तयारी खरिपाची : भुईमूग उत्पादन वाढवा सुधारित तंत्रज्ञानातून

भुईमुग लागवड
भुईमुग लागवड

खरीप हंगामातील पावसाचे कमी दिवस, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाची कमतरता, यामुळे उत्पादनामध्ये अस्थिरता दिसून येत असल्याने खरिपातील भुईमुगाचे क्षेत्र कमी होत आहे. सोबतच हेक्टरी रोपांची कमी संख्या, सुधारित वाणांच्या बियाण्यांची कमतरता, या व्यवस्थापनातील अडचणीमुळे उत्पादनामध्ये घट होत आहे. हे टाळण्यासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

जमीन : मध्यम, चांगल्या निचऱ्याची, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित, चुना व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन योग्य असते. अशा जमिनीत आऱ्या सहज शिरतात व शेंगाही चांगल्या पोसतात. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. पूर्वमशागत : भुईमुगाच्या मुळ्या जमिनीत ३० ते ४५ से.मी. खोल वाढतात. त्यास असंख्य उपमुळे फुटून त्यांचे जाळे जमिनीच्या  वरच्या १५ सें.मी. थरात पसरतात. शेंगा पोसण्यासाठी जमिनीत मोकळी हवा राहणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी १२ ते १५ गाड्या टाकावे. नांगरणीनंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व सपाट करावी. बीज प्रक्रिया : पेरणीपूर्व प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कार्बेन्डाझिम चोळून लावावे. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू २५ ग्रॅम चोळावे. त्यानंतर ते पेरणीसाठी वापरावे. बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ दिसून येते. पेरणीची वेळ : भुईमुगाची पेरणी जूनमध्ये पावसाला सुरवात झाल्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी :

  •   भुईमुगाची पेरणी पाभरीने अथवा टोकन पद्धतीने करावी.
  •   सरी-वरंबा पद्धतीचा वापर करावयाचा असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे सरी- वरंब्याची उंची व रुंदी ठेवावी.
  •   उपट्या जातीसाठी दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व रोपातील अंतर १० सें.मी. ठेवावे. त्यासाठी १०० ते १२५ किलो बियाणे वापरल्यास प्रति हेक्टरी ३.३३ लाख रोपांची संख्या मिळते.
  •   निमपसऱ्या व पसऱ्या तसेच मोठ्या शेंगदाण्यासाठीच्या वाणांची पेरणी दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. ठेवून करावी. त्यासाठी हेक्टरी ८० ते १०० किलो बियाणे वापरल्यास प्रति हेक्टरी १.४८ लाख रोपांची संख्या मिळते.
  • आंतरमशागत :

  • पाणी, अन्नघटक, सूर्यप्रकाश व हवा यासाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. किडी व रोगांना आश्रय देतात यामुळे उत्पन्नात २५-५० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते.
  •  भुईमुगात सर्व प्रकारच्या आंतरमशागतीची कामे आऱ्या सुटण्याच्या आत पेरणीनंतर ४५ दिवसांपर्यंत करावीत.
  •  पहिल्या दीड महिन्यात दोन खुरपण्या आणि दोन कोळपण्या करून पीक तणविरहित ठेवावे.
  • शेवटची कोळपणी खोल आणि फासेला दोरी बांधून करावी व यासोबत जिप्सम खत २०० कि./हेक्टर याप्रमाणे पेरावे.
  • तसेच ४० दिवसांनी आणि ५० दिवसांनी २०० लिटर पाण्याचा पत्र्याचा रिकामा ड्रम दोनदा फिरवावा. सुटलेल्या सर्व आऱ्या जमिनीत घुसून भरघोस शेंगा लागतात.
  •  अनेक शेतकरी भुईमूग पिकाच्या फांद्यावरील सर्व आऱ्या जमिनीत जाण्यासाठी झाडाला अधिक मातीची भर लावतात. मात्र  यामुळे फांद्यांस रोगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन सुरवातीस तयार झालेल्या शेंगा खराब होऊ शकतात.  
  • पाणी व्यवस्थापन : 

