जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी

जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशी

गेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी वाढलेल्या रासायनिक कीडनाशकांच्या वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होत आहे. परिणामी मुख्य आणि दुय्यम किडींचा उद्रेक वाढत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. यासाठी किडींच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. निसर्गात आढळणाऱ्या बुरशीद्वारे किडींचे नियंत्रण पर्यावरणपूरक पद्धतीने शक्य आहे. १) व्हर्टिसिलियम लेकॅनी (Verticillium lecanii) या बुरशीचे तंतू बासीओनॉलाईड व अन्य डिप्लिकोलिनिक अॅसिडसारखी सायक्लोडीप्सेप्टाइड विषारी पदार्थ तयार करतात. त्याद्वारे ही बुरशी तुडतुडे, पांढरी माशी, तांबेरा बुरशी आणि खवले कीटक यांचे नियंत्रण करते. पद्धत - व्हर्टिसिलियम या बुरशीचे बिजाणू कीटकांच्या त्वचेच्या संपर्कात येताच तिथे रुजतात. स्वतःच्या वाढीसाठी किटकाच्या शरीरातील पोषक घटकांचे शोषण करतात. त्यामुळे ४८ ते ७२ तासांत किटक रोगग्रस्त होऊन मरतो. पीक : ग्रीनहाऊसमधील शोभेची पिके, भाज्या आणि शेतातील अन्य पिके. लक्ष्य कीटक : पांढरी माशी, फुलकिडे, मावा आणि पिठ्या ढेकूण इ. वापर : फवारणी यंत्राद्वारे झाडावर बुरशीयुक्त घटकांची फवारणी करावी. फवारणी पानाच्या खालील बाजूने होईल, याकडे लक्ष द्यावे. १५ ते २० दिवसांच्या अंतराने किमान चार वेळा, तर ग्रीनहाउसमधील कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी. मात्रा : ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ५ किलो प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर ठिबक सिंचनाद्वारे ५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणे द्यावे. २) बिव्हेरिया बॅसियाना (Beauveria bassiana) ही बुरशी जगाच्या बहुतेक भागात नैसर्गिकरित्या आढळते. या बुरशीचे बीजाणू किटकांच्या त्वचेच्या संपर्कात येताच रुजून अंकुरित होतात. किडीच्या शरीरांतर्गत वाढ करून घेतात. संपूर्ण शरीरात बुरशी पसरून अंतर्गत पोषक घटकांवर जगते. ४८ ते ७२ तासांत कीटक मरतो. पिके : अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळांची पिके इत्यादी. लक्ष्य किटक : विविध पिकांवरील अळ्या, भुंगे, तुडतुडे, ढेकूण आणि पाने खाणारे किटक. वापर : (हुमणी अळीसाठी) मुळांजवळ मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. ठिबक सिंचनाद्वारे पीक लागवडीआधी किंवा नंतर मातीत मिसळून द्यावे. वापरण्याची पद्धत : याचा वापर किडींची संख्या आणि पीक यावर अवलंबून असतो. ग्रीनहाउस पिकातील कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक १५ ते २० दिवसांतून एकदा वापरावे. मात्रा : ५०० लिटर पाण्यात ५ किलो प्रती हेक्टर, म्हणजे ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तर ठिबक सिंचनाद्वारे ५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणे सोडावे. ३) मेटाऱ्हायझीम अॅनिसोप्लीई (Metarhizium anisopliae) ही कीटकभक्षी बुरशी त्याच्या संपर्कात येणाऱ्या कीटकांना संक्रमित करते. कीटकांच्या पृष्ठभागावर बुरशीचे बीज चिकटल्यानंतर अंकुर वाढू लागतात, मग ते कीटकांच्या शरीरात घुसतात. त्या कीटकात