नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...

नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...
नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...

मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर बागेमध्ये आडवी-उभी नांगरणी व वखरणी करावी. प्रत्येक झाडाला आळे तयार करून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा झाडाचा ताण तोडताना ३० ते ४० किलो शेणखत आणि शिफारशीत रासायनिक खतमात्रा हलक्या ओलितासोबत द्यावी. लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असतो. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. निसर्गतः मोसंबीला वर्षातून तीनदा बहर येतो. त्यापैकी जून-जुलैमधील बहरास मृग बहर, ऑक्‍टोबरमधील बहरास हस्त बहर आणि जानेवारी-फेब्रुवारीमधील बहरास आंबे बहर म्हणतात. बहर नियोजन ः १) बहर धरण्याकरीत्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व अवस्था पाहून ताण द्यावा. हलक्या जमिनीत ३५ ते ४५ दिवस, मध्यम जमिनीत ४५-६० दिवस आणि भारी जमिनीत ५५ ते ६५ दिवस ताण द्यावा. २) आंबिया बहरासाठी ५ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यत ताण द्यावा. ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास क्लोरमेक्वाट क्लोराईट (१००० पीपीएम) एक लिटर पाण्यात २ मि.लि. प्रमाणात फवारणी करावी. अशी महात्मा फुले कृषी विद्यापिठाची शिफारस आहे. ३) मोसंबीची झाडे निसर्गतः थंडी आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे विश्रांती घेतात. वाढ थांबल्यामुळे अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो. ४) डिसेंबरचा पहिला आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः १० अंश सेल्शिअसपेक्षा कमी असते, परिणामी झाडांना नैसर्गिक ताण बसतो. यामुळे मोसंबीच्या आंबे बहराला ‘नैसर्गिक बहर’ म्हणतात. ५) काळ्या जमिनीत झाडे ताणावर सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो. त्यामुळे झाडाला ताण बसत नाही. सध्याच्या काळात झाडांच्या ओळींमधून ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. त्यामुळे टोकावरची तंतूमुळे तुटल्याने झाडाला ताण बसतो. पाणी व्यवस्थापन : आंबिया बहराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध असणे जरुरीचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते. फळांची प्रत खालावते म्हणून आंबे बहर घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. ओलितासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आंबे बहरातील फळांच्या दर्जेदार उत्पादनासाठी : १) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून झाडे ताणावर सोडल्यानंतर बागेमध्ये आडवी-उभी नांगरणी व वखरणी करावी. २) प्रत्येक झाडाला आळे तयार करून ३० ते ४० किलो शेणखत आणि रासायनिक खत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा झाडाचा ताण तोडतांना हलक्या ओलितासोबत द्यावी. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ३) जानेवारी महिन्यात ३२० ग्रॅम नत्र आणि १५० ग्रॅम स्फुरद त्यानंतर मार्च महिन्यात ३२० ग्रॅम नत्र आणि १५० ग्रॅम स्फुरद, त्यानंतर मे महिन्यात १६० ग्रॅम नत्र आणि ३०० ग्रॅम पालाश, त्यानंतर जुलै आणि सप्टेंबर महिन्यात १५० ग्रॅम पालाश, प्रति झाड याप्रमाणे द्यावी. ४) खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची असल्यास ६०० ग्रॅम नत्र आणि ४५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष ठिबक सिंचनाद्वारे आणि २० किलो शेणखत, १५ किलो निंबोळी पेंड आणि ३०० ग्रॅम स्फुरद प्रति झाड प्रति वर्ष जमिनीतून द्यावीत. ५) सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास मार्च महिन्यात नवीन पालवी आल्यानंतर झिंक सल्फेट (०.५ टक्के), मँगेनीज सल्फेट (०.५ टक्के) व मँग्नेशियम सल्फेट (०.५ टक्के) आणि फेरस सल्फेट (०.३ टक्के) आणि कॉपर सल्फेट (०.३ टक्के) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करून घ्यावीत. बहर धरताना महत्त्वाच्या गोष्टी ः १) ताण देण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या, रोगट फांद्या काढून टाकाव्यात. २) किती काळ ताण द्यायचा हे जमिनीची प्रत व झाडाचे वय पाहून निश्चित करावे. ३) आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ४) सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची लागवड करावी. कीड नियंत्रण ः सिट्रस सायला: प्रादुर्भाव ः १) कीड झाडाच्या कोवळ्या फांद्या, पाने आणि कळ्यातील रस शोषून घेते परिणामत: प्रौढ पाने, फुले, नवीन कळ्या, व कोवळ्या फांद्यांमधून रस शोषण करते. लक्षणे ः १) पाने गळून पडतात, कोवळ्या फांद्या वाळून जातात. लहान फळे गळून पडतात. नियंत्रण ः (प्रति लिटर पाणी) डायमेथोएट २ मि.लि. किंवा नोव्हॅल्युराॅन ०.५५ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड ०.५० मि.लि. कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.

संपर्क ः - नितीन दलाल, ९९२२४५०९९० - शक्तीकुमार तायडे, ८२७५९५३४४८ (उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com