एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप्स

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप्स
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप्स

रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून, नियंत्रण अवघड होत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक, यांत्रिक, मशागत, जैविक आणि रासायनिक अशा सर्व समावेशक कीडनियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. यात कामगंध सापळ्यांचा (फेरोमोन ट्रॅप) वापर केल्यास कमी खर्चात कीडनियंत्रण शक्य होते. शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवता येते. एकात्मिक पीक व्यवस्थेमध्ये कामगंध सापळ्याचा वापर महत्त्वाचा आहे. कीटक म्हणजे सहा पायाचा सजीव. ते समूहात राहताना आपल्या समूहाशी किंवा अन्य समूहाशी विविध पद्धतीने समन्वय करत असतात. त्यातून खाद्य मिळणे, संरक्षण करणे व प्रजनन करणे या क्रिया करतात. या तिन्ही क्रियांसाठी आवश्यक त्या हालचाली, विशिष्ट आवाज काढणे, शरीराच्या विशिष्ट अवयवाची हालचाल करणे, शरीरातून विशिष्ट गंध, वास किंवा रसायने बाहेर टाकणे अशा बाबी समाविष्ट असतात. प्राणी वर्गातील कीटक हा सर्वात मोठा वर्ग आहे. किटक स्वकियांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकीयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात. अशा गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. प्रत्येक किडींचा फेरोमोन वेगळा असतो. काही किटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. असे कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार करून, त्याचा किटकाच्या नियंत्रणासाठी वापर केला आहे. अशा सापळ्यांना कामगंध (फेरोमोन) सापळे म्हणतात. शेतामध्ये असे सापळे लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. किटकांच्या शरीरातून सोडला जाणारा नैसर्गिक गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचे संदेश यातील फरक न लक्षात आल्याने त्यांचा गोंधळ उडतो. पर्यायाने किटकांचे मिलन होऊ शकत नाही. फनेल ट्रॅप (नरसाळे सापळा) ः कामगंध सापळ्याचा आकार नरसाळ्याप्रमाणे असून, प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून त्यावर एक प्लॅस्टिकची पिशवी लावली जाते. मध्ये मोकळी जागा सोडून वरील बाजूस एक झाकण असते. या झाकणास आतील बाजूस 'आमिष' लावण्याची सोय असते. त्यास मादी किटकांचा गंध (ल्यूर) लावले जाते. त्यामुळे प्रौढ नर मिलनाकरिता मादीच्या शोधात कामगंध सापळ्याकडे आकर्षित होतो. सापळ्यामध्ये अडकून पडतो. असे जमा झालेले नर पतंग पाच ते सात दिवसांत मरतात. अशा प्रकारे किडीची पुढील पिढी तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येते. प्रत्येक किडीसाठी वेगळा ल्यूर वापरून त्या त्या किडीचे व्यवस्थापन करता येते. पिकांमध्ये सापळे वापरण्याचे पद्धत १) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या किटकांसाठी हेक्‍टरी पाच सापळे आवश्‍यक. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्‍टरी १५ ते २० सापळे गरजेचे. लहान क्षेत्र असल्यास सापळे शेताच्या आकारानुसार लावावेत. २) सापळे लावताना पिकाच्या उंचीवर साधारणपणे एक ते दीड फूट उंचीवर व जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीवर लावावेत. दोन सापळ्यांमध्ये १५ ते २० मीटर अंतर ठेवावे. शेताच्या आकारमानानुसार हे अंतर कमी - जास्त करता येईल. ३) सापळ्यामधील ल्यूर लावताना पॅकिंग वर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. १५-२१ दिवसांनंतर ल्यूर बदलावेत. ४) प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे. वेगवेगळ्या पिकासाठी लागणारे फेरोमोन ल्यूर :

अ. क्र. ल्यूर चे नाव किडीचे नाव सापळा पीक
1 हेली ल्यूर हिरवी बोंड अळी फनेल सापळा कापूस, तूर, हरभरा, टोमाटो, मिरची, मका
2 पेक्टिनो ल्यूर गुलाबी बोंड अळी- डेल्टा स्ट्रिकी ट्रॅप कापूस
3 गोस्सीप ल्यूर गुलाबी बोंड अळी फनेल सापळा कापूस
4 स्पोडो ल्यूर तंबाखू वरील पाने खाणारी अळी फनेल सापळा सोयाबीन कापूस, भुईमूग, सूर्यफूल, मिरची
5 वीट ल्यूर ठिपक्याची बोंड अळी फनेल सापळा भेंडी, कापूस
6 ल्यूसी ल्यूर शेंडा आणि फळ पोखरणारी अळी वॉटर ट्रॅप वांगी
7 बोम्बिकोल ल्यूर रेशीम अळी   मलबेरी
8 बाक्यू ल्यूर फळ माशी फ्लाय ट्रॅप काकडी , दोडका, दुधी भोपळा, कारली, ढेमसे , कलिंगड , खरबूज
9 बॉडोर ल्यूर फळ झाडावरील फळ माशी फ्लाय ट्री ट्रॅप संत्रा, आंबा , मोसंबी, पेरू, चिकू

पिकांमध्ये सापळे वापराचे फायदे : १) किडीचे प्रौढ व मादी यांची शेतातील स्थिती ठरविण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यतः उपयोग होतो. २) सापळ्यात असणाऱ्या लिंग प्रलोभन रसायनांचे सूक्ष्मकण वातावरणात पसरतात. मिलनासाठी किडींना आपला जोडीदार शोधणे कठीण जाते. ३) कामगंध सापळ्याच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानाची पातळीपेक्षा अधिक किडीची संख्या झाल्यास योग्य वेळी किटकनाशकांची फवारणी करता येते. ४) एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे किटकनाशके फवारणीचा खर्च टाळता येतो. सापळ्यांचा खर्च किटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी असतो. फ्लाय ट्री ट्रॅप सापळे वापरताना घ्यावयाची काळजी : १) सापळा बांबूस बांधताना घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने पडणार नाही. २) ल्यूर लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असावेत. हातास अन्य कोणताही उग्र गंध ( उदा. कांदा, लसूण इ.) नसावा. ३) ल्यूरचे पॅकिंग फोडण्यापूर्वी ते फाटलेले नसावे. पॅकिंग फाटलेले असले तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. ४) जोराची हवा व पाऊस असल्यास सापळ्यांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. सापळ्यात येणारे पावसाचे पाणी काढण्याची व्यवस्था ठेवावी. ५) सापळ्याची पिशवी बांबूस घट्ट बांधावी. त्यामुळे वाऱ्याने न फडफडून नुकसान होणार नाही. ७) ल्यूर नियोजित वेळेवर बदलावेत, त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळतात. ८) सापळ्यात अडकलेले पतंग मेल्यानंतर वेळच्या वेळी ते काढून टाकावेत. अन्यथा, कुत्रे, मांजर, पक्षी हे सापळ्यातील मेलेल्या पतंगाकडे आकर्षित होऊन सापळ्यास नुकसान करू शकतात. अन्य प्राण्यापासून बचावासाठी सापळ्याच्या खाली काटेरी फांदी लावल्यास फायदा होऊ शकतो. गणेश वाघ, ९०११४०३७६० (सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय, तिवसा, जि. अमरावती )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com