agricultural stories in Marathi, agrowon, KHAPALI WHAET (Triticum dicoccum) SOWING TECHNIQUE | Agrowon

खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्र

डॉ. व्ही. एस. बाविस्कर, डॉ. यशवंतकुमार के. जे., ए. एम. चव्हाण
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

गेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली. मात्र, खपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य तंत्राचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. पोषक घटकामुळे अन्य गहू जातींच्या तुलनेमध्ये दरही बऱ्यापैकी चांगला मिळतो.

गेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू लागवड कमी होत गेली. मात्र, खपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य तंत्राचा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते. पोषक घटकामुळे अन्य गहू जातींच्या तुलनेमध्ये दरही बऱ्यापैकी चांगला मिळतो.

भारतामध्ये ब्रेड/चपाती किंवा शरबती (Triticum aestivum), बन्सी गहू (Triticum durum), व खपली गहू (Triticum dicoccum) या तीन प्रकारच्या गव्हाची लागवड होते. त्यातील ९५ टक्के वाटा हा शरबती गव्हाचा आहे. खपली गव्हाखाली भारतात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात खपली म्हणून ओळखला जाणारा हा गहू गुजरातेत ‘पोपटीया’ तर कर्नाटकात ‘सांबा’ म्हणून ओळखला जातो. काहीजण याचा ‘जोडगहू’ असाही उल्लेख करतात. या खपली गव्हाचे नवीन रोग प्रतिकारक व अधिक उत्पादनक्षम वाण विकसित करण्यासाठी अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प सुरू आहेत. त्यात पुणे येथील आघारकर संशोधन संस्था, धारवाड कृषी विद्यापीठ, कर्नाटक या ठिकाणी संशोधन केले जात आहे.

खपली गव्हातील पोषकता व उपयुक्तता :

 • खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ती वाढविणारा आहे.
 • खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्टता इत्यादी आजारांवर उपयुक्त असून, पाचक पदार्थ (१६ टक्के fibers), प्रथिने (१२ ते १५ टक्के) व कर्बोदके (७८ ते ८३ टक्के) व ग्लोसेमिक इंडेक्‍स कमी असतो. हा इंडेक्स अधिक असलेले पदार्थ मधुमेही रुग्णांसाठी अपायकारक मानले जातात.
 • यामुळे हाडांची झीज भरून येते, दातांच्या तक्रारी कमी होतात.
 • पचावयास हलका असून, चपाती बनवण्यासह थंडीत खीर करून अथवा भाज्या घालून तिखट उपीट करून खाता येतो.
 • उत्कृष्ट प्रतीचा रवा, शेवया, पास्ता, कुरड्या, बोटुकली असे पदार्थ बनवता येतात.
 • एक क्विंटल खपलीपासून सत्तर किलो गहू निघतो.
 • खपली गहू तांबेरा रोगप्रतिकारक आहे. 
 • काळी, कसदार तसेच हलक्या, चोपण जमिनीमध्ये लागवड करता येते.
 • उशिरा पेरणीसाठी खपली गव्हाच्या जातीची निवड शक्य आहे, कारण या जाती वाढणारे तापमान सहन करू शकतात. 
 • महाराष्ट्रामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात परिसरात खपली गव्हाचा पेरा वाढत आहे. राज्यातील अनुकूल वातावरणामुळे अन्य ठिकाणीही खपली गहू लागवडीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

हवामान :
खपली गव्हास रात्री थंड आणि दिवसा कोरडे हवामान लागते. यात ९०-१०० दिवस थंडीचे असावेत. जास्त पावसात खपली तग धरू शकत नाही. ढगाळ हवामानात कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. खपली गव्हास साधारण १० अंश ते २३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. तापमान थोडे वाढले तरी खपली गहू ते सहन करू शकतो. पाण्याचा ताणही काही प्रमाणात खपली सहन करू शकते.

जमीन :
खपली गहू काळ्या व कसदार जमिनीत चांगला येतो. तसेच हलक्या व चोपण जमिनीमध्येही लागवड करता येते. चांगल्या निचऱ्यांची जमीन निवडावी. पीक लोळत नाही. क्षारपड जमिनीमध्ये खपली तग धरू शकते. चांगल्या उत्पादनासाठी मातीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा.

पूर्वमशागत :
पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलपर्यंत जातात, त्यामुळे जमिनीची चांगली मशागत गरजेची आहे. लोखंडी नांगराने किंवा ट्रक्टरने १५ ते २० सेंमी. खोलवर जमीन नांगरावी. ३ ते ४ वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. मशागतीनंतर आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करावी.

भरखते व जोरखते व्यवस्थापन :
हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या शेणखत/कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत २ टन प्रती हेक्टर कुळवाच्या पाळीने मिसळावे.
६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. जोरखते देण्यापूर्वी माती परीक्षण करूनच खताचे प्रमाण निश्चित करावे.

बियाणे व बीजप्रक्रिया :
बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. १ हेक्टर पेरणीसाठी १०० किलो बियाणे वापरावे. टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी ४० ते ५० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर + २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी.

एम.ए.सी.एस. २९७१
आघारकर संशोधन संस्थेने २००९ साली एम.ए.सी.एस. २९७१ ही खपलीची अधिक उत्पन्न देणारी, बुटकी जात प्रसारित केली आहे. या जातीच्या लागवडीची शिफारस महाराष्ट्र, कर्नाटक या भागासाठी वेळेवर पेरणीसाठी करण्यात आली आहे.

