अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे मोल” या उक्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. ओल टिकवण्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. एकूण पडणाऱ्या पावसापैकी १० ते २०% पाणी जमिनीवरून वाहून जाते. उर्वरित पाण्यापैकी १०% पाणी निचऱ्याद्वारे व ६० ते ७०% बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीमध्ये सुमारे १०% पाणी उपलब्ध राहते. वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्याची साठवण आणि पीक उत्पादनासाठी वापर कशाप्रकारे करता येईल, हे पाहू. याबाबत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती, आंतरबांध व्यवस्थापन, उतारास आडवी मशागत करणे, कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर, संरक्षित पाण्यासाठी शेततळी, वनस्पतींचा बांधासारखा वापर ही महत्त्वाची तंत्रे असल्याचे पुढे आले. जमिनीतील ओल या कारणांनी कमी होते...

  • जमिनीत साठलेली ओल पिकांद्वारे वापरली जाते.
  • पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाते.
  • जमिनीला भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते.
  • तणे स्वतःच्या वाढीसाठी ओल घेतात.
  • वरील ओल नष्ट होण्यातील सर्वाधिक वाटा (सुमारे ६० टक्के) हा बाष्पीभवनाचा असतो.
  • एक कोळपणी आणि अर्धे पाणी

  • शेतामध्ये पिकासोबतच तणांचीही वाढ होत असते. ही तणे पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. पीक उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते.
  • रब्बी हंगामात तर कोळपणी अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्रामीण भागात “एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी ’’ अशी म्हण आहे. कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणेच फायदा होतो. या तत्वांच्या अवलंबातून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.
  • कोळपणी १ - पीक तीन आठवड्याचे असताना फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे तण काढले जाऊन त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
  • कोळपणी २ - पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासच्या कोळप्याने करावी. या काळात जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सुक्ष्म भेगा पडण्यास सुरू होता. त्या कोळपणीमुळे बंद होतात. बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. कोळपणीमुळे पृष्ठभागावर मातीचा हलका थर तयार होतो. त्याला इंग्रजीमध्ये ‘डस्ट मल्च’ म्हणजेच धुळीचे आच्छादन असे म्हणतात.
  • कोळपणी ३ - पीक आठ आठवड्याचे झाले असताना दातेरी कोळप्याने करावी. जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही. या काळात दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि भेगा बुजवल्या जातात. जमिनीत ओल फार कमी असल्यास आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.
  • आंतरमशागतीकरिता खुरपणी देखील अपेक्षित आहे. मात्र, सुरवातीस जमीन मऊ असताना आणि तण वाढत असल्याच्या स्थितीमध्ये खुरपणीचा लाभ होतो. बैल कोळपे चालविण्याने खोलवर मशागत करता येते. जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. आंतरमशागतीचा अर्थ पीक उगवून आले असता त्याच्या दोन ओळीत केलेली मशागत.
  • त्यात काही प्रमाणात विरळणीदेखील करता येईल. मर्यादेपेक्षा अधिक असलेली रोपे काढून टाकणे हाही ओलावा टिकविण्याचा एक मार्ग आहे.
  • परावर्तकाचा वापर

  • सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे बाष्पोत्सर्जनाची क्रिया वेगाने होते. जेवढी उष्णता अधिक तेवढे अधिक बाष्पोत्सर्जन. परिणामी, कडक उन्हाच्या स्थितीमध्ये अधिक पाणी लागते. ही प्रक्रिया मंद करण्यासाठी झाडाच्या पानावर पडणारी उष्णता कमी करणे हा एक उपाय आहे. त्यासाठी पानावर पांढऱ्या सूर्यकिरणे परावर्तित करणाऱ्या घटकांची फवारणी उपयुक्त ठरू शकते.
  • केओलीन, पांढरा रंग, खडूची भुकटी यापैकी एक ८ टक्के या प्रमाणात ( ८० ग्रॅम प्रतिलिटर) पानावर फवारल्यास पानांवर पांढरा थर बसतो. प्रकाशकिरण परावर्तित होऊन बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण कमी होते. या असर साधारणपणे ८-१० दिवसांनी कमी होतो. तीव्र उन्हे आणि पाण्याची कमतरता असल्याच्या स्थितीमध्ये दर १५ दिवसांनी या प्रमाणे ३ ते ४ फवारण्या उपयुक्त ठरू शकतात. पिकांना अवर्षणाचा ताण सहन करण्यास मदत करतात.
  • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार युरिया दोन टक्के (२० ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात) फवारणीद्वारे देता येईल.
  • अन्य कामांमध्ये खतांचा वापर, पीक संरक्षण याकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे पिके ताण सहन करण्यास सक्षम होतात.
  • वारा प्रतिबंधक झाडांचे/वनस्पतींचे शेताभोवती कुंपण घालावे. शेवरी, सुबाभूळ सारख्या वनस्पती लावल्यास चारा आणि लाकूड मिळते. या कुंपणामुळे वाऱ्याची गती रोखली जाते. पर्यायाने २० ते ३० मि. मी. ओलाव्याची बचत होते.
  • आच्छादनाचा वापर

