हलक्या पावसाची शक्यता, द्राक्षबागेत स्थितीनुसार करा उपाययोजना

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण निश्चित राहणार आहे. बहुतांश द्राक्ष विभागामध्ये ७ आणि ८ तारखेला हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढे १५ एप्रिलनंतर पुन्हा सर्व विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

  •  नाशिकमध्ये सर्वसाधारणपणे दक्षिण भागामध्ये (निफाड व सिन्नर) जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
  •  सोलापूरच्या सर्व द्राक्ष उत्पादक भागामध्ये म्हणजेच नानज, काटी, कारी, वैराग, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
  •  सांगली भागामध्ये कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, विटा, तासगाव, पलूस व वाळवा येथे ७ व ८ तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे.
  •  पुण्यामध्ये नारायणगाव, जुन्नर भागामध्ये जास्त प्रमाणात, तर यवत भागामध्ये कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे. बारामती भागामध्ये ८ तारखेला पावसाची शक्यता आहे. 
  • हवामानाच्या वरील संभाव्य स्थितीमध्ये द्राक्ष बागांमध्ये पुढील प्रकारे परिणाम होतील.

    1) काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या द्राक्षबागा वरील विभागातील काढणी होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्या बागांमध्ये छाटणी करून घ्यावी. येणाऱ्या दिवसांमध्ये पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि त्यानंतर वाढणारी आर्द्रता आणि तापमानात घट होण्याची शक्यता या सर्व गोष्टीमुळे नवीन छाटलेल्या बागांमध्ये फुटी लवकर येण्यास मदत होईल. विशेषतः सोलापूर व जवळपासच्या भागामध्ये छाटणीनंतर कडक उन्हे व जास्त तापमानामुळे फुटी उशिरा निघतात. येथे ओलांडे जास्त दिवस उन्हामध्ये राहिल्यास नुकसान होऊ शकते. असे ओलांडे मृत लाकडासारखे टणक होऊ शकतात. संभाव्य वातावरणाच्या अंदाजानुसार राहणारे ढगाळ वातावरण, कमी तापमान व पावसामुळे वाढणारी आर्द्रता छाटलेल्या काड्यांना लवकर फुटी येण्यास मदत करू शकेल. म्हणूनच शक्य असलेल्या सर्व ठिकाणी लवकरात लवकर छाटण्या घेण्याचे नियोजन करावे. त्याचा फायदा होऊ शकेल.

    2) काढणी अद्यापही न संपलेल्या बागा अद्यापही द्राक्षांची काढणी संपलेली नाही, अशा ठिकाणी मात्र बागेतील फळांना इजा पोचू शकेल. सांगली भागामध्ये सध्या वातावरण निरभ्र असल्यामुळे पहाटेचे तापमान बऱ्याच अंशी कमी राहत आहे. विशेषतः जिथे बागेमध्ये पाणी दिलेले आहे, अशा ठिकाणी सकाळच्या वेळी धुकेही दिसत आहे. अशा वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी फळांमध्ये सूक्ष्म क्रॅकिंगही पाहण्यास मिळते. थोड्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर जमिनीत ओलावा निर्माण होईल, तसेच सकाळच्या व दुपारच्या तापमानातील अंतरही कमी होऊ शकेल. अशा ठिकाणी क्रॅकिंगचे प्रकार जास्त होणार नाहीत. मात्र, पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास क्रॅकींग वाढू शकते. घडांवर पाणी पडल्याने फळांची काढणीनंतरची टिकवण क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये काढणीनंतरची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.     पाऊस येण्याआधी (ता. ७ पूर्वी) बागेमध्ये कायटोसॅन २ ते ३ मि.लि. फवारल्यास अगोदरच क्रॅकिंग झालेल्या मण्यामध्ये कूज सहजासहजी होणार नाही. पावसामुळे नव्याने जास्त क्रॅकिंग होण्याची शक्यता कमी होईल. त्याच बरोबर ढगाळ वातावरणामुळे देठावरील भुरी वाढू शकते, त्याचेही नियंत्रण होईल.     निर्यातीसाठीच्या द्राक्षामध्ये कायटोसॅनचा वापर टाळावा. अशा बागामध्ये बॅसिलस सबटिलिस १ ते २ मिलि प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास देठावरील भुरीपासून घडाचे संरक्षण होईल.

     डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com