agricultural stories in Marathi, agrowon, groundwater/ saline water use for irrigation nut pest management | Agrowon

सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, महेश आजबे, डॉ. अनिल दुरगुडे
शनिवार, 2 मार्च 2019

सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जमिनीच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांसह पिकांच्या वाढीवर दृश्य आणि अदृश्य परिणाम होतात. सिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापरामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थितीमध्ये एकूणच पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे अत्यावश्यक बनत चालले आहे.

सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे जमिनीच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांसह पिकांच्या वाढीवर दृश्य आणि अदृश्य परिणाम होतात. सिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापरामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थितीमध्ये एकूणच पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे अत्यावश्यक बनत चालले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये क्षारयुक्त पाणी आणि जमिनींची समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्याचे प्रमाण सर्वदूर पसरलेले असले तरी मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्टा आणि काळ्या जमिनीत ही समस्या तीव्र आहे. क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठून खराब होत आहेत किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत आहे.

पाण्याचे स्रोत व त्यातील क्षाराची कारणे ः

सर्वसामान्यपणे पाण्याचे पृष्ठभागावरील पाणी आणि भूजल असे दोन प्रकार पडतात. समुद्राचे पाणी वगळता पृष्ठभागावरील पाणी म्हणजे नद्या, तलाव यांचे पाणी गोडे किंवा हलके मानले जाते. भूजलामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते खारे किंवा जड मानले जाते. त्याची चव खारट किंवा मचूळ लागते. भूजलातील पाणी किती खारे आहे, हे ठरण्यामागे भौगोलिक परिस्थिती, मातीतील क्षारांचे प्रमाण, खडकांचा प्रकार असे काही घटक कारणीभूत असतात. नदीजवळचे भूजल गोडे किंवा कमी खारे असते तर वाळवंट किंवा समुद्राजवळील भूजल अधिक खारे असते. अशा खाऱ्या पाण्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात.
सिंचनाचे पाणी हे नद्या, तलाव, धरणे, विहिरी, विंधनविहिरी (भूगर्भातील पाणी) अशा स्रोतांपासून येते. या विविध स्रोतांमध्ये असणारे क्षाराचे प्रमाण पाण्याची गुणवत्ता ठरवण्यास कारणीभूत असतात. पाणी मुरताना किंवा झिरपत वाहताना मातीतून, खडकामधून जात असते. या वेळी मातीतील क्षार पाण्यात विरघळतात. साधारणतः क्‍लोरीन, बायकार्बोनेट, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात. निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वाढता वापर अशा अनेक कारणांमुळे पाणी क्षारयुक्त होते.

क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम

 • पिकांचे उत्पादन हे हवामान, जमिनीचा कस आणि पाण्यावर अवलंबून असते. हवामानावर आपले फारसे नियंत्रण नसते. जमिनीचा प्रकारही आपण ठरवू शकत नाही. मात्र, त्यासाठी वापरले जाणारे पाणी योग्य प्रकारे क्षारांचा फारसा परिणाम न होऊ देता दिल्यास अनेक समस्या कमी करणे शक्य आहे.
 • सिंचनाच्या पाण्यात विद्राव्य क्षार असल्यास वनस्पतींच्या वाढीला फटका बसू शकतो.
 • जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म खालावतात.
 • पिकांना खारे पाणी दिल्यास जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. मातीवर क्षारांचा पांढरा थर जमा होऊन पाणी खोलवर मुरत नाही. यामुळे जमिनीचा पोत बिघडून कस कमी होतो. साहजिकच याचा पिकांना फटका बसतो.
 • आजकाल पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचन वापरले जाते. त्यासाठी शेतात पसरलेल्या लॅटरलमधून ड्रिपरद्वारे पिकाच्या मुळाजवळ पाणी दिले जाते. या ड्रीपरला अत्यंत बारीक छिद्र असते. खाऱ्या पाण्यातील कॅल्शियममुळे नळ्यांमध्ये आणि छिद्रांमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे थर जमा होतात. छिद्रे बुजून गेल्याने पिकांना पाणी मिळत नाही. क्षारयुक्त पाणी असल्यास ठिबक सिंचन प्रणालीच्या देखभालीचा खर्च वाढतो.
 • मातीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढल्यास वनस्पतीस पाण्याची उपलब्धता कमी होते.

अशी ठरवली जाते पाण्याची प्रत

सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यातील क्षारांची तीव्रता, पाण्यातील एकूण क्षारांचे प्रमाण, सोडिअम स्थिरीकरणाचे गुणोत्तर, पिकांची आम्लता विम्लता सहन करण्याची शक्ती, जमिनीची रासायनिक व भौतिक गुणधर्म, या सर्व बाबींचा पाण्याची कार्यक्षमता तथा उपयुक्तता ठरविताना विचार केला जातो.

