औषधी करटोली

औषधी करटोली
औषधी करटोली

१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex. Wild २. कुळ :- Cucurbitaceae ३. स्थानिक नाव : करटोली/करटुली/कंटोली/रानकारली ४. इंग्रजी नाव : Teasle gourd/ Kakrol/Spine gourd/Wild karela ५. हिंदी नाव : ककोरा/पारोरा/गुलबन्द्र ६. संस्कृत नाव : ककोंटकी ७. अभिवृद्धी : कंद, बिया ८. वापर : भाजी आढळ : करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, धुळे, पुणे व विदर्भात काही जिल्ह्यांतील जंगलामध्ये करटोली आढळून येते. डोंगराळ भागात आपोआप वर्षानुवर्षे येणारी ही वेलवर्गीय भाजी आहे. करटोलीची कोवळी डिरे आणि कोवळी फळे भाजी करण्यासाठी योग्य असतात. काही भागांत साधारण पावसाळ्याच्या सुरवातीला (मे-जून) करटोलीचे कोवळी डिरे रानातून भाजी करण्यासाठी आणली जाते. फळे ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये पुणे, मुंबईतील बाजारपेठेत चांगल्या दराने विकली जातात. करटोलीचे वेल बांधावर, काटेरी झुडपांवर चांगले वाढतात. अलीकडे शेतकरी कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी करटोलीची काही प्रमाणात शेतात लागवड करत आहेत. वनस्पतीची ओळख :

  • करटोली हा वर्षायू वेल असून, जंगलामध्ये मोठ्या काटेरी झुडपांवर वाढलेली आढळते. कंद बहुवर्षायू असून खोड नाजूक आणि आधाराने वाढणारे आहे. पाने साधी, एका आड एक, रुंद हृदयाकृती, ३ ते ९ सें.मी. लांब, ३ ते ८ सें.मी. रुंद असून, पानांच्या कडा दातेरी असतात. पानाचा देठ १.२ ते ३ सें.मी. लांब असतो.
  • फुले पिवळी, नियमित, एक लिंगी, नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. फुले पानांच्या बगलेतून एकांडी येतात. लागवड केलेल्या क्षेत्रात फळधारणेसाठी १० टक्के नर वेलांची संख्या आवश्यक असते. लागवड कंद, बिया व फाटे कलम यांच्यापासून केली जाते.
  • करटोलीच्या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. नर आणि मादी वेल फुलांवरून सहज ओळखता येतात. मादी फुलांच्या पाकळ्यांखाली खडबडीत गाठीसारख्या आकाराचा बीजांडकोश असतो तर नर फुलांत अशी गाठ नसते. पुष्पकोष ५ संयुक्त दलांचा असून, बीजांड कोष एकमेकांस चिकटलेले असतात. ५ पाकळ्या व ५ पुंकेसर असते. फळे लंब गोलाकार ५ ते ७ सें.मी. असून, फळांवर नाजूक काट्याचे आवरण असते. आत १५-२० बिया पांढऱ्या गरात लगडलेल्या व पिकल्यावर करड्या रंगाच्या होतात.
  • औषधी गुणधर्म :

  • करटोलीच्या फळात प्रथिने ३.१ टक्के, पिष्टमय पदार्थ ७.७ टक्के, स्निग्ध पदार्थ १ टक्का , ३ टक्के तंतुमय पदार्थ, १.१ टक्का क्षार याशिवाय ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते, तसेच करटोलीच्या कंदात, बियात आणि फळात औषधी गुणधर्म आहेत.
  • करटोलीची भाजी मधुमेही रुग्णांना उपयुक्त असते. हाड मोडल्यास ही फळे आणि पाने दुखापत झालेल्या जागी बांधल्यास आराम पडतो.
  • करटोलीच्या स्त्री जातीच्या वेलीचे कंद औषधात वापरतात. कंद लंब, गोलाकार असून, पिवळट-पांढरे असून, चवीला तुरट असतात.
  • करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा रस, मिरी, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात.
  • कंदाचे चूर्ण मधुमेहात देतात. डोक्याचा त्रास, मूतखडा, सर्व प्रकारच्या विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात.
  • करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत, रक्तस्राव थांबविण्यास उपयोगी आहेत. पाने ताप, बुद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका दाह, उचकी, मूळव्याध यात गुणकारी आहे. अति लाळ सुटणे, रक्तरोग, डोळ्यांचे रोग, वात, मूत्रस्राव या विकारांत करटोलीचा वापर करतात.
  • कोवळी फळे पुटकुळ्यांवर घासतात. तर भाजलेल्या बिया त्वचारोगावर उपयोगी आहेत. वाळविलेल्या फळाचे चूर्ण नाकपुडीतील विपुल स्रावासाठी उपयुक्त आहे.
  • करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
  • पाककृती १ : करटोलीच्या कोवळ्या डिरांची भाजी साहित्य : २ जुड्या करटोलीचे कोवळी डिरे, २-३ बारीक चिरलेले कांदे, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, फोडणीसाठी जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ व कोथिंबीर. कृती : पानाच्या बगलेतून निघणारे तंतू प्रथम काढून टाकावेत व करटोलीचे कोवळे डिरे स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून घ्यावेत. कढईत तेल गरम करून जिरे-मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा व लसूण लालसर परतून घ्यावा. नंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, हळद, धनेपूड घालून परतून घ्यावे. त्यात करटोलीची कापलेली डिरे टाकून शिजवून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ मिसळावे. कोंथिबीर वरून पसरावी. टीप : पावसाच्या सुरवातीपासून १५ दिवसांनी करटुलीची कोवळी डिरे जंगलात दिसू लागतात. पाककृती २ : करटोलीच्या कोवळ्या फळाची भाजी साहित्य : २५० ग्रॅम करटोलीचे कोवळी फळे, ३-४ बारीक चिरलेले कांदे, ४-५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा हळद, १-२ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, ३-४ चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे कोथिंबीर, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी. कृती : प्रथम करटोलीची फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्याच्या गोल गोल कापा करून बिया काढून टाकाव्या. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी देऊन कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत शिजवून घ्यावा. नंतर त्यात हळद, हिंग, लाल मिरची पावडर, शेंगदाणा कूट आणि करटोलीचे काप टाकून चांगले परतवून घ्यावे. चवीपुरते मीठ टाकून झाकण ठेवून मऊ होईपर्यत शिजवून घ्यावे. वरून थोडी कोंथिबीर टाकावी. टीप : ही भाजी १-२ पिकलेली करटोलीची फळे घालून करावी अतिशय चविष्ट लागते. संपर्क ः अश्विनी चोथे - ७७४३९९१२०६ (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com