ऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण

ऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण
ऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण

अवर्षण स्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे राज्यामध्ये गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब सामुदायिक रीतीने करण्याची आवश्यकता आहे.

भारतामध्ये हुमणीच्या साधारणपणे ३०० प्रजाती असून, त्यातील लिकोफोलिस (नदी काठावरील) आणि होलोट्रॅकिया (माळावरील) अशा दोन प्रजाती राज्यामध्ये आढळतात. त्यात गेल्या ३-४ वर्षांमध्ये फायलोग्यथस आणि अॅडोरेटस या प्रजातींची भर पडली आहे. राज्यामध्ये होलोट्रॅकिया सेरेटा या प्रजातीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही जात हलक्या जमिनीत आणि कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते.  या हुमणी जातीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उगवणीमध्ये ४० टक्क्यापर्यंत, तर उत्पादनामध्ये १५ ते २० टनापर्यंत नुकसान होते. या जातीच्या नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट या काळात सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे.  

आर्थिक नुकसान संकेत पातळी

  • प्रति घनमीटर अंतरात एक हुमणी अळी आढळल्यास कीड नियंत्रण उपाययोजनांना सुरवात करावी.
  • हुमणीग्रस्त शेतामध्ये पावसाळ्यात कडूनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
  • हुमणीचा जीवनक्रम (होलोट्रॅकिया सेरेटा)

  • अंडी ः मादी जमिनीत १० सेंमी खोलीवर सरासरी ६० अंडी घालते. अंडी कालावधी १० ते १५ दिवस. पावसाळ्याच्या सुरवातीस जूनच्या मध्यास. अंडी मटकी किंवा ज्वारीच्या आकाराचे लांबट गोल असून दुधी पांढरे असतात. पुढे त्यांचा रंग तांबूस व गोलाकार होतो.
  • अळी ः अळीच्या तीन अवस्था असतात. पहिली अवस्था २५ ते ३० दिवसांची, द्वितीयावस्था ३० ते ४५ दिवसाची व तृतीयावस्था १४० ते १४५ दिवसांची असते. अळीचा एकूण कालावधी १५० ते २१० दिवसांचा असतो. जमिनीच्या वरील थरात १० ते १५ सेंमी खोलीपर्यंत अळी सापडते. पीक नसलेल्या पडीक जमिनीत ती २४ सेंमी खोलीपर्यंत खाली जाते. पूर्ण वाढ झालेली अळी (पांढरट, हिरवी व इंग्रजी सी आकाराची) असते. ती नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या महिन्यामध्ये जमिनीमध्ये ९८ ते १२० सेंमी खोलीवरील कोषावस्थेमध्ये जाते.
  • कोष ः सुरवातीला पांढरट रंगाचा असून, पुढे लालसर होत जातो. कालावधी २० ते ४० दिवस आणि ऑगस्ट ते मार्चपर्यंत असतो. स्वरक्षणासाठी कोषाभोवती मातीचे टणक आवरण तयार करते.
  • भुंगेरा ः कोषावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पुरेसा पाऊस पडेपर्यंत (४ ते ५ महिने) जमिनीत मातीच्या घरातच काही न खाता पडून राहतो. साधारण नोव्हेंबर महिन्यात जमिनीत तयार झालेले भुंगेरे मे- जून च्या पहिल्या पावसापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. याला भुंग्याची सुप्तावस्था (क्विझंड स्टेज) म्हणतात. रंग विटकरी ते काळपट असतो. पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामध्ये संध्याकाळी ७.२० ते ७.५० (जास्तीत जास्त ९ वाजेपर्यंत) या काळात सर्व भुंगेरे १० ते १५ मिनिटात जमिनीबाहेर पडतात. नर आणि मादी भुंगेऱ्याचे मिलन होते. ( कालावधी ४ ते १५ मिनिटे) नंतर ते कडूनिंब, बोर, बाभूळ इ. पाने खातात. पाने खाल्ल्यामुळे ती अर्धवट चंद्राकृती दिसतात. हे भुंगे सूर्योदयापूर्वी (५.४५ ते ६ वाजेपर्यंत) जमिनीत जातात. भुंगेरे निशाचर असतात. मादी भुंगेरे साधारणपणे ९३ ते १०९ दिवस जगतात, तर नर भुंगेरे मिलनानंतर लगेच मरतात.
  • यजमान वनस्पती

  • ही बहुभक्षीय कीड असून, प्रामुख्याने कडूनिंब, बाभूळ पानांवर जगते. त्या व्यतिरीक्त बोर, पिंपळ, गुलमोहोर, शेवगा, पळस, चिंच, अशा विविध ५६ वनस्पतींवर जगू शकते.
  • अळी साधारणपणे ऊस, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, आले, तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, तेलबिया व फळवर्गीय अशा अनेक पिकांच्या मुळांवर उपजीविका करते.
  • नुकसानीचा प्रकार

