आंतरपीक ठरते फायदेशीर...

आंतरपीक ठरते फायदेशीर...
आंतरपीक ठरते फायदेशीर...

आंतरपीक पद्धतीमध्ये दोनही पिकांना वेगवेगळ्या ओळींमध्ये पेरल्यामुळे प्रत्येक पिकाच्या आवश्‍यकतेप्रमाणे व्यवस्थापन करणे सोईचे जाते. यामध्ये खत व पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि आंतरमशागत करणे सोईस्कर ठरते. आंतरपीक पद्धतीमुळे अधिक व स्थिर उत्पादनातून चांगला नफा मिळतो. आंतर पीकपद्धतीमध्ये मुख्य आणि अांतरपिकाची योग्य निवड ही महत्त्वपूर्ण बाब आहे. जमीन, हवा, पाणी, प्रकाश, अन्नद्रव्य या नैसर्गिक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरीत्या उपयोग होण्यासाठी दोनही पिकांमधील वैशिष्ट्यांचा विचार करावा. मुख्य पीक आणि अांतरपिकाची मुळांच्या कायीक वाढीची वैशिष्टे भिन्न असावीत.

  • जेव्हा मुख्य पीक हे सोटमूळ पद्धतीचे असेल तर आंतरपीक हे तंतुमय मूळ पद्धतीचे निवडावे. असे केल्याने दोनही पिकांचे अन्नद्रव्य आणि पाणी यांचा पुरवठा जमिनीच्या खालच्या व वरच्या थरातून होतो.
  •  अांतरपीक हे मुख्य पिकापेक्षा बुटके आणि मुख्यपिकापेक्षा कमी कालावधीचे असावे. जेणेकरून अांतरपिकांची वाढ मुख्य पिकावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशास अवरोध करणार नाही.
  •  मुख्य पीक व आंतरपीक यांच्या पक्वतेच्या कालावधीमध्ये किमान २० ते ३० दिवसांचे अंतर असावे, ज्यामुळे दोन्ही पिकांच्या वाढीच्या अवस्था भिन्न राहून पाणी, अन्नद्रव्यांचा योग्य वापर होतो. जर आंतरपीक कमी कालावधीचे असेल तर ते लवकर परिपक्व होऊन काढणी होते.
  •  मध्यम खोल जमिनीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. मध्यम खोल जमिनीची खोली ४५ ते ६० सेंमी आणि उपलब्ध ओलावा ८० ते ९० मिलिमीटर आहे, अशा जमिनीमध्ये ज्चारी आणि करडई ६:३ याप्रमाणे अांतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये मुख्य पिकाचे प्रमाण हे ६७ टक्के; तर अांतरपिकाचे प्रमाण ३३ टक्के असते.
  •  जेव्हा जमीन मध्यम खोल प्रकारची असून, तिची खोली ६० ते ९० सें.मी. आणि उपलब्ध ओलावा १४० ते १५० मिलिमीटर असतो, तेव्हा करडई आणि हरभरा ४:२ किंवा ६:३ आणि ज्वारी आणि करडई ६:३ याप्रमाणात पेरणीचे नियोजन करावे.
  •  मुख्य पिकांच्या पेरणीसोबत आंतरपिकाची पेरणी करता येते. जेव्हा पेरणी ही पेरणी यंत्राच्या साहाय्याने केली जाते त्या वेळेस ज्या ओळीच्या प्रमाणात पेरणी करावयाची आहे त्याप्रमाणे पेरणी यंत्रामध्ये नियोजन करून आपणास पेरणी करता येते. मुख्य पिकांच्या पेरणीनंतर लगेच दोन ओळींमध्ये अांतरपिकाची पेरणी करता येते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रकक्रिया करावी.
  •  वेळेवर मशागत आणि पेरणी केल्यास उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर होऊन पिकांची चांगली वाढ होते. शिफारशीत जातींची निवड करावी. पेरणी योग्य खोलीवर करावी. जेणेकरून बियाणे योग्य ओलीवर पडेल. पेरणी करताना खते बियाणांच्या खाली खोलवर पेरून द्यावीत. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो. संरक्षित सिंचन आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा. दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर द्यावे. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात असताना द्यावे.
  •  खत व्यवस्थापन ः आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य पीक व अांतरपीक यांच्या खताचे व्यवस्थापन एकत्र किंवा वेगवेगळे करता येते. जेव्हा दोनही पिकांची खत मात्रा सारखीच असते तेव्हा सरसकट एकच खताची मात्रा दोनही पिकांना द्यावी. जेव्हा दोनही पिकांची खत मात्रा वेगवेगळी असते त्या वेळेस प्रत्येक पिकाच्या ओळीमध्ये क्षेत्रफळाच्या प्रमाणात खत मात्रा द्यावी. खतमात्रा देताना खते पेरते वेळेस सुरवातीस जमिनीत खोल पेरून घ्यावीत.
  •  मुख्य पिकांच्या सुरवातीच्या हळुवार वाढीच्या अवस्थेमध्ये दोन ओळींमध्ये आपण जे अंतरपीक घेतो ते आंतरपीक तणांच्या वाढीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण करते. त्यामुळे वेगळ्या उपाययोजनांची आवश्‍यकता नसते; परंतु आंतरपीक २० ते २१ दिवसांचे झाल्यावर १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन कोळपण्या कराव्यात.
  •  पर्यायी सिंचनव्यवस्था असेल किंवा शेततळे असते त्या वेळी संरक्षित सिंचन द्यावे. सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  •  ज्वारी ः मालदांडी ३५-१, स्वाती, एसपीव्ही ८३९, एसपीव्ही ६५५, यशोदा, परभणी मोती, परभणी ज्योती.
  •  करडई  ः भीमा, शारदा, तारा, एन ६२-८, पीबीएनएस १२, पीबीएनएस ४०, पीबीएनएस ८६.
  •  हरभरा ः  विजय, विशाल, बीडीएन ९-३, बीडीएन ७९७, आयसीसीव्ही २, जी १२
  •  ज्वारी आणि करडई ६:३ पेरणी ः  ७ ते ७.५ किलो ज्वारी आणि ३.५ ते ४ किलो करडई.  करडई आणि हरभरा ४:२ किंवा ६:३  पेरणी ः ८ ते ८.५ किलो करडई आणि ३२ किलो हरभरा.

    ः डॉ. मेघा जगताप ः ७५८८५७१०५५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com