द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीपोषक वातावरणनिर्मिती

द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीपोषक वातावरणनिर्मिती
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीपोषक वातावरणनिर्मिती

द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. लवकरच फळकाढणीची सांगता होईल. या वर्षी बागेतून चांगले उत्पादन मिळाले असले तरी येणाऱ्या हंगामात सूक्ष्म घडनिर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा असतो. सुक्ष्म घडनिर्मिती म्हणजे वेलीवर निघालेल्या प्रत्येक काडीवर अपेक्षित असलेला द्राक्षघड होय. प्रत्येक वेलीवर जास्तीत जास्त फलधारीत काड्या असल्यास पुढील हंगामात चांगल्या प्रतीचे द्राक्ष तयार होतात. त्यासाठी खरड छाटणीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते. खरड छाटणी केल्यानंतर नवीन फुटी बाहेर येणे व त्या फुटींवर सुक्ष्म घडनिर्मिती होणे यासाठी काही परिस्थिती जबाबदार असतात. अशा परिस्थितीवर मात करून सुक्ष्म घडनिर्मिती कशी मिळवावी, याबद्दल या लेखातून जाणून घेऊ. बागेतील महत्त्वाच्या समस्या ः बागेत खरड छाटणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फुटी मागेपुढे फुटणे, उशिरा फुटणे, ओलांडा डागाळणे इ. समस्यांचा सामना करावा लागतो. अशी स्थिती बागेमध्ये असताना बागेचे व्यवस्थापन उदा. सिंचन, खत किंवा संजीवके यांचे नियोजन करणे कठीण होते. फुटी निघाल्यावर तापमानाचा परिणाम व उपाययोजना ः

  • वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग हा ३०-३५ अंश सेल्सिअस व ६०-८०% आर्द्रता असलेल्या परिस्थितीत चांगला असतो. द्राक्षबागेत खरड छाटणी करतेवेळी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे व आर्द्रता ही ३०% पेक्षा कमी अशी वातावरण स्थिती असते. परिणामी, वेलीच्या शरीरशास्त्रीय क्रियांसाठी योग्य वातावरण नसल्याने वेलीवर डोळे फुटण्यास अडचणी येतात. तेव्हा खरड छाटणी होताच खालील उपाययोजना कराव्यात. बागेत शेडनेटचा वापर महत्त्वाचा ः
  • वेलीच्या ओलांड्यावर तापमान कमी करून आर्द्रता वाढवण्याकरिता द्राक्षवेली सावलीमध्ये असणे गरजेचे आहे. बागेत शेडनेटचा वापर करावा. वापरलेल्या शेडनेटमुळे बागेतील तापमान व आर्द्रता यामधील समतोल राहण्यास मदत होईल. बागेत एकसारख्या व लवकर फुटी निघण्यास मदत होईल. २) ओलांड्यावर पाण्याची फवारणी करणे ः
  • ज्या ठिकाणी शेडनेटचा वापर शक्‍य नाही, अशा बागेत खरड छाटणीच्या ३-४ दिवसांपासून ओलांड्यावर दिवसातून दोनवेळा (सकाळी ११ ते १२ व दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान) १५ ते १६ व्या दिवसांपर्यंत पाण्याची फवारणी करावी. फवारणी करतेवेळी पाण्याच्या थेंबाचा आकार मोठा असावा, त्यामुळे पाणी ओलांड्यावर जास्त काळ राहील. एकूणच बागेमध्ये जास्त तापमान व जास्त आर्द्रता अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे डोळे फुटण्यास मदत होईल.
  • हायड्रोजन सायनामाईडचा वापर महत्त्वाचा ः

