पशुपालनाने दिला शेतीला आधार

पशुपालनाने दिला शेतीला आधार
पशुपालनाने दिला शेतीला आधार

परभणी जिल्ह्यातील सायाळा (खटिंग) या गावातील अनसूयाबाई खटिंग आणि सरस्वती पांडुरंग खटिंग या सासू-सुनेच्या जोडीने महिला बचत गटाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक प्रशिक्षणही घेतले. त्यामुळे दुग्ध व्यवसायात सुधारणा करता आली. शेतीपूरक व्यवसायामुळे वर्षभर पर्यायी उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. शेणखतामुळे जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादनातही वाढ मिळत आहे. सरस्वती खटिंग यांचे माहेर परभणी शहराजवळील खानापूर हे गाव. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह सायाळा (खटिंग) येथील पांडुरंग खटिंग यांच्याशी झाला. खटिंग कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळे त्यांच्याकडे सहा एकर शेती राहिली. लग्नानंतर सरस्वती या घरकाम करून शेतातील कामे करत असत. परंतु पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. त्या अनुषंगाने मुक्त विद्यापीठाचा बी.ए. पदवी अभ्यासक्रमास २००० मध्ये पूर्ण केला. २००४ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांतर्गत सायाळा गावात महिला बचत गटाची स्थापना झाली. सरस्वती खटिंग यांच्या सासू अनसूयाबाई या वसुंधरा महिला बचत गटांच्या सदस्य झाल्या. सरस्वती खटिंग यांच्या पुढाकारातून १० मार्च, २०१० रोजी कृष्णाई महिला बचत गट स्थापन करण्यात आला. एकूण बारा सदस्य असलेल्या या गटाचे महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेमध्ये खाते उघडण्यात आले. प्रतिसदस्य दरमहा ११० रुपये बॅंकेतील बचत गटांच्या खात्यावर जमा केले जात होते. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर बॅंकेने या महिला बचत गटाला पन्नास हजार रुपये कर्ज दिले. पशुपालनाची दिली जोड

  • खटिंग यांच्या शेतीमध्ये सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची प्रामुख्याने लागवड केली जाते. या कोरडवाहू क्षेत्रातून जेमतेम उत्पादन मिळायचे. तसेच पीक उत्पादनाची शाश्वती नसायची. परंतु महिला गटामुळे पैशाची बचत होऊ लागली. गटांचा व्यवहार लक्षात घेऊन बॅंक व्यवसायासाठी कर्ज देण्यास तयार झाली. परभणी शहरामध्ये दुधाला असलेली मागणी लक्षात घेऊन सरस्वती खटिंग यांनी म्हैसपालन करायचे ठरविले. उपलब्ध लागवड क्षेत्रात चारा लागवडीचे नियोजन केले. पशुपालनामुळे शेतीला पुरेसे शेणखतही उपलब्ध होणार होते.
  • सन २०१४ मध्ये बचत गटाच्या माध्यमातून खटिंग यांनी बॅंकेकडून पन्नास हजार रुपये कर्ज घेतले. दुग्ध व्यवसायासाठी ४५ हजारांची गावरान म्हैस विकत आणली. परंतु पंधरा दिवसांत साप चावल्यामुळे ही म्हैस दगावली. या म्हशीला वगार होती. तिचा सांभाळ करायचा असे त्यांनी ठरविले. परंतु दुग्ध व्यवसायासाठी म्हैस खरेदी करण्यासाठी परत त्यांना पन्नास हजार रुपये कर्ज काढावे लागले. उपलब्ध रकमेतून त्यांनी जाफ्राबादी म्हैस विकत आणून दुग्ध व्यवसायास सुरवात झाली. २०१४ मध्ये खटिंग या परभणी शहरात दररोज दहा लिटर दुधाची विक्री करायच्या. त्या वेळी प्रति लिटर ३५ ते ४० रुपये असा दर मिळायचा. दुग्ध व्यवसायामुळे खटिंग कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडू लागली. आर्थिक बचतही सुरू झाली. कर्जाची परतफेड करताना दरवर्षी त्यांनी एक नवीन म्हैस विकत घेण्याचे नियोजन केले. पाण्याच्या उपलब्धतेसाठी कूपनलिकाही घेतली.
  • दुग्ध व्यवसायाचे घेतले प्रशिक्षण म्हशींचे योग्य व्यवस्थापन कळण्यासाठी सरस्वती खटिंग यांनी भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे (आर- सेटी) दुग्ध व्यवसाय प्रशक्षिण घेतले. या प्रशिक्षणामध्ये खटिंग यांना दुधाळ जनावारांसाठी पोषण आहार, लसीकरण, वर्षभर दूध उत्पादनात सातत्य राखण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन आदी बाबींची माहिती मिळाली. चाऱ्याचे नियोजन गाई, म्हशींचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी योग्य प्रमाणात हिरवा आणि सुका चारा तसेच खुराकावर लक्ष दिले जाते. विविध धान्यांचा भरडा, सरकी पेंड दिली जाते. पेंडीसोबत गूळ दिला जातो. पोषक आहारामुळे दुग्धोत्पादनात वाढ होते. यंत्राद्वारे कडब्याची कुट्टी करून गाई, म्हशींना दिली जाते. यामुळे चाऱ्याची बचत होते. गाई, म्हशींना पिण्याच्या पाण्यासाठी हौदाची व्यवस्था आहे. दररोज गोठ्याची स्वच्छता केली जाते. त्यामुळे गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहाते. स्वच्छ दूधनिर्मिती होते. गाई, म्हशींचे व्यवस्थापन ः

