राचा एक प्रमुख पायाभूत सिद्धांत आहे. सूक्ष्मजीवाची प्रजाती व त्यांच्यासाठी आवश्यक परिस्थिती यांच्या समन्वयातूनच त्यांची वाढ, पुनरुत्पादन होईल. व्यापारी तत्त्वावर जैविक नियंत्रणासाठी फक्त प्रजाती शोधणे व त्याचे कल्चर करून विकणे यातून नियंत्रणाचे तात्पुरते किंवा अत्यल्प परिणाम मिळतील. त्यातून हे तंत्र बदनाम होईल. मात्र, या तंत्रामध्ये शाश्वत नियंत्रणाची क्षमता असून, या बुरशींच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार करण्याची आवश्यकता असते, असे मला वाटते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com