  • जमिनीवरील आच्छादने ही बाष्पीभवन रोखणे आणि तणनियंत्रण या दोन्ही प्रकारे उपयुक्त ठरते.
  • सेंद्रिय घटकांच्या आच्छादनासंदर्भात सोलापूर येथील संशोधन केंद्रामध्ये झालेल्या संशोधनामध्ये अनेक फायदे समोर आले आहे. आच्छादनामध्ये शेतीतील अवशेष उदा. तूरकाट्या, धसकटे, वाळलेले गवत, गव्हाचे काड हेक्टरी ५ ते १० टन प्रमाणात वापरावेत. आच्छादनाच्या वापराने २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते. पिकांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे सिद्ध झाले.
  • आच्छादन जितक्या लवकर टाकता येईल, तेवढे जास्त उपयुक्त ठरते. कोणत्याही परिस्थितीत पीक सहा आठवड्याचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा.
  • -कोळपणीपेक्षा आच्छादन अधिक प्रभावी आहे. आच्छादन हे बी उगवल्यापासून १५ दिवसांच्या आत लवकरात लवकर दोन ओळीत सारखे पसरवून टाकावे. बाष्पीभवनावाटे होणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होते. पिकास ओलावा निकडीच्या अवस्थेत ३५ ते ५० मि.मी अधिक मिळतो. तसेच जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होते. रब्बी ज्वारीस आच्छादनाचा वापर करणे म्हणजे एक संरक्षक पाणी देण्याप्रमाणेच असते. कारण, कोळपणी करण्यायोग्य स्थिती येण्यापर्यंत बरेचशी ओल उडून गेलेली असते. कोळपणी करण्यासाठी रोपे उंच व्हावी लागतात. या कालावधीत आच्छादन ओल टिकवण्यासाठी फायद्याचे ठरते.
  • वरील सांगितलेले निरनिराळे उपाय परिस्थितीनुरूप वापरावे. एकाचवेळी सर्व उपाय वापरता येणे शक्य नसते. प्रचलित शेती पद्धतीत शक्य असलेला सर्वात सुलभ, सर्वाना वापरता येणारा उपाय म्हणजे कोळपणी. ती मात्र सर्वांनी वेळेवर नक्कीच करावी. संरक्षित पाणी

  • अवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी पिकांच्या संवेदनक्षम स्थितीमध्ये एक तरी संरक्षित पाणी द्यावे. पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना संरक्षित पाणी दिल्यास पीक उत्पादनात दुपटीने वाढ होते.
  • सरी वरंबा पद्धतीमध्ये लावलेल्या पिकांना एक आड एक सरी भिजवून पाणी द्यावे.
  • हंगामी पिकांसाठी तुषार सिंचन, बारमाही पिके व फळबागांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. पाण्याची बचत शक्य होते.
  • पीकवाढीच्या काळात पाण्यामध्ये खंड पडला तर फवारणीद्वारे पिकास अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्यासाठी डीएपी (२%) तसेच पोटॅशियमयुक्त खते (उदा. पोटॅशियम नायट्रेट/ पोटॅशियम क्लोराईड) (२%) या प्रमाणे फवारणी करावी. पिकाची अवर्षणामध्ये तग धरण्याची शक्ती वाढते.
  • रोपांची विरळणी करणे

  • मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या रोपांची विरळणी केल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये व पाणी याची बचत होते.
  • अवर्षणाच्या काळात पिकांद्वारे बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी पानांची संख्या मर्यादित करावी. त्यासाठी खालील पाने कमी करून वरील ४-५ कार्यक्षम पाने ठेवावीत.
  • डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ ०२४२६-२४३३३८ (प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका -बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com