शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्द

शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्द
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्द

सावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती गावामध्ये केळी पिकाऐवजी कमी कालावधीच्या हंगामी पिकांवर भर दिला जात आहे. शेतीसोबतच गावाने लोकवर्गणीतून शाळेचा विकास केला आहे. अगदी विद्यार्थ्यांना टॅब देण्यापासून ते मुलांच्या इंग्रजी शिक्षणासाठी वेगळे वर्ग भरवण्यापर्यंत प्रयत्न केले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये शाळेतील संगणक कक्षासह विविध उपक्रमांसाठी १२ लाख रुपयांची कामे लोकवर्गणीतून करण्यात आली आहेत. शिक्षणाबाबत जागरूक अशी या गावाची जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे. जळगाव शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सावखेडा खुर्द हे गाव आहे. तापी नदीकाठी असलेल्या या गावात काळी कसदार जमीन असून गावातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावाची लोकसंख्या १००६ असून, गावात लागवडयोग्य क्षेत्र २५३ हेक्‍टर आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, केळी ही पिके घेतली जातात.

  • पूर्वी केळी हे पीक सर्वाधित होते. मात्र, अलीकडे कापूस हे प्रमुख पीक झाले हे. दरवर्षी १५० हेक्‍टरवर जूनमध्ये ठिबकवर सर्व शेतकरी लागवड करतात. मागील तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासंबंधी फरदड न घेता डिसेंबरमध्येच क्षेत्र रिकामे केले जाते.
  • तापी नदीमुळे जलसाठे मुबलक असले तरी पाणी बचतीबाबत गाव तसे जागरूक आहे. कमी पाण्यावर येणारा हरभरा पिकाची पेरणी सुमारे ३० ते ३५ हेक्‍टरवर असते. मका पिकाची लागवडही ठिबक सिंचनवर डिसेंबरमध्ये केली जाते. मका उत्पादनात प्रकाश पाटील, दीपक मगन पाटील, वसंत धनसिंग सपकाळे, विजय नवलसिंग पाटील, डिगंबर छन्नू पाटील, पांडुरंग अरुण सपकाळे हे शेतकरी आघाडीवर आहेत. रब्बी मका पिकाचे एकरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत हमखास उत्पादन हे शेतकरी घेतात. जमनादास वामन पाटील, भिका लक्ष्मण पाटील, जितेंद्र ताराचंद पाटील, केशरसिंग कृष्णा पाटील, प्रवीण दोधू सपकाळे, सुरेश विठ्ठल पाटील, आनंद पाटील, दोधू सीताराम सपकाळे, कौतीक अरुण सपकाळे आदी प्रयोगशील शेतकरी गावात मका, कापूस पिकांमध्ये नावाजलेले आहेत.
  • रोजगार हमी योजनेतून २० गोठे गावात बांधले जात आहेत. त्यात १५ बाय ३० फुटाचे पत्रांचे शेड, चाऱ्यासाठी गव्हाण, काॅँक्रीटीकरण व मूत्र साठविण्याची टाकी आदी कामे यात अंतर्भूत असून, ९८ हजार रुपये अनुदान आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने दूग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे. सध्या डिगंबर पाटील यांचा गोठा तयार झाला आहे.
  • बागायती पिकामुळे शेतीमध्ये प्रगत असलेले गाव मुलांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत. शिवारातील कामांसह बहुतांश कामे ही सर्वांच्या सूचना विचारात घेऊन केली जातात. शाळेच्या कामांसाठी कुठलाही ग्रामस्थ मागे हटत नसल्याने गावातील शाळा सुंदर, उपक्रमशील बनली आहे. - अरविंद सपकाळे, सरपंच, संपर्क ः ९९२२७७४६९१ गावामध्ये केळी हे प्रमुख पीक होते. मात्र, क्षाराची समस्या जाणवू लागल्यानंतर शेतकरी कापूस पिकाकडे वळले. आता कापूस, हरभरा, मका अशी पिकाची रचना असते. मी दरवर्षी ठिबकवर हरभरा पीक घेतो. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी त्याचा फायदा होतो. - प्रकाश जमनादास पाटील, शेतकरी भावी पिढीच्या शिक्षणाबाबत सजग बागायती असलेले गाव शेती कामांमध्ये व्यस्त असले तरी मुलांच्या शिक्षणाबाबत तेवढेच जागरूक आहे. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावात प्रवेश करतानाच सुंदर, रंगरंगोटी केलेली आणि शैक्षणिक, सामाजिक संदेश देणारी ही शाळा नजरेस पडते. शिक्षकांकडून आलेला योग्य शैक्षणिक विकासाचा प्रस्ताव येथे त्वरित स्वीकारला जातो. २०१६ मध्ये इयत्ता चौथीच्या मुलांसाठी ३० टॅब पालकांनी स्वखर्चातून दिले. त्यात पीडीएफ फायलींमध्ये संबंधित वर्गाचा १०० टक्के अभ्यासक्रमाचा अंतर्भाव होता. त्यामुळे या मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात यश आले. मुले तो वापरताना सुरवातीला अडखळे असले तरी हळूहळू त्यात पारंगत झाले. सद्यःस्थितीत शाळेमध्ये १० टॅब आहेत. या प्रयोगामुळे चर्चेत आलेल्या शाळेला एका राष्ट्रियीकृत बॅंकेने संगणक कक्षाच्या उभारणीसाठी ७५ हजार रुपये मदतनिधी दिला. या कक्षातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे दिले जातात. मात्र, ग्रामीण भागामध्ये भारनियमन आणि तांत्रिक बिघाडामुळे या कक्षाचा कार्यक्षमपणे वापर करता येत नसल्याची बाब पुढे येताच ग्रामपंचायत सरसावली आहे. त्यांनी वित्त आयोगाच्या निधीतून वीजबिल भरणे व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचा निश्चय केला आहे. शाळेमध्ये आज ७५ विद्यार्थी असून, स्वच्छता, टापटीप यावरही भर दिला जातो. येथे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही ड्रेस कोड आहे. तसेच दर गुरुवारी व शनिवारी खेळांचा वेगळा ड्रेसही आहे. प्रत्येकाला इंग्रजी भाषेची चांगली ओळख आहे. प्रत्येकाला लिहिता व वाचता येते. त्यामुळे ही शाळा 'अ' श्रेणीत आहे. शाळेचे कामकाज मुख्याध्यापक अरुण चौधरी व उपशिक्षण प्रवीण चौधरी व किरण सपकाळे उत्तम तऱ्हेने सांभाळतात. इंग्रजीची भीती घालविण्यासाठी... मध्यंतरीच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे आकर्षण निर्माण झाले होते. मात्र, या जळगावातील दूरवरच्या शाळांपर्यंत लहान मुलांची वाहतूक, प्रवास यांत वेळ जाण्यासोबतच त्रासही वाढत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. आपण इंग्रजी भाषेत मागे पडू नये, यासाठी गावातील युवक, ग्रामस्थ व शिक्षक यांच्या पुढाकाराने समाज मंदिरात इंग्रजी माध्यमातील ज्युनिअर व सिनिअर केजीचे वर्ग सुरू केले. असे दोन वर्ग चार वर्षांपासून उत्तम तऱ्हेने सुरू आहेत. गावातील डी. एड. प्रशिक्षित रमा बिलाला ही युवती या वर्गावर अल्पशा मानधनावर अध्यापनाचे काम करते. सध्या वर्गामध्ये वीस विद्यार्थी असून, त्यांच्या पालकाकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. गावातील युवकामार्फत निधी गोळा करून त्यातून विद्यार्थ्यांना गणवेश, वॉटरबॅग व इतर शैक्षणिक साहित्य दिले जाते. एक तास शाळेसाठी...

