हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण

हरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते. घाटे अळीच्या अवस्था ः अंडी - अळी - कोष – पतंग प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये :

  • विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव. मात्र, घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव जास्त नुकसान कारक ठरतो.
  • हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ४० टक्के पर्यंत आढळतो.
  • साधारणतः एक अळी ३० - ४० घाट्याचे नुकसान करते.
  • काबुली हरभऱ्यावर देशी वाणापेक्षा घाटे अळीचा अधिक प्रादुर्भाव आढळतो.
  • टपोऱ्या देशी वाणावर लहान दाण्यांच्या वाणापेक्षा घाटेअळीचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
  • दाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
  • घाटेअळी एकात्मिक कीड नियंत्रण :

  • उन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी, त्यामुळे किडीचे कोष उघडे पडतात. पक्षी ते वेचून खातात. यासाठी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी चार-पाच दिवस आधी सकाळी लवकर थोडा भात शिजवून शेतात रिकाम्या जागी धुर्यावर विखरून टाकावा.
  • पक्षी थांबे एकरी १० ते २० प्रमाणात लावावेत किंवा पेरतेवेळी ज्वारी किंवा मक्‍याचे दाणे टाकावे. याकडेही पक्षी आकर्षित होतात. त्यावर बसून पक्षी अळ्यांचा फडशा पाडतात.
  • शिफारशीत आणि रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे, तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
  • घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी गंधसापळ्यांचा वापर करावा.
  • हरभरा पिकात आंतरपीक किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.
  • मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
  • वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव दिसताच, निंबोळीअर्क ( ५%,) किंवा अॅझाडीरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी.
  • जैविक कीटकनाशक एचएएनपीव्ही हेक्टरी ५००एल.ई म्हणजेच ५०० मिली विषाणू प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळावे. त्यामध्ये ५०० मिली चिकटद्रव्य आणि ५० ग्रॅम उत्तम दर्जाची नीळ टाकून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
  • बिव्हेरिया बॅसियाना (१ टक्के विद्राव्य) ३ किलो प्रति हेक्टरी प्रति ५००लिटर पाणी किंवा ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी १) क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा २) ईमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा ३) डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मिली. किंवा ४) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १.२५ मिली किंवा ५) क्लोरअँन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा ६) फ्लूबेंडीअमाईड (४८ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा ७) क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मिली. (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागात वाय. बी. मात्रे, आर. बी. डाके हे पी. एचडीचे विद्यार्थी असून, डॉ. डी. आर. कदम हे सहयोगी प्राध्यापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com