रोपवाटिका उद्योगात उत्तम संधी

रोपवाटिका उद्योगात उत्तम संधी
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधी

कोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी नियोजन केले असल्यास स्वत:च स्वत:ची रोपे तयार करता येतात. मात्र, अनेक शेतकरी असे नियोजन करत नसल्यामुळे बाहेरून रोपे खरेदी करावी लागतात. त्याचप्रमाणे रोपवाटिकेमध्ये अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, त्याऐवजी सरळ रोपे खरेदी करण्याकडेही काही शेतकऱ्यांचा कल असतो. ही बाजारपेठ गृहीत धरून काही शेतकऱ्यांना रोपवाटिका व्यवसाय करणे शक्य आहे. त्यातून चांगले अर्थार्जन होऊ शकते.

रोपवाटिका किंवा कोणत्याही झाडाची अभिवृद्धी हे शास्त्र आणि कला यांचा संगम असतो. शेतकरी चांगल्या बियांचा सतत शोध घेऊन त्याद्वारे पीक घेत असतो. काही पिकांची पेरणी केली जाते, तर काही पिके हे रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते. त्यात फळझाडे, वनशेतीतील काही दीर्घायू झाडे यांच्या निर्मितींचे तंत्र वेगवेगळे असते. या तंत्राचा काळजीपूर्वक वापर करावा लागतो. कारण बियांपासून अभिवृद्धी करताना मूळ झाडातील गुणधर्म जसेच्या तसे येतीलच, याची खात्री राहत नाही. त्यामुल बियांपासून वाढवलेली झाडे एकसारखी वाढत नाहीत, त्यांच्या फळांच्या गुणवत्तेतही फरक जाणवतात. हे टाळण्यासाठी कलम करण्याच्या विविध पद्धती अगदी प्राचीन काळापासून वापरल्या जातात. उदा. चीनमध्ये लिची झाडावर गुटी कलम, तर भारतात कंदमुळापासून अभिवृद्धीचे तंत्र प्राचीन काळापासून अवगत आहे. रोपवाटिकेची गरज व संधी : रोपवाटिका व्यवसायमध्ये योग्य जातींचे बी आणून, त्याची रोपे तयार केली जातात. त्यांचा चांगली किंमतही मिळते. मात्र, यासाठी रोप निर्मात्यांची विश्‍वासार्हता महत्त्वाची असते. ही विश्‍वासार्हता सातत्यपूर्ण गुणवत्ता मिळवणे आणि टिकवण्यातून येत असते. उत्तम दर्जाचे रोपातून चांगले पीक आणि उत्तम उत्पादन मिळते, हे माहीत असल्याने विश्‍वासार्हता असलेल्या रोपवाटिकेतून शेतकरी चार पैसे अधिक देऊनही रोपे खरेदी करत असल्याचा अनुभव आहे. अलीकडे फळबागेखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नवीन फळझाडांची रोपे बनवणे शक्य आहे. त्याचप्रमाणे फूलझाडांची रोपांनाही चांगली मागणी असते. यात घरगुती सुशोभीकरणासाठी आणि व्यावसायिक लागवडीची असे दोन प्रकार पडतात. या दोन्हीमध्ये चांगली संधी आहे. उलट भाजीपाल्याच्या रोपांपेक्षा फळांची आणि फलांची कलमी रोपे अधिक किमतीने विकली जातात. त्यातून अधिक फायदा होतो. महाराष्ट्र आणि अन्य राज्यातूनही फळबाग लागवडीच्या विविध योजना राबवल्या जात असतात. अन्य विविध योजनांमध्येही झाडांचा समावेश असतो. उदा. रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना यासारख्या योजनांची नेमकी माहिती करून घेतल्यास त्याच्या निकषानुसार रोपे बनवणे शक्य आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण रोपवाटिकांमध्ये सातत्याने चांगली मागणी असते. रोपवाटिकेचे फायदे : १. रोपवाटिकेमध्ये काळजी घेत बसण्याऐवजी दर्जेदार रोपे उपलब्ध होऊ शकतात. २. कलमे किंवा रोपे न करता त्वरित फळबाग लावता येते. ३. रोप-कलमे निर्मितीचा वेळ, पैसा व श्रम वाचतात. ४. रोपांच्या गुणवत्तेची खात्री घेता येते. ५. दुर्मीळ कलमे सहजासहजी उपलब्ध होतात. रोपवाटिका प्रस्थापित करताना हे पाहा... १. कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयाची आहे? २. रोपवाटिकेचा कालावधी ३. उत्पादित करणाऱ्या कलमे-रोपांची संख्या ४. आवश्‍यक जमीन उपलब्धता ५. सिंचनासाठी पाणी ६. कुशल मजुरांची उपलब्धता ७. मातृवृक्ष - स्वतःकडे लागवड की बाहेरून घेणार, त्याची गुणवत्ता ८. कलमे-रोपे करण्यासाठी आवश्‍यक निवारा ९. खुंट-रोपे वाढविण्यास जागा. १०. कलम-रोपांना हार्डनिंग करणे. रोपवाटिकेचे प्रकार : १) कोरडवाहू रोपवाटिका : पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली रोपवाटिका, त्यावरच रोपाचे उत्पादन व संगोपन करण्यात येते. २) ओलिताखालची रोपवाटिका : या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध असते, त्यावर रोपाचे व कलमाचे उत्पादन व संगोपन केले जाते. कालावधीनुसार रोपवाटिका १) तात्पुरती रोपवाटिका : कमी जागेत व कमी कालावधीमध्ये रोपे तयार केली जातात. विक्री करतात. २) कायम रोपवाटिका : या रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कलमे व रोपे तयार करतात. अशा रोपवाटिका रेल्वे व रोडपासून अगदी जवळ हव्यात. त्यामुळे रोपांची व कलमांची विक्री सोयीची होते. रोपवाटिकेशी संबंधित अनुदान माहिती : राष्ट्रीय बागवानी मंडळ : प्रकल्प किमतीच्या २०% अनुदान -कर्जाशी संलग्न अनुदान- रु.२५,००,०००/- पर्यंत ४ हे. क्षेत्रासाठी. एकात्मिक बागवानी विकास अभियान :

  • ४ हेक्टर क्षेत्राची हाय-टेक नर्सरी प्रतिहेक्टर अपेक्षित खर्च रु. २५ लाख याप्रमाणे एक कोटी रु.
  • प्रकल्प किमतीच्या ४०% अनुदान उपलब्ध आहे. प्रतिरोपवाटिका कमाल रु. ४० लाख अनुदान मिळू शकते.
  • मुख्य अट : कमीत कमी ५० हजार कलमे प्रतिवर्ष प्रतिहेक्टर तयार करणे आवश्यक.
  • लघुरोपवाटिका :

  • १ हेक्टर क्षेत्रासाठी. रु. १५ लाख अपेक्षित खर्चाप्रमाणे कमीत कमी रु. ७.५ लाख प्रतिरोपवाटिका अनुदान मिळू शकते.
  • मुख्य अट : कमीत कमी २५ हजार कलमे प्रतिवर्ष हेक्टर तयार करणे आवश्यक.
  • रोपवाटिकेच्या प्रमाणिकरणाच्या अनुषंगाने आधुनिकीकरणासाठीचे अनुदान : ४ हेक्टर क्षेत्रासाठी रु. १० लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. खासगी रोपवाटिका धारकांसाठी ५०% म्हणजेच ४ हे. क्षेत्रासाठी रु.५ लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. एस. पी. घुले, ९५६११६०८३३ (उद्यानविद्या विभाग, श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com