कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण व्यवस्थापन

कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण व्यवस्थापन
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण व्यवस्थापन

सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून, तो काही भागात आर्थिक नुकसान पातळीवर आहे. किडीच्या वाढीसाठी पोषक अशा कोरड्या व उष्ण वातावरणात तो अधिक वाढू शकतो.  नियंत्रणाच्या उपाययोजना वेळीच कराव्यात. कपाशी पिकामध्ये ६० ते ७५ दिवसांपर्यंत मावा, तुडतुडे व फुलकीडे या किडीचा प्रादुर्भाव लक्षणीय असतो, ७५ दिवसांपासून पुढे (म्हणजे सप्टेंबरपासून पुढे) पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. सर्वसाधारण अॅाक्टोबर महिन्यात सर्वाधिक दिसतो. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पिकाच्या एक महिन्यापासूनच दिसत असला तरी तो अगदी नगण्य असतो. मात्र, कपाशीच्या पहिल्या दोन ते अडीच महिन्याच्या काळात मावा, तुडतुडे व फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी केलेल्या फवारण्यांचा सामना पांढरी माशीसुद्धा करते. परिणामी या कीटकनाशकांप्रती पांढऱ्या माशीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. या माशीची एक पिढी १५ ते २१ दिवसांची असते. कापूस पीक कालावधीत एका पाठोपाठ एक अशा ६ ते ८ पिढ्या होतात.

  •  पहिल्या दोन ते अडीच महिन्यांत रस शोषक किडीचे (मावा, तुडतुडे व फुलकिडे) यांचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने केले असल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यास मदत होईल.
  •  कपाशी पिकाची लागवड शिफारशीत अंतरावर केलेली असावी.
  •  नत्र खतांचा जमिनीतून किंवा फवारणीद्वारे शिफारशीप्रमाणेच वापर करावा. अन्य पीक लुसलुसीत होऊन रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  •  या किडीच्या सुरवातीच्या अवस्थेत नियंत्रणासाठी निम कीटकनाशकाचा वापर करावा. अशाप्रकारे संपूर्ण गावपातळीवर किंवा विभागीय पातळीवर शिफारशीत प्रमाणात वापर करावा.  
  •  एकच एक कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरू नये. विशेषतः सिंथेटीक पायरेथ्राईड वर्गातील कीटकनाशके वारंवार वापरल्यास पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावात वाढ होते.
  •  एकापेक्षा अधिक कीटकनाशके मिसळून फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. तोही किडींच्या उद्रेकास कारणीभूत ठरतो. कीड एकाच वेळी दोन कीटकनाशकांचा सामना करते. त्यातून वाचलेल्या किडी स्वतःमध्ये प्रतिकारशक्ती तयार करतात. यांच्या पुढील पिढ्या कीटकनाशकांसाठी प्रतिकारक झाल्याने अपेक्षित नियंत्रण मिळत नाही.
  •  नियंत्रणासाठी केवळ कीटकनाशकांवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड  व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
  • नुकसानीचा प्रकार: पांढऱ्या माशीची पिल्ले एका ठिकाणी स्थिर राहून पानातील रस शोषतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास अशी पाने लालसर ठिसूळ होतात. शिवाय ही पिल्ले शरीरातून गोड चिकट द्रव्य बाहेर टाकतात. त्यावर कालांतराने काळी बुरशी वाढुन पाने व झाड चिकट आणि काळसर होते. परिणामी सूर्यप्रकाशात अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होऊन झाडाची वाढ खुटते. उमललेल्या बोंडातील कापूस चिकट होतो. याचा कापसाच्या प्रतिवर अनिष्ट परीणाम होतो. या शिवाय प्रादुर्भावग्रस्त झाडांना पात्या, फुले आणि बोंडे  पाहिजे त्या प्रमाणात लागत नाही. उत्पादनात घट येते.

