द्राक्ष बागेत रोग नियंत्रणाबरोबरच फलधारणा वाढविण्याकडे लक्ष द्यावे

द्राक्ष सल्ला
द्राक्ष सल्ला

येत्या सोमवार-मंगळवार (ता. ११ व १२) पर्यंत सर्व द्राक्ष विभागांमध्ये अधूनमधून पावसाळी वातावरण, हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस, बहुतांश ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. अशा वातावरणामध्ये सर्वसाधारणपणे भुरीचा धोका जास्त असतो. भुरीच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने सल्फरचा वापर करावा. सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पानांवर सर्व भागांपर्यंत चांगले कव्हरेज मिळेल असे फवारावे. संपूर्ण बाग धुवून काढण्याऐवजी वापरलेले सल्फर पानांच्या सर्व भागामध्ये पोचून डिपॉजिट होण्यासाठी प्रयत्न करावा. जास्त डिपॉजिट मिळण्यासाठी फवारणी करताना जास्त पाण्याचा वापर करण्यापेक्षा नोझलमधून निघणारे तुषार व पाण्याच्या थेंबाचा (ड्रॉपलेट) आकार लहान ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे. फवारलेले सल्फर पानांच्या सर्व भागात पसरून सुकून अधिक काळ राहील. फक्त ट्रायअझोल गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशके वापरून सध्याच्या वातावरणामध्ये भुरीचे संपूर्ण नियंत्रण मिळणार नाही. ट्रायअझोल गटातील बुरशीनाशके वापरल्यानंतर भुरी काही काळ कमी झाल्यासारखे जाणवेल. मात्र ती संपूर्ण मरत नसल्याने काही दिवसातच वाढू शकेल. भुरी संपूर्णपणे मारण्यासाठी व नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे दिलेल्या सल्फरच्या फवारण्या जास्त महत्त्वाच्या आहेत.

छाटणीनंतर ४५ ते ६० दिवसांमध्ये सुप्त डोळ्यामध्ये फलधारणा होत असते. या फळधारणेसाठी सबकेन करणे, नत्राची मात्रा कमी करणे, फॉस्फरस वाढवणे, युरॅसिल फवारणे इ. गोष्टी प्रचलित आहेत. परंतू जोपर्यंत अशावेळी पाण्याचा ताण झाडावर मिळत नाही, तोपर्यंत फलधारणा होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत नाही. अशा परिस्थितीमध्ये झाडाची जीएची मात्रा कमी करून सायटोकायनिन वाढणे अतिशय महत्त्वाचे असते. मुळामध्ये पाणी भरपूर असल्यास साहजिकपणे नत्र वाढते. त्यामुळे फलधारणा चांगली होत नाही. अशा परिस्थितीमध्ये फलधारणेसाठी पूर्वी सीसीसी चा (क्लोरमेक्वाट क्लोराईड) वापर होत असे. त्याचे उर्वरित अंश काढणीपर्यंत फळामध्ये राहू शकतात, त्यामुळे क्लोरमेक्वाट क्लोराईडचा वापर टाळण्याचे सांगितले जाते. अशा स्थितीमध्ये फळधारणा वाढण्यासाठी काय करावे, असा प्रश्न असतो. येत्या आठवड्यामध्ये अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे अशी स्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीमध्ये ट्रायअझोल गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणासाठी एक दोन वेळा वापरल्यास भुरीच्या नियंत्रणाबरोबरच फलधारणा वाढवण्यासाठी उपयोग होतो. या बुरशीनाशकांचा वापर झाल्यास शेंडा थांबतो, वाढ मंदावते व झाडामध्ये असलेल्या जीएचे प्रमाण काही काळ कमी होते. त्यामुळे सुप्त डोळ्यामध्ये फलधारणा होण्यास मदत होते.

ज्या ज्या बागेमध्ये शेंडा चालू आहे, तिथे करपा वाढण्याची शक्यता आहे. करपा रोगाच्या नियत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर किंवा थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम प्रति लिटर अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रमाणात मिसळून फवारावे. कार्बन्डाझिम व थायोफिनेट मिथाईल दोन्ही बुरशीनाशकांमध्ये एमबीसी (मिथाईल बेंझिमिड्यॅझोल कार्बामेट) हा घटक असतो. या घटक सायटोकायनिनसारखा आहे. परिणामी ही बुरशीनाशके वापरल्यानंतर त्वरीत पाने ताजी हिरवीगार होतात. फलधारणा वाढण्यासाठीसुद्धा झाडामध्ये सायटोकायनिन वाढणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून ही बुरशीनाशके उपयोगी आहेत, याची नोंद घ्यावी. काही दिवस सलग पाऊस झाल्यास कमाल तापमान ३० अंशांपेक्षा खाली जाण्याची बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे. अशा वेळेस द्राक्षबागेत डाऊनी मिल्ड्यू येण्याची शक्यता असते. खोडावर असलेल्या फुटी किंवा वायरवरून खाली लोंबणाऱ्या फांद्यावर सर्वसाधारणपणे पहिल्यांदा डाऊनी येतो. अशा प्रकारची जमिनीजवळ असलेली पाने किंवा काड्या काढून घ्याव्यात, त्यामुळे डाऊनी बागेमध्ये लवकर येत नाही. ज्या बागेमध्ये शेंडा चालू असेल, अशा बागेमध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी फोसेटिल एएल २ ग्रॅम किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसिड २ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब दोन ग्रॅम मिसळून फवारावे.

संपर्क ः ०२०-२६९५६००१ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com