  • सध्या नऊ म्हशी, एक संकरित गाय आणि एक लालकंधारी गाय. नऊ पैकी चार म्हशी दुधात आहेत. तसेच एक गाय दुधात आहे. वर्षभर दुधाचे रतीब चालू ठेवणे सोपे होण्यासाठी दुधाळ आणि भाकड म्हशीच्या कालावधीचे नियोजन.
  • दररोज सकाळ, संध्याकाळचे मिळून ४० लिटर दुधाची विक्री.
  • परभणी शहरातील नागरिकांना दुधाचे महिनावारी रतीब. प्रतिलिटर ६० रुपये दराने विक्री. गाईचे दूध डेअरीला दिले जाते. गाईच्या दुधाला प्रतिलिटर २८ ते ३० रुपये दर मिळतो.
  • सरस्वती खटिंग या म्हशींना चारा, पाणी देणे, गाई, म्हशी तसेच गोठ्याची स्वच्छता, दुधाची विक्रीपूर्व साठवण आदी कामे करतात. गाई, म्हशींची धार काढणे आणि परभणी शहरात दुधाची विक्री ही कामे पांडुरंग खटिंग करतात. अनसूयाबाई या शेतीकामाचे नियोजन करतात.
  • मागणीनुसार दुधापासून तूप, पनीरनिर्मिती. तूप ६०० रुपये आणि पनीर ३०० रुपये किलो दराने विक्री.
  • दुधाचे महिनावार रतीब असल्यामुळे दर महिन्याला रोखीने पैसे येतात. या पैशांची म्हैस खरेदीत गुंतवणूक.
  • अनसूयाबाई यांनी बचत गटाच्या माध्यमातून ७५ हजार रुपये कर्ज काढून संकरित गाय खरेदी केली. या गाईच्या दूध विक्रीतून दिवसाचा किरकोळ खर्च भागविला जातो.
  • बचत गटांमुळे कुटुंबाची प्रगती ः

  • अनसूयाबाई खटिंग या सुरवातीपासून महिला बचत गटाच्या सदस्य होत्या. त्यानंतर सरस्वती खटिंग यादेखील महिला बचत गटाच्या सदस्या झाल्या. पांडुरंग खटिंग हेदेखील गावातील पुरुष बचत गटाचे सदस्य आहेत. त्यामुळे महिन्याला कुटुंबाची ८१० रुपये बचत होते. बचत गटांमुळे बॅंकेचे व्यवहार समजले. निर्णयक्षमता वाढली. बॅंकांनी कर्ज दिल्यामुळे दुग्ध व्यवसाय सुरू करता आला. घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यामुळे बॅंकेने परत कर्ज दिले. त्यामुळे दुग्ध व्यवसायाचा विस्तार होऊ लागला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक नीता अंभोरे, सहयोगिनी निर्मला ढवळे, सहयोगिनी मंदाकिनी सोमोशे, कुशावर्त जंगले आणि माणिकराव खटिंग यांचे सरस्वती खटिंग यांना मार्गदर्शन मिळते.
  • खटिंग यांना दरवर्षी १०० बैलगाड्या शेणखत मिळते. हे शेणखत स्वताच्या चार एकर शेतीमध्ये मिसळले जाते. शेणखतामुळे जमीन सुपीक होत आहे. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होत आहे. रासायनिक खतामध्येदेखील बचत झाली. येत्या काळात खटिंग यांनी गांडूळखत निर्मितीचे नियोजन केले आहे. पशुपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खटिंग यांनी घराचे बांधकाम केले. पांडुरंग खटिंग यांनी शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर घेतला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची अर्ध्या हिश्शाने शेती करायला घेतली आहे. यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ झाली. खटिंग यांची मुले करण आणि अर्जुन शिक्षण घेत आहेत. गावात आशा वर्कर म्हणूनदेखील सरस्वती खटिंग काम पाहतात.
  • संपर्क ः सरस्वती खटिंग ः ८४११८४५३२४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com