कृषी सल्ला : बीटी कापूस, सोयाबीन, मूग, मका, तूर, खरीप ज्वारी

कृषी सल्ला
कृषी सल्ला

या वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी काही भागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली. त्याचवेळी काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा संपलेली नाही. जून व जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. बऱ्याच ठिकाणी पेरण्या जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्या. दरवर्षी पावसाचे प्रमाण आणि वितरण हे अनियमित असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मागील ५० वर्षाच्या पावसाच्या आकडेवारीचे पृथक्करण केले असता, जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड हमखास पडत असल्याचे दिसून आले. या वर्षी या पाऊस खंडाचा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढल्याचे दिसते. अशा पावसाच्या खंडकाळात कोरडवाहू पिके वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून, त्यावरच त्यांचे वर्षाचे सर्व आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. पावसाच्या खंड काळात कोरडवाहू पिकांवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील. या उपाययोजनांमुळे पीक उत्पादनातील घट निश्चितच कमी करता येईल. बीटी कापूस :

  • कापसाचे पीक सध्या फुलोरा, पाते लागणे या अवस्थेत आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वारंवार कोळपणी किंवा वखरणी करावी. त्यामुळे जमिनीवर पडलेल्या भेगा बुजून खालच्या थरातील ओलावा टिकून राहील.
  • -जमिनीत जास्त ओलावा नसल्यामुळे पीक मुळाद्वारे अन्नद्रव्याचे शोषण करू शकत नाही. तसेच पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) २०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • -सध्या कापूस पिकावर काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त फुले, पाते गोळा करून नष्ट करावीत. कामगंध सापळ्याचा वापर करावा. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • प्रोफेनोफॉस (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (४ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) २ मिलि.
  • पिकामध्ये दोन ओळी किंवा तासानंतर एक जलसंधारण सरी पाडावी. परिणामी पाऊस झाल्यावर या सरीमध्ये पावसाचे पाणी जास्त साचेल. तसेच जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहील. हीच सरी अतिरिक्त पावसाच्या काळात पाण्याच्या निचऱ्यासाठी काम करेल.
  • पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
  • सोयाबीन :

  • सोयाबीनचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे.
  • पाने खाणारी अळी व खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडींच्या बंदोबस्तासाठी थायोमिथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ५० मिलि प्रति एकरप्रमाणे फवारणी करावी.
  • पिकावरील तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी २ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत.
  • पिकावर पाण्याचा ताण बसत असल्यास पिकावर पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) २०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • सोयाबीन पिकात पेरणीनंतर ३५ दिवसांनी प्रत्येक चार ओळी किंवा तासानंतर एक जलसंधारण सरी बळीराम नांगराच्या साहाय्याने पाडावी. यामुळे पुढे पाऊस पडल्यास जास्तीचे पाणी जमिनीत मुरते व ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
  • पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी तुषार सिंचनाने द्यावे.
  • मूग :

  • मुगाचे पीक सध्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे.
  • पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर नियंत्रणासाठी डायमिथोएट २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • ढगाळ वातावरणामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळत असल्यास गंधक २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पाण्याचा स्रोत उपलब्ध असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पिकास संरक्षित पाणी द्यावे.
  • मका :

  • मका हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.
  • मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायोमिथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) ५ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिलि प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास तुषार सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे.
  • तूर :

  • तूर पीक हे वाढीच्या अवस्थेत आहे.
  • पिकाची आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील.
  • आंतरमशागतीची कामे झाल्यानंतर दोन ओळीनंतर एक बळीराम नांगराच्या साहाय्याने एक जलसंधारण सरी काढावी.
  • तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • खरीप ज्वारी :

  • खरीप ज्वारी हे पीक सध्या पोटरी या अवस्थेत आहे.
  • खरीप ज्वारी पिकात खोडकिडीचा प्रार्दुभाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • धूळ आच्छादन : जमिनीच्या पृष्ठभागावरील पातळ थर हा ८ ते १० दिवसाच्या अंतराने कोळपणीद्वारा भुसभुशीत करून घ्यावा. या मातीचे जमिनीवर आच्छादन तयार होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जमिनीमध्ये पडणाऱ्या भेगांमधून पाण्याचे बाष्पीभवन होत असते, त्याचे प्रमाण कमी होऊन ओलावा जास्त काळ टिकून राहतो. संरक्षित सिंचन : पावसावर पूर्णत: अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमध्ये पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेक ठिकाणी तापमानवाढीमुळे पिकांची पाण्याची गरज वाढत आहे. संरक्षित सिंचनासाठी शक्यतो तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. वा­ऱ्याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी संरक्षित पाणी द्यावे. डॉ. भगवान आसेवार, ०९४२००३७३५९ (विभागप्रमुख, कृषिविद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com