पेरणीपूर्वी अशी करा उगवण क्षमतेची चाचणी :
खपली गव्हाची पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासताना १०० दाणे ओल्या गोणपाटावर रांगेमध्ये ठेवावे व गोणपाट झाकून ठेवावे. त्यास रोज सकाळी गोणपाट ओलसर होईपर्यंत पाणी मारावे. ४-५ दिवसांनी गोणपाट उघडून मोड आलेले दाणे/बिया मोजाव्यात त्या वरून बियाणे उगवण क्षमतेचा अंदाज घ्यावा.

पेरणी :

 • जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवून पेरणी करावी.
 • बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.
 • पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी, त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळून उत्पादनात वाढ होते.
 • उभी आडवी पेरणीऐवजी एकेरी पेरणी केल्यास आंतरमशागत सुलभ होते.
 • पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्राने करावी. पेरणीबरोबरच रासायनिक खतेही देता येतात.
 • जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ४.० मीटर रूंदीचे व ७ ते २५ मीटर लांब सारे पाडावेत. उताराला आडव्या दिशेने पाट पाडावेत. पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण चांगली होते.
 • टोकण पद्धतीने सरी वरंबा पद्धत वापरावी. बियाणे टोकन करताना वरंबा उतारावर टोकण करावी.

एकात्मिक तणनियंत्रण :
१) खपली गहू पीक पेरणीपासून ३० ते ४५ दिवस तणविरहीत ठेवावे. अन्यथा ३० ते ३५ टक्के उत्पन्नात घट येते. त्यासाठी १ ते २ खुरपण्या ४५ दिवसांपर्यंत कराव्यात.
२) पेरणीनंतर त्वरित पेन्डीमिथेलीन (३० % ई.सी) हे तणनाशक २.५ लिटर प्रती/हेक्टर ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत ओलावा असताना फवारावे.
३) पीक ३० दिवसांचे झाल्यावर १ खुरपणी करून घ्यावी किंवा कोळपणी करावी.
४) जरुरी प्रमाणे मोठी रुंद पानाची तणे हाताने उपटून किंवा विळ्याने कापून काढावीत.
५) खुरपणी शक्य नसेल तर रुंद पानाच्या गवताच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर तीस दिवसांनी २,४-डी सोडियम हे तणनाशक प्रतिहेक्टरी १.२ किलो ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तणनाशक फवारताना दोन ओळीमध्ये जमिनीत ओलावा असावा.
पाण्याचे व्यवस्थापन : जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने खपली गहू पिकाच्या विविध अवस्थेत पाणी द्यावे.

खपली गहू पीकवाढीच्या संवेदनशील अवस्था
पीकवाढीची संवेदनशील अवस्था ः पेरणीनंतर दिवस
मुकूटमुळे फुटण्याची अवस्था ः १८ - २१
फुटवे जास्तीत जास्त येण्याची अवस्था ः ३० - ३५
कांडी धरण्याची अवस्था   ः ४५ - ५०
पीक फुलात असतानाचा काळ ः  ६५ - ७०
दाण्यात दुधाळ चीक अवस्था    ः ८० - ८५
दाणे भरताना अवस्था ः ९० - ९५

वरील अवस्थांपैकी मुकूटमुळे अवस्था, फुटवे, फुटव्याची अवस्था, फुलोरा आणि दुधाळ अवस्था या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या काळात पाण्याच्या पाळ्या अावश्‍य द्याव्यात.
दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत पिकास पाणी देऊ नये. त्यामुळे पिक लोळण्याची व बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता असते, अशा लोळलेल्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
सिंचनाची उपलब्धता कमी असल्यास पाणी पाळ्याचे नियोजन खालीलप्रमाणे करावे.

ओलिताची उपलब्धता  पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीपासून दिवसांनी)
एक ओलिताची सोय  ः ४२
दोन ओलिताची सोय  ः २१, ६४
तीन पाण्याच्या पाळ्याची सोय असल्यास ः  २१, ४२, ६५
चार पाणी पाळी शक्य असल्यास  ः २१, ४२, ६५, ९५

अधिक उत्पन्न व गुणवत्तेसाठी,
खपली फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असताना (३० दिवसांनी) १९:१९:१९ हे मिश्रखत ७० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
खपली दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना युरिया (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

डॉ. व्ही. एस. बाविस्कर ; ८३७४१७४७९७
(कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.)


इतर तृणधान्ये
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरीअलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण...
उशिरा पेरणीसाठी योग्य गहू जातींची निवडराज्यामध्ये परतीचा पाऊस दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रखपली गव्हाच्या सुधारित रोग प्रतिकारक जाती, योग्य...
नियंत्रण भातावरील दाणे रंगहीनता रोगाचे...सध्या पाऊस कमी झाला असून अति दमट व उष्ण हवामान...
बागायती गहू लागवडीची सूत्रेगव्हाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असताना दक्षिणोत्तर...
रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजनरब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक...
भातसल्ला (कोकण विभाग)पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...
जमिनीच्या प्रकारानुसार वापरा ज्वारी वाणराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
रब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रमहाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने कोरडवाहू...
रब्बी ज्वारीसाठी करा मुलस्थानी जलसंधारणरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे...खरीप भात पिकांमध्ये सातत्याचे ढगाळ व दमट वातावरण...
भातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे...उष्ण - दमट हवामान, जास्त आर्द्रता, भात खाचरातील...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रेज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास...
शेतकरी नियोजन : भात शेतीत सेंद्रिय कर्ब...शेतकरी नियोजन शेतकरी ः नितीन चंद्रकांत गायकवाड...
खरीप ज्वारी लागवडीची सूत्रेअन्न आणि चारा उत्पादनासाठी महत्त्वाचे अन्नधान्य...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
भात पिकासाठी सुधारित लागवड व्यवस्थापनभारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पिकक्षेत्रापैकी...