    प्रतिबंधक उपाययोजना ः

  •  कापूस पिकाची वेचणी वेळेवर करावी.
  •  कापूस पिकाची फेरपालट पांढऱ्या माशीची खाद्यपिके नसलेल्या पिकाबरोबर करावी.
  •  नत्रयुक्त खताचा आणि ओलिताचा आवश्‍यकतेपेक्षा अधिक वापर टाळावा. कपाशीचे पिक दाटणार नाही, याची काळजी घ्यावी.
  •  पिवळ्या पत्र्याचे चिकट सापळे हेक्टरी १२ ते १५ याप्रमाणे कपाशीच्या शेतात अर्धा ते एक फूट उंचीवर लावावे. पिवळ्या रंगामुळे आकर्षित झालेल्या पांढऱ्या माश्‍या त्यावरील तेलामुळे चिटकतील. त्या दररोज पुसून घेऊन पिवळ्या पत्र्यांना पुन्हा तेल लावावे.
  •  सिंथेटिक पायरेथ्राईड या वर्गातील कीटकनाशकांचा वापर करु नये.
  •  पिकाच्या सुरवातीच्या काळात बहुव्यापक  कीटकनाशकांचा वापर टाळावा.
  •  आर्थिक नुकसानीच्या पातळीवर कीड आढळल्यास रासायनिक नियंत्रणाचे उपाय करावेत.
  • आर्थिक नुकसान संकेत पातळी - सरासरी ८-१० प्रौढ माशी किंवा २० पिल्ले प्रति पान.  

    फवारणी प्रतिलिटर पाणी  अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) २.५ मि.ली. किंवा अॅझाडिरेक्टिन (३०० पीपीएम) ५० मि.ली.    व्हर्टीसिलीयम लेकॅनी (१.१५ टक्के भुकटी) ५ ग्रॅम किंवा  अॅसिटामिप्रीड (२० टक्के भुकटी) ०.२ ग्रॅम किंवा  स्पायरोमेसीफेन (२२.९ टक्के) १.२ मि.ली. किंवा   पायरीप्रोक्सेफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के प्रवाही) १ मि.ली. (टीप - वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.)

    कपाशीवरील कोळी प्रादुर्भाव

    सद्यस्थितीमध्ये कोळी कीडीचा प्रादुर्भाव विदर्भातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. या किडीमुळे कपाशीची पाने पिवळसर, मलूल व निस्तेज पडलेली दिसत आहेत. पाने वरच्या बाजूला आकसलेली दिसतात. हिरव्या पानावर टाचणीच्या टोकासारखे पिवळसर पांढुरके ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपके नंतर एकमेकांत मिसळतात. अशी पाने नंतर पिवळसर दिसतात.  पिवळ्या पानांचे निरीक्षण केल्यास खालील बाजूला लाल कोळीचे सूक्ष्म जाळे दिसतात. काही पानाच्या मध्यभागी पानाच्या मुख्य शिरेभोवती हलके तपकीरी चट्टे पडल्यासारखे दिसतात करपल्यासारखे ठिपके (अनियमित)दिसतात. तीव्र प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने गळून पडतात. पूर्ण झाड पर्णहीन होते. ही अवस्था प्रामुख्याने कपाशीच्या बोंडे भरण्याच्या ते फुटण्याच्या अवस्थेत दिसत असल्यामुळे बोंडातील सरकी भरत नाही, अपरिपक्व अवस्थेत बोंडे फुटतात. पर्यायाने उत्पादनामध्ये घट होते. अशीच लक्षणे पाण्याचा ताण पडल्यामुळेही दिसत असल्याने कोळ्यांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे पाने व्यवस्थित पाहून प्रादुर्भाव आहे की नाही, समजून घ्यावे. अनेक ठिकाणी कोरडवाहू कपाशी पिकामध्ये पाण्याचा ताणही जाणवत आहे. जमिनीला भेगा पडल्या असून, दिवसाचे वातावरण उष्ण व कोरडे होत आहे. असे हवामान या किडीसाठी पोषक आहे.

