कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून शाश्वततेसाठी प्रयोग

कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून शाश्वततेसाठी प्रयोग
कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून शाश्वततेसाठी प्रयोग

राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत तर ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे. आणखी कमाल पाटबंधारे सुविधा, पाणलोट विकास, जलसंधारणाच्या सोयी यातून बागायती शेती २५ टक्‍क्‍यांपर्यंत पोचू शकेल. दर दहा वर्षांत एखादे साल दुष्काळी तर २-३ वर्षे गरजेपेक्षा कमी, २-३ वर्षे सर्वसाधारण व २-३ वर्षे बऱ्यापैकी पाऊसमान राहते. यातील सर्वसाधारण आणि बऱ्यापैकी पाऊसमानाच्या वर्षात बऱ्यापैकी उत्पादन मिळाले तरीही अन्य वर्षामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्ण विस्कटते. अशा स्थितीमध्ये कोरडवाहू क्षेत्रात थोडीफार शाश्‍वतता आणण्यासाठी भू सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यास व त्यानुसार शेतीतंत्रातील बदल उपयुक्त ठरतील का, हा अभ्यासाचा विषय आहे. यंदाच्या दुष्काळात काही शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगातून अशी शाश्‍वतता शक्‍य असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. कोरडवाहू शेतीचे नेमके प्रश्‍न कोणते? १. जमिनीची सुपीकता २. धूप ३. पाऊस पडण्याचे दिवस कमी असणे. ४. एकावेळी जास्त पाऊस, दोन पावसाच्या सत्रात जास्त अंतर असे अनियमित वितरण.

  • राज्यामध्ये कोरडवाहू जमिनीखालील क्षेत्र मोठे आहे. पूर्वी सर्व कामे बैलाकरवी होत. गावामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या जास्त होती. त्यामुळे जमिनीला बऱ्यापैकी सेंद्रिय खताचा पुरवठा होत असे. आता दरडोई कमी क्षेत्र, चाऱ्याची अनुलब्धता आणि ट्रॅक्टरसारख्या मुबलक यंत्रामुळे जनावरे पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी सेंद्रिय खत बहुतांशी क्षेत्रात अनेक वर्षे वापरले जात नाही. विकत घेऊन टाकण्याएवढी आर्थिक क्षमता नसल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी होत गेली.
  • जमिनीची जलधारणक्षमता कमी झाली आहे. यामुळे पावसाच्या दोन सत्रात अंतर पडल्यास पिके वाळून जातात. पुढे पुन्हा पाऊस झाला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.
  • एकावेळी जास्त पाऊस पडण्याच्या स्थितीमध्ये मशागत करुन भुसभुशीत केलेला मातीचा वरच्या थरांची धूप होऊन जाते. जमिनीचा सुपीक थर वाहून गेल्याने मोठे नुकसान होते. हे नुकसान वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरू आहे. मात्र, नेमका उपाय सांगितला जात नसल्याने शेतकरी हतबल आहेत.
  • सरकारने मध्यंतरी कोरडवाहू शेती अभियान राबविले. या अभियानात प्रामुख्याने शेततळे, वीजेवरील पंप, ठिबक संच उपलब्ध करून देणे अशा पद्धतीतून संरक्षित पाण्याची सोय करणे हाच प्रमुख निकष होता. कोरडवाहू शेतीत शाश्‍वतता आणण्याच्या दृष्टीने संरक्षित पाण्याची सोय करणे हा सर्वात चांगला उपाय असला तरी या शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीचा विचार करता खर्चिक ठरतो. त्याऐवजी स्वस्त, सोपे, सुलभ आणि कोणत्याही सरकारी मदत किंवा कर्जाशिवाय राबवता येतील, अशा मार्गांचा शोध आवश्यक आहे.
  • प्रचलित शेती पद्धती ः

  • - कोरडवाहू क्षेत्रात कापूस व तूर ही लांब अंतरावरील दीर्घ मुदतीची पिके तर सोयाबीन, मूग, उडीद, अगर कडधान्ये ही पिके कापूस व तूर या पिकात मिश्रपिके म्हणून घेतली जातात.
  • - या खरीप पीक पद्धती व्यतिरिक्त काही भारी जमिनीमध्ये खरिपात अल्पमुदतीचे पीक घेऊन, रब्बीत गहू, हरभरा, करडई अशी पिके घेतली जातात. रब्बी ज्वारीचा काही ठराविक पट्टा सोलापूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात आहे. तेथे खरीपात जमीन पड राहते किंवा टाकली जाते. खरिपात सतत कुळवाच्या पाळ्या मारुन रान स्वच्छ ठेवले जाते. योग्य वेळी रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. अशा ठिकाणी पावसाचे पाणी रानात मुरण्यासाठी रानात काही अंतरावर समपातळीवर खोल सऱ्या पाडाव्यात अगर सर्व रानात सपाट वाफे बांधून घ्यावेत. ही विद्यापीठाची शिफारस आहे. पाणी जिरण्यासाठी बांध बंदिस्ती तसेच बांधावर वाळा गवताची लागवड अशाही काही शिफारशी आहेत.