अतिशय वेगाने वाढून किडीस मारतात. अशाप्रकारे संसर्ग झालेल्या कीटकांशी संपर्कात येताच त्याच्या त्वचेमध्येही शिरकाव करून घेतात. रुजून अंकुरीत होऊन वाढतात. या कीटकांच्या शरीरातही बुरशीचे बीज पसरते. अंतर्गत पोषक घटकावर जगेत. अशा प्रकारे संपर्कात येणारे अन्य कीटकही बुरशीमुळे संक्रमित व रोगग्रस्त होतात. पीक : अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळ पिके आणि ऊस इत्यादी. लक्ष्य कीटक : भुंगे, तुडतुडे, हुमणी अळी इत्यादी. वापर : हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझीम अॅनिसोप्लीई मुळाच्या सभोवती आळवणीद्वारे द्यावे. किंवा मातीमध्ये आळवणी करावी. आठवड्यातून एकदा या प्रमाणे चार आठवडे वापर करावा. ग्रीनहाउस कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक १० ते १५ दिवसांत एकदा या प्रमाणे वापर करावा. मात्रा : ५०० लिटर पाण्यात ५ किलो प्रती हेक्टर, म्हणजे ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी तर ठिबक सिंचनाद्वारे ५ ग्रॅम प्रती लिटर. ४) पॅसिलोमायसिस फ्यूमोसोसियस (Paecilomyces fumosoroseus) पॅसिलोमायसिस फ्यूमोसोसियस ही किटकांच्या विस्तृत श्रेणीमुळे प्रभावी ठरते. त्यात डायमंड मॉथ (प्लुटेला झायलोस्टोला), रशियन मावा (डायरापिस नॉक्सिया), पांढरी माशी (बेमिशिया अर्जेंटीफॉली) आणि २५ वेगवेगळ्या कुळातील कीटकांचा समावेश आहे. ही बुरशी स्पॉटेड स्पायडर माइट, रेड माइट, ब्राउन माइट अशा कोळीवर्गीय किडीसाठीही प्रभावी आहे. लक्ष्य पिके : फुल पिके, भाजीपाला, मका, तांदूळ, कापशी आणि कोबीवर्गीय पिके इत्यादी . मात्रा : ५०० लिटर पाण्यात ५ किलो प्रती हेक्टर, म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५) पॅसिलोमायसिस लिलासीनस (Paecilomyces lilacinus) पॅसिलोमायसिस लिलासीनस ही जगभरातील अनेक प्रकारच्या मातीत नैसर्गिकरित्या आढळणारी बुरशी आहे. ही बुरशी वनस्पतीच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. ही बुरशी २१ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगली वाढते. तर तापमान ३६ अंश सेल्सिअसला पोचल्यास अधिक वाढत नाही किंवा टिकू शकत नसल्याचे प्रयोगशाळेमध्ये केलेल्या प्रयोगात दिसून आले. ही बुरशी अंडी, कोष आणि प्रौढ मादी अशा सर्व अवस्थांमध्ये संसर्ग करते. पिके : वांगे, बटाटा, मिरची, टोमॅटो, काकडी, फुले इत्यादी. लक्ष्य कीटक : मातीमध्ये वनस्पती परजीवी सूत्रकृमी, उदाहरणार्थ मेलॉइडोग्यनी (रूट नॉट निमॅटोड्स); रेडोफोलस सिमिलिस (बरोइंग निमॅटोड्स); हेटरोडेरा आणि ग्लोबोडेरा (सिस्ट निमॅटोड्स); प्रेटिलेन्चस (रूट लेझोन निमॅटोड्स); रोटिलेन्चुलस रेनिफॉर्मिस (रेनिफॉर्म निमॅटोड्स). वापरण्याची पद्धत : ५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून ग्रीनहाउस पॉटिंग मिक्समध्ये मिसळावे. रोपांसाठी १०० ते २०० ग्रॅम प्रति घनमीटर प्रमाणे द्यावे. मात्रा : माती प्रक्रिया ४ ते ५ किलो प्रति हेक्टर कोणत्याही जैविक खतासह वापरावे.

संपर्क - डॉ. धीरज कदम, ९४२१६२१९१० विवेक सवडे, ९६७३११३३८३ (लेखक कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सहयोगी प्राध्यापक असून, विवेक सवडे हे आचार्य पदवी - अंतिम वर्ष विद्यार्थी आहेत. )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com