फळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापन

फळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापन
फळबागेचे पावसाळ्यातील खत व्यवस्थापन

आंबा व पेरू अशा बहुवार्षिक फळपिकांमध्ये दरवर्षी दर्जेदार आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करणे आवश्यक असते. खत व्यवस्थापनाच्या शिफारशी आणि द्यावयाची वेळ यांची माहिती घेऊ. आंबा ः आंबा फळपिकांसाठी भारी प्रतीची, १.५-२ मी. खोलीची जमीन उपयुक्त ठरते. त्याची मुळे खोलवर जाऊन जमिनीमधील वेगवेगळ्या स्तरांतून अन्नद्रव्ये घेत असतात. त्यासाठी जमिनीमध्ये मुबलक (आवश्‍यक) प्रमाणामध्ये अन्नद्रव्ये असल्यास उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. आंबा फळझाडामध्ये फुलोरावस्था, फळधारणा, फळविकास व फळांची काढणी या साधारणतः ९०-१०० दिवसांमध्ये अन्नद्रव्यांची गरज पूर्ण व्हावी लागते. त्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडांना पावसाळ्यात साधारणतः जुलै महिन्यात प्रतिवर्षी ५० किलो शेणखत द्यावे. त्यासोबत ७५० ग्रॅम नत्र (१६३० ग्रॅम युरिया), ५०० ग्रॅम स्फुरद (१०८६ ग्रॅम डी.ए.पी.) व ५०० ग्रॅम पालाश (८३३ ग्रॅम एम.ओ.पी.) द्यावे. नत्र खताचा पुढील हप्ता ७५० ग्रॅम नत्र (१६३० ग्रॅम युरिया) सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्यात द्यावा. खत देण्याची पद्धत - खतांची मात्रा देताना झाडाच्या मुख्य खोडाभोवती ३० सें.मी. अंतरावर गोलाकार १५-२० सें.मी. खोलीपर्यंत छोटा चर खोदून घ्यावा. त्यात वरील प्रमाणात बांगडी पद्धतीने खताची मात्रा द्यावी. त्यावर त्वरित १-२ सें.मी. मातीचा थर टाकून हलक्‍या स्वरूपाचे पाणी द्यावे, त्यामुळे अन्नद्रव्यांचे बाष्पीभवन किंवा निचरा स्वरूपातून ऱ्हास होणार नाही. पेरू ः हे फळपीक बहुवार्षिक असून, त्याला वर्षभर फुले येत असतात. परंतु, फळांच्या योग्य आकारासाठी, गुणवत्तेसाठी बहर धरणे आवश्यक असते. अशा प्रकारे एकाच वेळी फळे काढणीला आल्याने त्याचे नियोजन सोपे होते.

  • पेरूची अभिवृद्धी बियांपासून केलेल्या रोपांची लागवड केल्यास उत्तम दर्जाची फळे मिळण्यासाठी साधारणतः ४-५ वर्षे लागतात. मात्र, शाखीय पद्धतीने, कलमांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास २ ते ३ वर्षांतच फळधारणा होते.
  • पेरूमध्ये फळे येण्यासाठी एकच बहर धरणे गरजेचे असते, त्यासाठी पाण्याचे व खताचे व्यवस्थापन योग्य रीतीने करावे.
  • पूर्ण वाढ झालेल्या पेरूच्या प्रतिझाडासाठी २०-२५ किलो शेणखत, ४५० ग्रॅम नत्र (९७८ ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फुरद (६५२ ग्रॅम डी.ए.पी.) आणि ६०० ग्रॅम पालाश (५०० ग्रॅम एम.ओ.पी.) बहराच्या वेळी म्हणजे मृग नक्षत्रात (पावसाळ्यात) द्यावे. तसेच, ४५० ग्रॅम नत्र (१७८ ग्रॅम युरिया) प्रतिझाडास फळधारणेनंतर दुसऱ्या हप्त्यात द्यावा.
  • खतांची मात्रा देताना मुख्य खोडाभोवती ३० सें.मी. त्रिज्येच्या अंतरावर १५-२० सें.मी. खोलीवर बांगडी पद्धतीने माती खोदावी. त्यात खतांची मात्रा देऊन खत २-३ सें.मी. मातीच्या साह्याने मातीआड करावे. खताची मात्रा दिल्यानंतर त्वरित हलक्‍या स्वरूपात पाणी द्यावे.
  • दर्जेदार पेरू उत्पादनासाठी विद्राव्य खतांची फवारणीही फायदेशीर ठरते.
    1. पेरूसाठी १% युरियाची फवारणी केल्यास किफायतशीर ठरते. (१० ग्रॅम युरिया प्रतिलिटर पाणी) - वर्षातून २ वेळा - पहिली फवारणी मार्च महिन्यात, तर दुसरी फवारणी ऑक्‍टोबर महिन्यात केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
    2. यासोबत माती परीक्षणामध्ये कमतरता आढळल्यास ०.५% झिंक (जस्त) फवारणी करावी. (५ ग्रॅम झिंक सल्फेट प्रतिलिटर पाणी)
    3. पेरू झाडामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे दिसतात. त्यावर लक्ष ठेवून खतांचे नियोजन करावे. साधारणतः नवीन पालवी येणे, फुले येण्याची वेळ, तसेच फळधारणा या वेळी प्रतिलिटर पाण्यामध्ये प्रत्येकी ५ ग्रॅम प्रमाणात झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगेनिज सल्फेट किंवा कॉपर सल्फेट यांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

    - डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (डॉ. साबळे हे सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात येथे उद्यानविद्या विभागात सहायक प्राध्यापक आहेत, तर सुषमा सोनपुरे या कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आचार्य पदवी विद्यार्थिनी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com