घटक उत्तम प्रतीचे मध्यम प्रतीचे अयोग्य पाणी
सामू ६.५ ते ७.५ ७.५ ते ८.५ > ८.५
क्षार ( डेसी सायमन / मीटर ) < ०.२५ ०.२५ – ०.७५ > २.२५
कार्बोनेट ( मि.ई. / लिटर )   ०.५ ते १.५ > १.५
बायकार्बोनेट ( मि.ई. / लिटर ) < १.५ १.५ ते ८.० > ८.०
क्लोराइड ( मि.ई. / लिटर ) ४.० ४.०ते १० > १०
सल्फेट ( मि.ई. / लिटर ) < २.० २.० ते १२ > १२
रेसिड्यूअल सोडियम कार्बोनेट ( मि.ई. / लिटर ) < १.२५ १.२५ ते २.२५ > २.२५
सोडियम शोषण गुणांक < १० १० ते २६ > २६
मँग्नेशियम आणि कॅल्शियम गुणांक <१.० १.० ते ३.० > ३.०
बोरॉन ( पीपीएम ) <१.० १.० ते २.० > २ .०

परीक्षणासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा?

 • उपलब्ध कुठल्याही स्रोतामधून पाण्याचा नमुना घ्यावयाचा झाल्यास योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते
 • संयुक्त नमुना घेण्यासाठी प्लॅस्टिकची बादली किंवा अन्य स्वच्छ प्लॅस्टिक भांड्याचा वापर करावा
 • विद्युत पंप असल्यास तो चालू करून थोडा वेळ पाणी जाऊ द्यावे. नंतर पाण्याचा नमुना घ्यावा.
 • विद्युत पंप नसल्यास पाण्यावरील काडीकचरा बाजूला करून विहिरीच्या किंवा तलावाच्या आतील भागातून पाण्याचा नमुना घ्यावा.
 • नदी, कालवे यातून पाणी घेताना वाहत्या पाण्यातून नमुना घ्यावा. सर्वसाधारणपणे १ लिटर पाण्याचा नमुना पुरेसा होतो.
 • हा नमुना स्वच्छ धुतलेल्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून स्वच्छ झाकण लावावे.
 • घेतलेला नमुन्यावर शेतकऱ्याचे नाव, पाणी घेतल्याची तारीख, पाण्याचा स्रोत (विहीर, नदी किंवा तलाव इ.), गावाचे नाव, संपूर्ण पत्ता, पाण्याचा रंग व वास, यासोबतच पाण्याखाली भिजणारे क्षेत्र व पाण्याच्या वापराने समस्या निर्माण झालेली असल्यास त्याचा उल्लेख जरूर करावा.
 • पाण्याचा नमुना घेतल्यानंतर तो २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत पोचेल, याची काळजी घ्यावी. अन्यथा पाण्यात भौतिक, रासायनिक व जैविक बदल घडण्याची शक्‍यता असते.
 • महाराष्ट्रात विभागवार पाणी परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, ठाणे, लातूर, धुळे, नागपूर, नगर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग, ठाणे, औरंगाबाद, परभणी, जळगाव, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला यांचा समावेश आहे.

क्षारसहनशील पिके व त्यांचे वर्गीकरण

क्षारयुक्त पाणी सहन न करणारी पिके- संत्री, मोसंबी, कोबी, उडीद, मूग, हरभरा, वाटाणा, घेवडा, भेंडी, चवळी
मध्यम क्षारयुक्त पाणी सहन करणारी पिके- गहू, ज्वारी, बाजरी, लसूण, मका, भात, ऊस, करडई, फुलकोबी, रताळी, कांदा, बटाटा
अति क्षारयुक्त पाणी सहन करणारी पिके- पेरू, ओट, बार्ली

क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन करताना...

१) जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असेल आणि काही प्रमाणात युक्त कार्बोनेटस असतील तर अशा पाण्यात अधूनमधून १५० ते २०० ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट वापरावे.
२) पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल तर पाणी जीप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे.
३) सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.
४) पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.
५) पिकांची फेरपालट करावी.
६) आच्छादकांचा वापर करावा. उदा. उसाचे पाचट, पॉलिथिन पेपर इ.
७) पिकांची लागवड सरीच्या बगलेत करावी. त्यामुळे क्षारयुक्त पाण्याचा पिकाशी थेट संपर्क येणार नाही.
८) अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खणावेत.
९) क्षारयुक्त पाण्याबरोबर गोडे पाणी उपलब्ध असल्यास आलटून पालटून दोन्ही प्रकारचे पाणी वापरावे.
१०) पाणी अल्कधर्मी असल्यास पिकासाठी असलेल्या शिफारशीपेक्षा ३५ टक्के अधिक नत्र द्यावे.
११) क्षारांचा ताण सहन करणारी पिके घ्यावीत. उदा. गहू, कापूस, बार्ली (सातू) करडई, सुर्यफुल इ.
१२) हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढवावे.
१३) पाणी व माती परीक्षण अहवालाच्या आधारे खत व पाण्याचे योग्य प्रमाणात व्यवस्थापन करावे. त्यामुळे क्षारयुक्त पाण्याचा जमिनीच्या सुपिकतेवर व पिकांच्या वाढीवरील विपरीत परिणामांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२
(शुभम दुरगुडे व महेश आजबे हे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी असून डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा
फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मृदाशास्त्रज्ञ आहेत)


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...