  • - जमिनीचा वापसा पाहून कोळपणी व भांगलणीची कामे करावीत. पाऊस उघडीप काळात जमिनीला भेगा पडू नयेत, यासाठी वरचेवर कोळप्याच्या पाळ्या मारुन जमिनीतील ओलावा टिकून ठेवावा, अशी शिफारस आहे.
  • - वारघटीसाठी बांधावर झाडाचे पट्टे तयार करावेत, याला वनभिंती असे म्हणतात. परंतु, याचा वापर फारसा केला जात नाही. -किडीसाठी काही सापळा पिकांची शिफारस आहे. यात अल्पमुदतीच्या पिकाची अत्यंत आवश्‍यकता आहे, कारण त्यांचा पैसा मध्यहंगामात शेतकऱ्यांच्या हाती येतो. तो घरगुती व शेतीतील पुढील कामास उपयोगी पडतो.
  • - बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर सातत्याने कापसावर कापूस हेच पीक घेतले जाते. कारण नगदी असे ते सर्वात प्रमुख पीक आहे.
  • - बागायतीच्या थोड्याफार सोयी असणाऱ्या भागात अल्प क्षेत्रावर सीताफळ अगर डाळिंबासारख्या फळबागा घेतल्या जातात. परिणामी थोडे फार उपलब्ध शेणखत, कंपोस्ट या बागांकडेच वळते. अन्य भुसार पिकांखालील जमिनीमध्ये सेंद्रिय खत अनेक वर्षापर्यंत दिलेच जात नसल्याची स्थिती सर्वदूर आहे.
  • कोरडवाहू शेती शाश्वत करण्यासाठी... यापुढे कोरडवाहू शेतीमध्ये केवळ पिकाचे उत्पादन इतकाच मर्यादित विचार करून चालणार नाही. दुष्काळ सांगून येत नाही किंवा अद्यापही त्याचा अंदाज खूप आधी करणे शक्य दिसत नाही. दुष्काळी पट्ट्यात पीक उत्पादनाबरोबर पिकाला त्याच्या आयुष्याच्या गरजे इतके पाणी त्याच्या मुळाजवळ साठवण्याच्या दिशेने तंत्र विकसित करावे लागेल. मुळांच्या जवळ पाणी साठवण्याचे तंत्र महागडे असून चालणार नाही. कारण ते महागडे असल्यास शेतकऱ्यांना परवडणार नाही. शक्यतो असे तंत्र फुकटात किंवा अत्यंत स्वस्त उपलब्ध झाले तरच सार्वत्रिक राबवणे शक्य होईल. पुन्हा त्यासाठी सरकारी अनुदानाची गरज लागू नये. उपाययोजना १०० टक्के जमिनीचा वापर पीक उत्पादनासाठी करू नये. त्याऐवजी ४०-५० टक्के जमिनीचा वापर पीक उत्पादनासाठी व उर्वरीत ५०-६० टक्के जलसंधारणासाठी अशी विभागणी करावी. त्यातही एकूण क्षेत्रापैकी लांब अंतरावरील व जवळ अंतरावरील पिकाचे वेगवेगळे क्षेत्र निश्‍चित करावे. उदा. लांब अंतरावरील पिकात कमी मुदतीची मिश्रपिके घेणे बंद करावे. अ) लांब अंतरावरील कापूस, तूर या पिकाखालील क्षेत्राची मशागत अजिबात करु नये (शून्य मशागत). या पिकाच्या दोन ओळीत १५० ते १८० से.मी. अंतर ठेवावे. तितक्‍या अंतरावर पॉवर टीलर, ट्रॅक्‍टर अगर बैलाने काकर मारुन टोकण पद्धतीने पेरणी करावी. पिकाच्या ओळीच्या दोनही बाजूस ३०-३० सेंमीचा पट्टा हा तणे उगविण्यापूर्वी व उगविल्यानंतर तणनाशक मारुन स्वच्छ ठेवावा. पिकाच्या दोन ओळीमध्ये आपल्याला ९० ते १२० सेंमी रुंदीचा मोकळा पट्टा मिळेल. त्या पट्ट्यात तण वाढवावे. पाऊस कितीही अपुरा असला तरी तणांची वाढ बऱ्यापैकी होते. ही तणे मोठी करावी. चांगली मोठी व जुनं झाल्यावर उलटा वरवर अगर लहान ट्रॅक्‍टर किंवा पॉवर टीलर फिरवून झोपवावीत. त्यातील काही परत उभी राहतील, ती परत झोपवावीत. जमिनीवर तणांचे दाट आच्छादन होईल. जमिनीखाली तणांच्या मुळांची जाळी तयार होईल. या मुळांच्या जाळीत एखादा पाऊस पडल्यास