सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी भूसूक्ष्मजीवशास्त्र

सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी भूसूक्ष्मजीवशास्त्र
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी भूसूक्ष्मजीवशास्त्र

माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२० वर्षे शेती चांगली पिकून उत्पादनात घट होत गेली. उत्पादकता घटण्याचे नेमके वैज्ञानिक उत्तर आजही दिले न गेल्याने शेतकरी व शास्त्रज्ञ दोघेही चाचपडत आहेत. मात्र, अपघाताने मी भूसूक्ष्मजीवशास्त्र या दुर्लक्षित शास्त्राकडे वळल्याने मला आज त्याच जमिनीतून पूर्वीप्रमाणेच उत्पादन मिळत आहे . मला शिकवलेली तत्त्वे ः

  • पीकवाढीविषयक बरीच कामे जमिनीत सूक्ष्मजीवामार्फत पार पाडली जातात. यामुळे उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या पोटापाण्याची म्हणजेच सेंद्रिय कर्बाची सोय प्रथम केली पाहिजे. जमिनीत सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात नसेल, त्यांच्या कामात अडथळा येतो आणि उत्पादनात घट येऊ शकते. अशा परिस्थितीत बाकी निविष्ठा जास्त वापरूनही फारसा फायदा होत नाही. हरितक्रांतीच्या सुरवातीला सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य पातळीवर होते तोवर उत्पादनात वाढ मिळाली. पुढे सेंद्रिय कर्बामध्ये घट होत गेल्याने उत्पादनातही घट होत गेली. उत्पादन पातळी एकदम न घटता हळूहळू कमी होत गेल्याने शेतकऱ्यांच्या ध्यानात येण्यासही वेळ लागतो. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष असले तरी सुरवातीला निसर्गाने जमिनीत राखलेल्या सेंद्रिय कर्बाच्या पातळीवर किमान १५-२० वर्षे उत्पादन मिळत राहते. जिथे सिंचनाच्या सोयी झाल्या, अशा सर्व ठिकाणी या संदर्भाला दुजोरा मिळाला आहे.
  • हरितक्रांतीपूर्वी फक्त खरिपात देशी वाणाचे पीक घेतले जाई. सेंद्रिय कर्बाचा वापर मर्यादित होई. हरितक्रांती व बागायतीच्या सोयी झाल्याने वर्षातून दोन-तीन पिके, वार्षिक-बहुवार्षिक पिके घेणे, सुधारित बियाणे, रासायनिक खतांचा वापर वाढला. उत्पादनही वाढले, परिणामी सेंद्रिय कर्बाचा वापर वाढला. एखादे पिकाच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेंद्रिय कर्बाइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक जमिनीत परत दिला गेला असता तरच जमिनीची उत्पादकता टिकून राहिली असती. मात्र, उत्पादन वाढत गेले, तसतसे सेंद्रिय कर्बाचा वापर घटत गेला. सेंद्रिय कर्बाची पातळी एका ठराविक मर्यादेच्या खाली गेल्यानंतर उत्पादन घटत असल्याची जाणीव होऊ लागली.
  • कृषी शिक्षणामध्ये बॅक्‍टेरियालॉजी असा विषय असला तरी त्यातून पीक रोगशास्त्रच प्रामुख्याने शिकविले जाई. वनस्पतीच्या वाढीसाठी सूक्ष्मजीवांचे महत्त्व, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा व सूक्ष्मजीवांचा संबंध याची काहीही माहिती नव्हती. जमिनीला सेंद्रिय खत का द्यावयाचे याची कारणे सुपिकतेच्या संबंधी होती. त्यात सूक्ष्मजीवांचा कोठे उल्लेख नसे. वास्तविक १९१० पासून ही भूसूक्ष्मजीवशास्त्र ही शाखा विकसित होत गेली होती. मात्र, शास्त्रज्ञांनाच त्याची जाणीव नव्हती, मग शेतकऱ्यांना असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.
  • माझ्या अभ्यासात पिकावर रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव नगण्य असून, तुलनेने मित्र सूक्ष्मजीवांची संख्या अगणित असल्याचे आढळले. शेती यशस्वी करण्यासाठी या मित्र सूक्ष्मजीवांचा अभ्यास गरजेचा आहे. मित्र सूक्ष्मजीवांचे दोन गट जमिनीत आहेत. १) सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट व २) पिकाला अन्नपुरवठा करणारा गट.
  • कुजविणारा गट जमिनीला सुपिकता देतो, सेंद्रिय कर्बाची निर्मिती कुजणाऱ्या पदार्थांपासून करतो. या गटाने निर्माण केलेल्या सेंद्रिय कर्बाचा वापर करून दुसरा गट वाढणाऱ्या पिकाला गरजेप्रमाणे अन्नपुरवठा करतो. या संदर्भावर चिंतन केल्यास शेतीत सेंद्रिय पदार्थाचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती मिळते. शेतीत कुजणारा पदार्थ दिला पाहिजे. अनुकूल परिस्थितीत कुजण्याची क्रिया चालू राहिल्यास कुजणारी जिवाणूसृष्टी वाढेल. त्यातून सेंद्रिय कर्बाचा पुरवठा होईल. त्याच्या दुसरा गट पिकाला अन्नपुरवठा करण्याचे काम पार पाडेल. पिकाचे उत्पादन व्यवस्थित होईल.
  • आजही कृषी शास्त्रज्ञांद्वारे चांगले कुजलेले शेणखत टाकण्याचीच शिफारस होते. पहिल्या गटाच्या जिवाणूंना खाद्य मिळत नाही. इथेच शेतीच्या अपयशाचे कारण दडले असल्याची जाणीव मला १९९० च्या सुमारास झाली. त्यानंतर चांगले कुजलेले खत टाकणे बंद केले. शेतामध्ये कुजणारा पदार्थ वापरण्याविषयी शोधयात्रा सुरू झाली. कुजणारा पदार्थ बाजारातून विकत घेऊन वापरणे शक्‍य नव्हते. मग उसाचे पाचट हा फुकट सहज उपलब्ध पदार्थ वापरण्याचा प्रथम प्रयोग केला. पाचट व्यवस्थापनाचा १५ वर्षे अभ्यास व प्रयोग केले तरी उत्पादनात वाढ मिळाली नाही. पुढे उसाचे जमिनीखालील अवशेष कुजविले. त्याने पहिल्याच वर्षी उत्पादनात चांगलीच वाढ झाली. यातून जमिनीखालील अवशेषांचे सेंद्रिय खत केले पाहिजे हे लक्षात आले.
  • सेंद्रिय खतनिर्मितीसाठी तणांच्या वापराविषयी अभ्यास सुरू झाला. तणापासून उत्तम प्रकारचे खत शक्य असल्याचे अनुभवातून शिकलो. आजपर्यंत तण निर्मूलनाचा कार्यक्रम चालू होता; आता तण व्यवस्थापनाचा नवीन कार्यक्रम सुरू झाला. कारण सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन हा शेतीतील सर्वांत महत्त्वाचा विषय मला फुकटात सोडवायचा होता. गरिबापासून श्रीमंतापर्यंत व अल्पभूधारकापासून मोठ्या बागायतदारापर्यंत व शेवटी अगदी कोरडवाहू शेतकऱ्यांनाही ते सहज शक्य झाले पाहिजे, हा ध्यास होता.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com