  • खरड छाटणीनंतर नवीन फुटी सहज निघतात असा बागायतदारांचा समज असल्यामुळे हायड्रोजन सायनामाईडचा वापर टाळला जातो. ओलांडा उन्हामध्ये (जास्त तापमानात) जास्त काळ उघडा राहिल्यामुळे त्या ओलांड्यावरील पेशींची मर होते. त्यानंतर हा डोळा जळाल्यासारखा होतो किंवा फार उशिरा म्हणजेच २० ते २५ दिवसांनी फुटतो किंवा काही वेळेस फुटतसुद्धा नाही. म्हणजेच वेलीवर डेड आर्म किंवा ओलांडा डागळण्याची परिस्थिती तयार होते. या ओलांड्यावर पुढील काळात खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
  • बागेत हायड्रोजन सायनामाईडचा वापर केला नसला तरीसुद्धा बागेत फुटी निघतात. मात्र, त्या मागे पुढे व उशिरा निघू शकतात. हायड्रोजन सायनामाईडची शिफारस ही फक्त डोळे फुटण्याकरिता केली गेली आहे. त्यामुळे त्याचा वापर हा कमी-प्रमाणात म्हणजेच २०-२५ मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे करणे गरजेचे आहे. या रसायनाचा वापर हा खालील परिस्थितीत शिस्तबद्ध करणे आवश्यक आहे.
  • ज्या बागेत पूर्वीच्या ओलांड्याची लांबी कमी आहे, अशा परिस्थितीत या वेळी ओलांडा पुढे वाढवून घेण्याकरिता मागील हंगामातील काडी तारेवर वळवून ३ ते ४ डोळ्यावर कापून घ्यावी. अशा ओलांड्यावर फक्त मागील बाजूस मात्र हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग टाळावे. असे केल्यास दोन्ही प्रकारच्या ओलांड्यावर एकाच वेळी फुटी निघण्यास मदत होईल.
  • उपलब्ध पाणी बागेसाठी वापरताना...

  • यावर्षी बऱ्याच भागात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. अशा ठिकाणी येत्या हंगामात पाण्याची उपलब्धता कमी असेल. आतापर्यंत कॅनॉल, नदी या सारखे पाणी बागेकरिता वापरले असले. मात्र, हे दोन्ही स्रोत बंद झाले असतील किंवा होण्याच्या स्थितीत असतील. पाण्याच्या तुटवड्यामुळे बोअरवेल व विहिरींचे उपलब्ध पाणी जास्त प्रमाणात वापरावे लागेल. वाहत्या पाण्याच्या तुलनेत बोअरवेल व विहिरीच्या पाण्यामध्ये सॅलिनिटी, क्षार व कार्बोनेट्‌स, बायोकार्बोनेट्स यांची मात्रा जास्त असते. अशा पाण्याच्या वापरामुळे बागेत पानांवर स्कॉर्चिंग येते. अशा प्रतीच्या पाण्याची गरजही जास्त असते.
  • खरड छाटणीनंतर काडी परिपक्व होईपर्यंत बागेमध्ये साधारणतः ६.५ ते ८.५ लाख लिटर पाणी प्रती एकर लागू शकेल. ही गरज पुढील काळात येणाऱ्या पावसामुळे कमी-अधिक होऊ शकते. तेव्हा, बागायतदारांनी पूर्ण हंगामातील किमान ७० टक्के पाण्याची उपलब्धता करून ठेवणे आवश्यक आहे.
  • क्षारयुक्त असलेले बोअरवेल व विहिरीचे पाणी वापरण्याकरिता शक्यतो खरड छाटणीच्या वेळी बोद पूर्णपणे भिजवावेत. बोदाच्या बाहेर पाणी निघून जाईल. या सोबत मुळाभोवती असलेले क्षारही निचरा होऊन जातील. यानंतर उपलब्ध पाण्यानुसार कमी अधिक प्रमाणात गरजेनुसार पाण्याची उपलब्धता बागेत करावी. असे केल्यास पुढील काळात जरी क्षारयुक्त पाणी वेलीने उचलून घेईपर्यंत पाने परिपक्वतेच्या आसपास असतील. परिपक्वतेच्या जवळ असलेल्या पानांवर स्कॉर्चिंग येण्याची समस्या फारशी जाणवत नाही.
  • कोवळ्या पानांवर स्कॉर्चिंग आल्यास पानांमध्ये आवश्यक असलेल्या हरितद्रव्यांचे प्रमाण कमी असते. म्हणजेच वेलीमध्ये आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचे उत्पादन या खराब झालेल्या पानांमुळे कमी होते. या वेळी पानांचा आकारही कमी असतो. या विपरीत परिणाम पुढील काळात सुक्ष्म घडनिर्मितीवर होतो.
  • बोदावर मल्चिंगचा वापर करावा. त्यासाठी उसाचे पाचट, बगॅस, पालापाचोळा किंवा शेणखत वापरता येईल. यामुळे ड्रिपमझून दिल्या गेल्या पाण्याचे बोदातून होणारे बाष्पीभन टाळता येते. मुळाच्या परीसरातील तापमान नियंत्रित राहिल्यामुळे मुळींची कार्य करण्याची क्षमतासुद्धा वाढलेली आढळून येईल.
  • डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com