    कीडीची ओळख : दोन ठिपक्याचे कोळी आकाराने सूक्ष्म (०.३ ते ०.४ मीमी) असून भिंगाच्या साह्याने दिसतात. ते हिरवट पिवळे ते केसरी रंगाचे असून पाठीवर दोन्ही बाजूने दोन काळे ठिपके दिसतात. नुकत्याच अंड्यातून निघालेल्या अळीला सहा पाय असतात तर प्रौढ व पिल्लांना आठ पाय असतात. ते सर्व सोंडेने पानातील पेशीमधील रस शोषण करतात. हा कोळी जाळे विणतो व असे जाळे आपल्याला प्रादुर्भावगस्त पानाच्या खालील बाजूला आढळते. पिके - सोयाबीन, भेंडी, भाजीवर्गीय पिके, कडधान्ये, तेलबियांवरही प्रादुर्भाव आढळतो.

    जीवनचक्र: प्रौढ कोळी हिवाळ्यात जिवंत राहून वर्षभर सक्रीय असतात. या किडीला पंख नसल्यामुळे तिचा प्रसार सरपटत चालून तसेच हवेद्वारे होतो. एक मादी तिच्या ३० दिवसांच्या कार्यकाळात साधारणपणे १०० अंडी पानाच्या खालील बाजूला देते. त्यांच्या अंडी, अळी, पिल्ले (प्रोटोनीम्फ व डयुटोनिम्फ) व प्रौढ अशा पाच अवस्था असतात. एक पिढी कमीत कमी ४ ते ५  दिवसांची असू शकते. छोट्या व एकापाठोपाठ पिढ्या व जास्त अंडी देण्याची क्षमता यामुळे या किडीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्यामध्ये प्रतिकारक्षमताही निर्माण होण्याची दाट शक्यता असते. किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारण पानाच्या देठाभोवती, मुख्य शिरेच्या आजूबाजूला व पाने मुडपण्याच्या ठिकाणी एकवटलेला असतो.

    लाल कोळी - सूक्ष्म असून ते जाळे विणतात. पिल्ले हिरवट रंगाचे असून शरीरावर गर्द ठिपके असतात.पानाच्या खालील बाजूने रस शोषण करून उपजीविका करतात. प्रौढ अवस्था १० दिवसांची असते.

     पिवळे कोळी - लाल कोळीपेक्षा सूक्ष्म, पिवळसर रंगाचे असून पाठीवर पांढुरक्या रेषा असतात. भिंगातून पाहील्यास स्पष्ट दिसतात. हे कोळी जाळे विणत नाहीत. यांची वाढ ४ ते ५ दिवसांत पूर्ण होते. ( तापमान २२.५ अंश से. ते २७.० अंश से.). मादी सरासरी ५ ते ८ अंडी देते. हा कोळी पांढऱ्या माशीच्या पायाला चिकटून इतरत्र पसरतो. किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नवीन व कोवळ्या पानावर जास्त असतो. संपूर्ण वाढ झालेली अळी सुप्तावस्थेत (३ ते ११ दिवस) जाते. त्यानंतर प्रौढावस्थेत परावर्तित होते.

    एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन ः

  •  कापूस पिकाची योग्य पीक फेरपालट करावी.
  • कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे. या चवळी पिकावर किडींचे नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होते.  
  •  वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे, तसेच बांधावरील तणेही उदा. अंबाडी, हाॅलीहाॅक, रानभेंडी ई. काढून नष्ट करावीत. किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल.
  •   मातीच्या परिक्षणानंतरच शिफारशीप्रमाणे खतमात्रा द्यावी. दोन ओळीतील व दोन झाडांतील अंतर योग्य तेच ठेवावे.
  •  रस शोषक किडीवर उपजीविका करणारेसीरफीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा कार्निया यांची संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक कोळीनाशकांचा वापर टाळावा.
  •  कपाशी पिकामध्ये सुरवातीच्या अवस्थेत येणाऱ्या रसशोषक किडींच्या (मावा, तुडतूडे, फुलकिडे ) नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणेच रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. बहूव्यापक (ब्राॅडस्पेक्ट्रम)  कीटकनाशकांचा अवास्तव वापर केल्यास व एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे फवारणीमध्ये मिश्रण केल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी डायकोफाॅल (१८.५ टक्के) ५.४ मि.ली. किंवा स्पायरोमेसीफेन (२२.९ टक्के) १.२ मि.ली.
  • संपर्क ः डाॅ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४ (कीटकशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com