तयारी रब्बी हंगामाची...

तयारी रब्बी हंगामाची
तयारी रब्बी हंगामाची

खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी पूर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावी, जेणे करून पृष्टभागातील ओलावा कमी होणार नाही. सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येते. जिरायती परिस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील बदलाला कमी बळी पडणाऱ्या, कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. रब्बी हंगामात जिरायती परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपिक आणि दुबार पीक पद्धतींचा अवलंब करावा. रब्बी हंगामात सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येते तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी आणि हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी आणि करडई (६:३) या आंतरपीक पद्धती अधिक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेत. आंतरपीक पद्धती

  1. रब्बी ज्वारी आणि करडई ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी किंवा करडई सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. ही आंतरपीक पध्दत ६:३ या ओळीच्या प्रमाणात घेण्यात यावी.
  2. करडई अाणि हरभरा : मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ४:२ किंवा ६:३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.

जमिनीच्या प्रकारानुसार पिके आणि पीक पद्धती ः

जमिनीचा प्रकार खोली (सें.मी.) उपलब्ध ओलावा (मि.मी.) पिके आणि पीक पद्धती
मध्यम २२.५ - ४५ ६०-६५ सूर्यफूल, करडई
मध्यम खोल

१) ४५-६०

२) ६०-९०

१) ८०-९०

२) १४०-१५०

१) रब्बी ज्वारी, करडई, रब्बी ज्वारी अधिक करडई (६:३) आंतरपीक

२) रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, रब्बी ज्वारी अधिक करडई (६:३) करडई अधिक हरभरा (६:३)

खोल ९० पेक्षा जास्त १६० पेक्षा जास्त रबी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन (खरीप) नंतर रब्बी ज्वारी, करडई, हरभरा या पिकांची लागवड करावी.

योग्य जातींची निवड जिरायती परीस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील बदलाला कमी बळी पडणाऱ्या, कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. सुधारित /संकरित जाती

  1. रब्बी ज्वारी ः मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही - १४११), स्वाती (एसपीव्ही - ५०४), परभणी ज्योती
  2. सूर्यफूल ः मॉर्डन, एससीएच-३५, ई.सी.६८४१४, एलएसएफएच-१७१
  3. करडई ः भीमा, शारदा, तारा, एन-६२-८, अनेगिरी, नारी - ६, पीबीएनएस-१२, पीबीएनएस-४०, पीबीएनएस-८६
  4. हरभराः विजय, बीडीएन-९-३, विशाल, फुले जी - १२, दिग्विजय, विराट
  5. जवस -एनआय-२०७, एस-३६, एलएसएल-९३

योग्य वेळी पेरणी ः

  • योग्य वेळी पेरणी केल्यामुळे उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्ये आणि इतर साधनांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन पिकाची जोमदार वाढ होते आणि अधिक उत्पादन मिळते.
  • योग्य वेळी पेरणी केलेल्या पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. काही कारणास्तव उशिरा पेरणी झाल्यास ओलाव्याचा पूर्णपणे वापर होत नाही आणि उत्पादनात घट येते.
  • रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी. तसेच करडई या पिकाची पेरणी थोडी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी.
  • हरभरा या पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. परंतु या कालावधीत पाऊस एकसारखा सुरू असेल आणि जमिनीमध्ये पेरणी योग्य परीस्थिती नसेल, तर अशा परीस्थितीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी ३० ऑक्टोबरपर्यंत करता येते.
  • पीक - पेरणीचा योग्य कालावधी रब्बी ज्वारी - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर सूर्यफूल -२० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर करडई - ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हरभरा - ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर जवस - २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर लागवडीचे नियोजन ः

  • खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकांच्या पूर्वमशागतीची कामे प्रामुख्याने वखरणी अथवा नांगरणी जास्त प्रमाणात केली गेल्यास जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात उडून जातो आणि त्यामुळे रब्बी पिकांच्या उगवणीवर आणि वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे पूर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावी, जेणे करून पृष्टभागातील ओलावा कमी होणार नाही.
  • रोपांची प्रति हेक्टरी योग्य संख्या असणे हे जिरायती शेतीत उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी बियाण्यांचे योग्य प्रमाण व योग्य अंतरावर पेरणी करावी. पेरणी योग्य खोलीवर आणि पुरेशा ओलाव्यात केल्यास उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. या करिता पिकाप्रमाणे शिफारस करण्यात आलेले बियाण्याचे प्रमाण व रोपांच्या दोन ओळींतील अंतर ठेवावे.
  • जिरायती परिस्थितीत रासायनिक खतांची उपयोगिता, रासायनिक खते कशा पद्धतीने दिली यावर अधिक अवलंबून असते. त्यासाठी रासायनिक खते रब्बी हंगामातील पूर्वमशागत झाल्यावर, पेरणीपूर्वी १ किंवा २ दिवस अगोदर सुधारित तिफणीच्या मदतीने १२ ते १५ से.मी. खोलीवर पेरून द्यावीत. यामुळे ही खते पुरेशा ओलीत पडून ती पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.
  • पावसाचे प्रमाण कमी असल्यास पृष्टभागावरील जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असते. परंतु जमिनीतील खालच्या थरात पुरेशा प्रमाणात ओलावा असतो. अशा परिस्थितीत रब्बी पिकांची पेरणी ८ ते १० सें.मी. इंच एवढी खोल करावी म्हणजे बी चांगल्या ओलीत पडून उगवण चांगली होते.
  • संपर्क ः डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com