  • हुमणीची १२ महिन्यांमध्ये एकच पिढी होत असली तरी अळी या नुकसानकारक स्थितीचा कालावधी सर्वाधिक दिवसांचा असतो. या अवस्थेत अळी पिकांच्या मुळावर उपजीविका करते. परिणामी पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.
  • अंड्यातून बाहेर पडलेल्या प्रथम अवस्थेतील अळ्या जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थ किंवा जिवंत मुळे उपलब्ध असल्यास त्यावर उपजीविका करतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व अन्य पिकांची मुळे (कालावधी - साधारणपणे जून -ऑक्टोबर महिन्यात) खातात. मुळेच खाल्ली गेल्याने पिकांना अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडते. प्रादुर्भावग्सत ऊस निस्तेज दिसतो, पाने मरगळतात. पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरवात होते. साधारण वीस दिवसांत ऊस पूर्णपणे वाळून काठीप्रमाणे दिसतो.
  • एका ऊस बेटाखाली कमाल २० पर्यंत अळ्या आढळतात. मात्र, एक किंवा दोन अळ्या असल्या तरी अनुक्रमे तीन ते एक महिन्यांत ऊस मुळ्या कुरतडून कोरड्या करतात. जमिनीखालील कांड्याच्या भागांना अळीचा उपद्रव होतो.
  •  प्रादुर्भावग्रस्त उसाला हलकासा झटका दिल्यास सहजासहजी उपटून वर येतो.
  • हेक्टरी २५ ते ५० हजार अळ्या आढळल्यास साधारणपणे १५ ते २० टनापर्यंत उत्पादनात घट येते. हुमणी अळीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास १०० टक्क्यापर्यंत नुकसान झाल्याचे दिसून येते.
  • एकात्मिक नियंत्रण या किडीच्या नियंत्रणासाठी एखादी उपाययोजना किंवा कीटकनाशकांचा फायदा होत नाही. हुमणी किडीच्या बहुतांश अवस्था या जमिनीखाली पार पडतात. केवळ भुंगेरे पावसाळ्याच्या सुरवातीला मीलनासाठी व पाने खाण्यासाठी बाहेर पडते. या काळातच सामुदायिक मोहीम राबवण्याची आवश्यकता असते.  

    मशागत

    1.  नांगरट ः एप्रिल -मे किंवा सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात २ ते ३ वेळा उभे आडवे शेत नांगरावे. पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्या व अंडी खातात.
    2. ढेकळे फोडणे ः शेतीमध्ये मोठी ढेकळे राहिल्यास त्यात हुमणी निरनिराळ्या अवस्था राहू शकतात. त्यासाठी तव्याचा कुळव किंवा रोटाव्हेटरद्वारे ढेकळे फोडून घ्यावीत.
    3. पीक फेरपालट ः अति प्रादुर्भावग्रस्त शेतीमध्ये ऊस तोडणीनंतर खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. सूर्यफूल काढणीनंतर शेतीचा ३ ते ४ वेला नांगरट करावी.
    4. सापळा पीक ः हुमणीग्रस्त शेतामध्ये भुईमूग किंवा ताग पीक सापळा पीक म्हणून घ्यावे. उसाच्या उगवणीनंतर सऱ्यामध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग किंवा ताग झाडांखालील अळ्या नष्ट कराव्यात.
    5. अळ्या मारणे ः मशागतीच्या कोणत्याही कामावेळी (खुरपणी, तगरणी अथवा बांधणी) बाहेर पडलेल्या अळ्या गोळा करून माराव्यात.
    6. प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे ः वळिवाच्या पहिल्या पावसानंतर हुमणीचे बाहेर पडणारे भुंगेरे बाभूळ किंवा कडूनिबांच्या झाडावर गोळा होतात. फांद्या हलवून खाली पाडावेत किंवा प्रकाश सापळे तयार करून ते गोळा करावेत. गोळा केलेले भुंगेरे रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून मारावेत. असे सलग तीन ते चार वर्षे सामुदायिकरीत्या केल्यास फायदा होतो.    अतिप्रादुर्भावग्रस्त शेतीमध्ये उसाचा खोडवा घेऊ नये. पीक निघाल्यानंतर त्वरित रोटाव्हेटरच्या साह्याने मशागत करावी.

    जैविक नियंत्रण

  • जैविक नियंत्रणासाठी बिव्हेरीया बॅसियाना, मेटाराझिम अॅनीसोप्ली, व्हर्टिसिलीयम लेकॅनी उपयुक्त ठरतात. ही जैविक नियंत्रक एकरी दोन लिटर/किलो प्रमाणात कंपोस्ट खतात मिसळून, ड्रिपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे पिकाच्या मुळापाशी द्यावे. जैविक नियंत्रण घटक २१० रुपये प्रति किलो या दराने व्हिएसआय मध्ये उपलब्ध आहेत.
  • जीवाणू (बॅसीलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटरोरॅबडेटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचाही वापर हुमणीनियंत्रणासाठी होऊ शकतो.
  • रासायनिक नियंत्रण

  • कडूनिंब अथवा बाभळीच्या झाडांवर इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एसएल) ०.३ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
  • शेणखत, कंपोस्ट याद्वारे हुमणीच्या अळ्या व अंडी शेतामध्ये जातात. प्रतिगाडी शेणखतामध्ये शिफारशीत कीटकनाशक एक किलो प्रमाणात मिसळावे. नंतरच त्याचा शेतात वापर करावा. त्यासाठी उन्हाळ्यात शेणखताचे लहान लहान ढिग करावेत.
  • मोठ्या उसामध्ये (जून ते ऑगस्ट) क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ लिटर प्रतिहेक्टर (१००० लिटर पाण्यात मिसळून) जमिनीत द्यावे.
  • ऊस लागवडीच्य काळात सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यामध्ये फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार) २५ किलो प्रतिहेक्टर मातीत मिसळावे. किंवा क्लोथियानिडीन (५० टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) २५० ग्रॅम या प्रमाणात वाळूमध्ये मिसळून पिकाच्या मुळाजवळ मातीत टाकावे व नंतर हलके पाणी द्यावे.
  • संपर्क ः ०२० -२६९०२१००  (विस्तारीत क्र.) ३० (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, ता. हवेली, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com