भरपूर पाणी साठविले जाईल. पारंपरिक मिश्र पीक पद्धतीमध्ये उघडा पट्टा असतो. त्यात असे पाणी साठवले जात नाही. आता कितीही पाऊस पडला तरी पाणी आडवे वाहणार नाही. ज्या जागी थेंब पडेल तेथेच तो जिरेल. (हेच ते मूलस्थानी जलसंवर्धन.) यानंतर ती सर्व जमीन मुख्य पिकासाठी उपलब्ध असेल. पावसाच्या दोन सत्रात अंतर पडल्यास तणाच्या पट्ट्यातील ओलाव्यामुळे पीक वाळणार नाही. पावसाळा अखेरीस पाऊस गेल्यानंतरही ६०-७० दिवस या ओलाव्यावर पिकाची वाढ चालू राहील, असे प्रत्यक्ष वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. कापूस व तूर या लांब मुदतीच्या पिकांना जितका जास्त ओलावा मिळेल तितका जास्त काळ पाने, फुले व शेंगा अगर पात्या मिळत राहतील. योग्य वेळी तणांचा पट्टा तणनाशक फवारुन मारुन टाकावा. पुढील वर्षी पीक घेतलेल्या भागामध्ये उन्हाळ्यात झाडे वाळल्यानंतर रोटाव्हेटर फिरवून चुरा करून घ्यावा. त्याचे जमिनीवर आच्छादन करावे. आवश्यकता असल्यास पऱ्हाटी, तुरकाठी जमिनीवरून तोडून जळणासाठी वापरावी. जमिनीखालील मुळांना धक्का लावू नये. दुसऱ्या वर्षी तणाच्या पट्ट्यात काकर मारून पिकाचा पट्टा व पिकाच्या पट्ट्यात तणांचा पट्टा वाढवावा. तणे कुजून जमिनीला भरपूर सेंद्रिय खत मिळेल. या पद्धतीचे फायदे ः १. पिकाच्या गरजे इतके पाणी उपलब्ध होऊन पिकाचे चांगले उत्पादन मिळते. २. शून्य मशागतीमुळे पूर्व मशागत खर्चात बचत. ३. डवरणी अगर कोळपणीची गरज नाही. ४. भांगलणीची गरज नाही. मिश्रपीक घेतल्यास १०० टक्के जमिनीची कोळपणी व भांगलणी करावी लागते. या खर्चात बचत होते. ५. कोरडवाहू शेतीसाठी आवश्यक अशी जमिनीची सुपीकता व जलधारण शक्ती प्रति वर्षी वाढत जाईल. ६. विविध प्रकारच्या तणामुळे बेवड होईल. कापसावर कापूस घेणेही शक्य होऊ शकते. ७. अत्यल्प पाऊस पडून अत्यल्प नुकसान झाले तरी एकदम नापिकी होणार नाही. हे नुकसान अत्यंत कमी असल्याने सहन करण्याच्या पातळीत असेल. ८. शून्य मशागतीत कमी पाऊस झाल्यास ओलावा टिकून राहील. जास्त पाऊस झाल्यास योग्य वेळेत पाणी निचरा होऊन जाईल. चिबड लागणार नाही. कोरडवाहूत या दोनही गोष्टी अत्यंत गरजेच्या. प्रचलित शेतीत नेमके या उलट घडते. ९. कमी मनुष्य बळात शेती करणे शक्य होईल. हे आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे. १०. कमी खर्चाचे तंत्र असल्याने अल्प, अत्यल्प, आर्थिक मागासलेला शेतकरीही सहज वापरू शकेल. ११. चालू वर्षी अनेक जिल्ह्यात दुष्काळ असतानाही राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने चांगले उत्पादन घेतले आहे. ब) जवळ अंतरावरील मूग, उडीद, सोयाबीन सारख्या लवकर उत्पादन देणाऱ्या पिकाखालील क्षेत्रामध्ये वरवरची पाळी मारुन पेरणी यंत्राने पेरावे. तितक्‍याच क्षेत्राची कोळपणी, निंदणी (भांगलणी, खुरपणी) अगर तण नाशकाच्या वापराने तण नियंत्रण करावे. सोयाबीन सारखे पीक स्वतंत्र जमिनीत घेतल्याने यंत्राने कापणी, मळणी शक्‍य. बाकी मूग, उडीदाचे काम नेहमी प्रमाणे. पूर्व व आंतर मशागतीवरील खर्च इतक्‍याच मर्यादित क्षेत्राचा होईल.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com