  •   भुईमुगास लागलेल्या एकूण फुलांपैकी फक्त ५-२० टक्केच फुलांचे रुपांतर शेंगामध्ये होते. एकूण लागलेल्या शेंगापैकी ६६ टक्केच शेंगा परिपक्व होतात. उर्वरित ३३ टक्के शेंगा अपरिपक्व राहतात.
  •   जास्तीत जास्त परिपक्व शेंगा एकदाच मिळविण्यासाठी झाडास लागणारे पहिले फूल व शेवटचे फूल हा कालावधी कमी असावा, यासाठी पाणी व्यवस्थापनास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  •   झाडास पहिले फूल दिसताच (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) पिकास पाण्याचा हलका ताण द्यावा. (५ -६ दिवस पिकास पाणी देऊ नये.) या पाण्याच्या ताणामुळे पिकाची अवास्तव वाढ रोखली जाते. रोगाचा प्रसार कमी होतो. ताणाच्या कालावधीत वनस्पतीत साठलेल्या अन्नाचा वापर फुले निर्मितीसाठी होऊन एकाच वेळी जास्तीत जास्त फुले निर्माण होतात. एकाच वेळी आलेल्या फुलांच्या आऱ्या एकाच वेळी जमिनीत शिरतात. त्यापासून निर्माण शेंगा एकाच कालावधीत परिपक्व होतात. त्या सारख्या आकाराच्या मिळतात.
  •   पिकास आऱ्या सुटण्याच्या वेळेस (पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी) जमिनीत मुबलक ओलावा असावा. या ओलाव्यामुळे आऱ्या कॅल्शिअमचे शोषण करु शकल्याने शेंगाची वाढ होते. या काळात पाण्याची कमतरता झाल्यास शेंगांमध्ये एका दाण्याचे व अपरिपक्व शेंगांचे प्रमाण वाढते. अशा शेंगाची उगवण शक्ती कमी असते.
  •   याउलट पिकास पाण्याचा वापर अति झाल्यास वनस्पतीची शाकीय वाढ जास्त होते, शाकीय वाढ जास्त झाल्यास रोगाचा प्रादुर्भाव बळावतो, नवीन आऱ्या कुजण्याची भीती असते व पिकाच्या असंतुलित वाढीमुळे पिकावर फुले, आऱ्या, कच्या शेंगा व परिपक्व शेंगा अशा सर्व अवस्था दिसून येतात. म्हणून पिकात पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो पिकास पाणी तुषार सिंचन पद्धतीने देणे फायद्याचे ठरते.(तक्ता २)
  • सुधारित जाती

    वाण प्रकार कालावधी (दिवस)   उत्पादन (क्विं./हे.) वैशिष्ट्ये
    एस.बी.-११ उपटी १०५-११० १४-१६     कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य
    जे.एल.-२४ उपटी ९५-१०० १६-१८ कोरडवाहू लागवडीसाठी योग्य
    एल.जी.एन.-१ उपटी १०५-११० १६-१८ कोरडवाहू लागवडीसाठी योग्य
    ए.के.-१५९ उपटी १०५-११० १८-२० कोरडवाहू लागवडीसाठी योग्य
    टी.पी.जी.-४१ उपटी १२५-१३० १५-१६ टपोरे वाण, बागायती लागवडीसाठी योग्य
    टी.एल.जी.-४५ उपटी ११८-१२० १६-१८ टपोरे वाण, बागायती लागवडीसाठी योग्य

        भुईमुगातील पाणी व्यवस्थापन  पिकाची अवस्था  -    पेरणीनंतर पाण्याच्या पाळ्या (दिवस)  उगवणीच्या वेळी  -    पेरणीनंतर लगेचच  फुलोरा येणे   -   ३० ते ४० दिवस  आऱ्या सोडण्याची अवस्था   -   ४० ते ४५ दिवस  शेंगा धरणे व दाणे भरणे   -   ६५ ते ७० दिवस

    खत व्यवस्थापन नत्र     

    १) पेरणीनंतर पिकाच्या कायिक वाढीसाठी आवश्यक.   २) शेंगा धरणे व दाणे भरण्यासाठी आवश्यक.    

    १) हेक्टरी १६० किलो नत्र आवश्यक असून पैकी ८० टक्के नत्र   (१३० किलो) पुरवठा मुळावरील गाठीद्वारे होतो. २) उर्वरित २० टक्के (३० किलो) नत्राची मात्रा रासायनिक खताद्वारे   पेरणी वेळी द्यावी.

    स्फुरद    

    १) मुळाची व त्यावरील गाठींची वाढ होऊन नत्राचे स्थिरीकरण करते. २) अधिक फूलनिर्मिती व शेंगांची वाढ करते.    

    १) ५० किलो स्फुरद पेरणी वेळी द्यावे. २) पेरणीनंतर ३० व ७० दिवसांनी १ टक्के सिंगल  सुपर फॉस्फेटचे द्रावण हेक्टरी अनुक्रमे ५०० व १००० लिटर पाणी घेऊन प्रति हेक्टरी फवारावे.

    गंधक     

    १) तेलनिर्मितीसाठी व मुळांवरील गाठींची वाढ होण्यासाठी. २) पिकांमध्ये रोग प्रतिकारकता वाढविणे.    

    १) हेक्टरी १० किलो गंधक पेरणी वेळेस द्यावे. २) ०.५ टक्के (अर्धा किलो गंधक १०० ली. पाणी) गंधकाचे द्रावण उगवणीनंतर ३०, ५०, व ७० दिवसांनी अनुक्रमे ५००, ५०० व १००० पाण्याद्वारे प्रति हेक्टरी फवारावे.

    कॅल्शिअम     

    १) आऱ्या निर्मिती करणे. २) शेंगांमधील दाणे भरणे.     १) ३०० किलो जिप्सम पेरणीच्या वेळेस व २०० किलो पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी प्रति हेक्टरी द्यावे. लोह      चुनखडी व विम्ल जमिनीमध्ये लोहाची कमतरता भासते.      ५०० ग्रॅम फेरस सल्फेट + २० ग्रॅम सीट्रिक आम्ल पेरणीनंतर ३०, ५० व ७० दिवसांनी अनुक्रमे हेक्टरी ५००, ५०० व १००० लि. पाण्यात मिसळून फवारावे.

    डॉ. एम. के. घोडके,९४२३७७७५८५ डॉ. ए. एम. मिसाळ,७५८८६१२९४३ (गळीत धान्ये संशोधन केंद्र, लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com