बटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्र

बटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्र
बटाटा शेतीसाठी किफायतशीर तंत्र

बटाटा पिकाच्या वाढीसाठी योग्य तापमानाची आवश्यकता असते. सध्या पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण असून, लागवडीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करावा.

ब टाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि ट्युबरलायझेनच्या वेळी विशिष्ट  तापमानाची गरज असते. बटाटा लागवड करताना रात्रीचे तापमान १८-२० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावे. बहुतांशी असे वातावरण १५-३० नोव्हेंबरच्या दरम्यात असेत. मात्र, यावर्षी थंडी पडण्यास उशीर झाला असून, सध्या असे वातावरण आहे. वाढीसाठी २० ते २४ अंश सेल्सिअस आणि कंद तयार होतेवेळी (ट्युबरलायझेशन) १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान उपलब्ध असावे.

बियाणे निवड बटाटा कंद शीतगृहामध्ये साठवलेले असल्यास लागवडीपूर्वी किमान एक आठवडाआधी बाहेर काढून सामान्य वातावरणात ठेवावेत. साधारणतः २५ ते ४० ग्रॅम वजनाचा बटाटा कंद वापरावा. मात्र, २५ ते ४० ग्रॅम वजनाचा बटाटा कंद उपलब्ध नसल्यास, आकार व वजनाने मोठ्या असलेल्या कंदाचे आवश्यकतेनुसार दोन अथवा चार समान भाग करून घ्यावेत.

बियाणे प्रक्रिया कापणी केल्यानंतर रोगापासून व पुढील काळातील करपा रोगापासून संरक्षणासाठी लागवडीपूर्वी कंद एक किलो मॅन्कोझेब मिश्रणात बुडवून सुकी प्रक्रिया करून घ्यावी. रासायनिक प्रक्रियेनंतर आठ तासानंतर बटाटा पिकांमध्ये नत्रयुक्त घटकांच्या पूर्ततेसाठी २.५ किलो अॅझोटोबॅक्टर आणि ५०० मिली द्रवरूप अॅसेटोबॅक्टर प्रती १०० लिटर पाणी याप्रमाणे मिश्रण करून त्यात अर्धा तास कंद बु़डवून घ्यावेत.

पाणी व्यवस्थापन ठिबक पद्धतीसाठी प्रतितास चार लिटर पाणी बाहेर सोडणाऱ्या ड्रीपरचा वापर करावा.  दोन लॅटरलमध्ये  दोन फूट अंतर ठेवावे. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तापमान फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी असते. या महिन्यादरम्यान ४५ मिनिट ठिबक चालू ठेवावे. फेब्रुवारी महिन्यात ६० मिनिटे ठिबक चालू ठेवावे . ठिबक पद्धत उपलब्ध नसल्यास, काळी पोयटायुक्त जमीन असल्यास ८० ते ९० दिवसाच्या अंतराने एकूण आठ ते दहा पाण्याची जरुरी असते. मात्र, जमिनीत रेती मिश्रित कणांची मात्रा जास्त असल्यास पाच ते सात दिवसांच्या अंतराने एकूण १४ ते १५ पाण्याची गरज असते. जास्त पाणी साठल्यास मुळांची कूज होऊन बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो.

तण नियंत्रण   बटाटा पिकामध्ये तणनियंत्रणासाठी खुरपणी करणे, वखरणी करणे सोयीस्कर नसते. ३० ते ४० दिवसांनी बटाटा कंदाची वाढ आणि विकास अवस्था सुरू होते म्हणून बटाटा लागवड केल्यानंतर बटाटा उगवण्यापूर्वी व तणे एक पानावर असताना शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणनाशकाची फवारणी करतांना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. तणनाशकांचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • जमीन तयार करताना २५ ते ३० टन  शेणखत अथवा १ ते २ टन एरंडी पेंड किंवा ३ टन कोंबडीखत यापैकी जे उपलब्ध असेल याचा वापर करावा. रोगापासून कंदाचा बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५ किलो प्रतिहेक्टर लागवडीच्या वेळी सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावे.
  • अधिक उत्पादनासाठी विद्राव्य खते ठिबक पद्धतीने दिल्यास खत मात्रेत बचत होते. उत्पादनातही वाढ होते. बटाटा संशोधन केंद्र, डीसा, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार २२० किलो नत्र , ११० किलो स्फुरद , २२० किलो पालाश प्रतिहेक्टरी ठिबकद्वारे द्यावे. पूर्ण नत्र आणि पालाश बटाटा लागवडीनंतर ९ दिवसांनी ६३ दिवसांपर्यंत ७ दिवसांच्या अंतराने ठिबकमधून समान ९ वेळेस विभागून द्यावे. स्फुरद पायाभूत स्वरूपात द्यावेत.
  • ठिबक सिंचन उपलब्ध नसल्यास महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार, बटाटा लागवडीपूर्वी १०० किलो नत्र ,  ६० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. ५० किलो नत्र ३० ते ४० दिवसानंतर मातीची भर लावतांना द्यावे.
  • पीक संरक्षण बटाटा पिकांमध्ये रसशोषक किडी, पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा अळी) इ. किडींचा प्रादुर्भाव आढळतो.  त्याचप्रमाणे बटाटा पिकामध्ये स्कॅब, लवकर तसेच उशिरा येणारा करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.

    रस शोषक किडींचे नियंत्रण  

  • मावा या रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी बटाटा लागवडीच्या वेळी शेताच्या सीमेवर मका या सापळा पिकाची लागवड करावी.  
  • बटाटा पिकांमधील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिहेक्टर ४० चिकट सापळे (स्टिकी ट्रॅप) लावावेत.
  • लागवडीनंतर महिन्याच्या अंतराने निंबोळी तेल ५ मिली प्रतिलिटर पाणी फवारणी करत राहावे.
  • रासायनिक नियंत्रण  ः
  •     इमिडाक्लोप्रिड (१७. ८ एस. एल.) ०.५ मिली प्रति लिटर पाणी. पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)

  • रात्रभर गवताचे ढीग पिकात ठेवून त्यात रात्री अळ्या जमा होतील. असे ढीग सकाळी अळ्यांसह नष्ट करावेत.
  • ४ ते ५ पक्षी थांबे प्रतिएकरी करावेत.  
  • ५ ट्रायकोकार्ड प्रतिहेक्टरसाठी वापरावे.
  • रासायनिक नियंत्रण ः
  •     क्विनॉलफॉस २ मिली प्रति लिटर पाणी.

    स्कॅब नियंत्रण

  • ठिबक पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करावे.
  •  एकाच जमिनीमध्ये वारंवार बटाटा पीक घेऊ नये.
  • करपा नियंत्रण

  • पिकांची फेरपालट करावी.  बटाटा पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन तापवून दयावी.
  • रासायनिक नियंत्रण :
  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी. किंवा हेक्साकोनॅझोल (५ टक्के) अर्धा मि.लि. ग्रॅम प्रति लिटर.
  • पुढील फवारणी आवश्यकतेनुसार पंधरा दिवसाने करावी.
  • (संकलक ः सुषमा सोनपुरे व डॉ. पी. ए. साबळे)  ः डॉ. साबळे  ८४०८०३५७७२ (डॉ. साबळे हे सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषिविद्यापीठ, गुजरात येथे उद्यानविद्या विभागात सहायक प्राध्यापक असून, सुषमा सोनपुरे या महात्मा फुले कृषिविद्यापीठ, राहुरी येथे आचार्य पदवीच्या विद्यार्थिनी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com