  • गावातील प्रज्ञा किशोर पाटील, पूजा भानुदास पाटील, माधवी मुरलीधर पाटील, पूनम युवराज पाटील, अश्‍विनी सुरेश पाटील, रत्ना सुभाष पाटील, ज्योती सुरेश पाटील, अरुणा दिलीप सपकाळे, मनीषा मोतीलाल पाटील, गायत्री वसंत पाटील अशा युवतींचा एक गट आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थिनी शाळेसाठी विनाशुल्क रोज एक तास देतात. शिक्षकासोबत दर महिन्यातील तारखांचे नियोजन व वाटप केले जाते.
  • गावात दरवर्षी शैक्षणिक जनजागृतीसाठी मशाल रॅली विद्यार्थी व शिक्षक काढतात. त्यात सर्व ग्रामस्थ, बच्चेकंपनी हिरिरीने सहभागी होतात. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यासाठी आवश्‍यक मंडप, ध्वनिक्षेपक व इतर खर्च अरविंद सपकाळे करतात.
  • दफ्तरमुक्त सांस्कृतिक शनिवार

  • शाळेमार्फत सध्या दर शनिवारी दप्तरमुक्त उपक्रम राबविते. त्यात कला, कार्यानुभव, एखाद्या धड्याचे नाटकात रुपांतरण व सादरीकरण करणे असे उपक्रम राबविवले जातात. शाळेच्या सर्व भिंती बोलक्‍या असतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे. भिंतींवर थोर पुरुषांच्या प्रतिमांप्रमाणेच अंक, शब्द, विविध सुविचार आदींची पत्रके, फलके आहेत. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बसायला पॉलिमर बाक दिले आहेत. शाळेतील सरस्वतीच्या मूर्तीसाठी समाधान पाटील यांनी ५० हजार रुपये देणगी दिली. शाळेतील पेव्हर ब्लॉक व तारेचे कुंपण ग्रामपंचायतीच्या मदतीने तयार केले. ग्रामपंचायतीने एक छोटेसे स्केटिंग मैदान तयार केले असून, २७ स्केटिंग संच घेण्यासाठी मगन मनोहर पाटील यांनी मदत केली. वर्गांमध्ये पंखे व जलशुद्धीकरण यंत्रणाही बसविली आहे.
  • आजी-आजोबा दिवस, विद्यार्थ्यांच्या मातांची सहल असे अनोखे उपक्रम दरवर्षी घेतात. पालकांचा शाळेशी स्नेहभाव वाढावा, त्यांचा नेहमी संपर्क असावा यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. शाळेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च लोकवर्गणी, ग्रामपंचायत आदींच्या मदतीने झाला. आजवर जळगाव जिल्ह्यातील साडेतीन हजार शिक्षक, पालकांनी या शाळेला भेट दिली आहे.
  • ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा, पर्यायाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणे शक्य होत आहे. शैक्षणिक विकासाच्या कामामध्ये कधीही राजकीय विषय येत नाहीत. आजवर लोकवर्गणी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १२ लाखांपर्यंतचा निधी ग्रामस्थांच्या देखरेखीत, त्यांचा सहभागाने उपलब्ध झाला. कुठल्याही गावात एवढा निधी ग्रामस्थांनी प्राथमिक, पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या उपक्रमांसाठी देणे, ही खूप मोठी बाब आहे. - अरुण चौधरी, (संपर्क - ९९२३२१७०४२) मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, सावखेडा खुर्द (जि. जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com